विधानसभा अधिवेशन : मुख्यमंत्री बदलण्यावरुन भाजपा वातावरण मुद्दाम तापवत आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले अनेक दिवस आजारपणामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहू शकलेले नाहीत. उद्धव ठाकरे आज 22 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहाणार का याबद्दलही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे असं विरोधी पक्षाने म्हटल्यावर वातावरण तापले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आमदारांच्या बैठकीचं नेतृत्व मुख्यमंत्री करतील असं सांगण्यात येत होतं. मात्र मुख्यमंत्री या बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मार्गदर्शन केले आणि सत्ताधारी आमदारांशी अधिवेशनातील विषयांवर चर्चा केली.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहणार का? हा प्रश्न वारंवार विचारण्यात आला.
त्यावेळी अजित पवार म्हणाले, "मुख्यमंत्री अधिवेशनात येणार आहेत. ते वर्षा बंगल्यावरही आले होते. त्यांनी बैठका घेतल्या. त्यांचं काम सुरू आहे. ते अनेकदा बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होतात. ते अधिवेशनात येतील."
हा प्रश्न वारंवार विचारला असता, अजित पवार चिडले आणि म्हटलं, "मुख्यमंत्री येणार आहेत हे मी आता काय स्टँम्प पेपरवर लिहून देऊ का?"

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पदभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या पदाचा भार दुसऱ्या व्यक्तीकडे का देत नाही असा प्रश्न विचारला आहे. त्याचप्रमाणे काही नावेही सुचवली आहेत.
विरोधी पक्षातील नेत्यांनी यासाठी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचेही नाव सुचवले आहे. भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्रीपदाबाबत वातावरण मुद्दाम तापवत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पदाचा भार आदित्य ठाकरेंकडे द्यावा- सुधीर मुनगंटीवार
मुख्यमंत्री आजारी असताना आपल्या पदाचा अधिभार इतर कोणाकडे का देत नाहीत असा प्रश्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मुख्यमंत्री येऊ शकत नाही म्हणून नागपूरचे अधिवेशन मुंबईत घेतलं. आता ते इथेही नाहीत. मग मुख्यमंत्रिपदाचा चार्ज इतर कोणाला का देत नाहीत? अडचण काय आहे?"
शरद पवार परदेशी दौऱ्यावर जायचे तेव्हा ते आपला चार्ज इतर कोणाकडे देऊन जायचे. मग सगळ्या गोष्टीत पवारांचा सल्ला घेणारे याबाबतीत का घेत नाहीत. मुख्यमंत्र्यांचा कोणावर विश्वास नसेल तर आपल्या सुपुत्राकडे तरी त्यांनी चार्ज द्यावा. अजित पवारांवर त्यांचा विश्वास नसावा. त्यांना वाटत असेल ते पुन्हा फडणवीसांकडे जातील."
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हट्ट न करता दुसऱ्या कोणाकडे भार द्यावा असे मत व्यक्त केले.
"मुख्यमंत्री आजारी असल्याने गैरहजर असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उगाच हट्ट न करता चार्ज दुसऱ्या कुणाकडेतरी द्यायला हवा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार्ज परत मिळणार नाही, अशी शक्यता असल्याने किमान आदित्य ठाकरेंकडे तरी तो चार्ज द्यावा."

मुख्यमंत्रिपदाचा भार रश्मी ठाकरे यांच्याकडे देता येईल का असा प्रश्न एका पत्रकाराने विचारताच चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाचा चार्ज मंत्र्यांकडेच देता येतो. त्यासाठी कोणत्याही व्यक्तीला आधी मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल असं सांगितलं.
यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले आहे.
त्या म्हणाल्या, "चंद्रकांतदादांची कीव करावीशी वाटते. अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेता करणार का? त्या लाईमलाईटमध्ये असतात त्यांना करा ना विरोधी पक्ष नेता. आदित्य ठाकरेंवर बोलतात आता रश्मी ठाकरेंवर का बोलतात त्या कधी लाईम लाईटमध्ये असतात का? भाजपा सातत्याने महिलांचा अनादर करते. हिंदू धर्माची ही शिकवण नाही. याकरता आता पंतप्रधानांचीच भेट घ्यावी लागेल."
ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न?
राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी सांगतात, "भाजपकडून महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारच्या नेचृत्त्वात पोकळी निर्माण झाली आहे हा संदेश विरोधक जनतेमध्ये पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे अधिवेशनाला अनुपस्थितीत राहिले या संधीचा ते फायदा करून घेत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनाही असंच वाटतं. त्या म्हणाल्या, "भाजप ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याअर्थी मुख्यमंत्रिपदाचा चार्ज आदित्य ठाकरेंकडे द्यावा असं ते म्हणत आहेत ते पाहता ठाकरे कुटुंबाला चिडवण्यचा हा प्रयत्न आहे असं म्हणता येईल."
"मुख्यमंत्री घरी आहेत् असंही सांगितलं जातं आणि ते अधिवेशनाला येणार असंही सांगतात. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये समन्वय नाही हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आजारपणाचं राजकारण केलं जात आहे का अशी परिस्थिती आहे. परीक्षांवरून गोंधळ सुरू असताना उद्धव ठाकरे अधिवेशनात नाहीत हा ही एक संदेश द्यायचा आहे,"
बीबीसी मराठीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "शरद पवार मुख्यमंत्री असताना परदेशी दौऱ्यावर जाताना पदाचा चार्ज देऊन जायचे. मग इतर सर्व गोष्टीत पवारांचा सल्ला घेणारे याबाबतीत त्यांचा सल्ला का घेत नाहीत."
यासंदर्भात बोलताना सुधीर सूर्यवंशी सांगतात, " खरं तर देवेंद्र फडणवीसही परदेशी दौऱ्यावर जाताना मुख्यमंत्रिपदाचा चार्ज देत नव्हते. पवारांच्या काळात संपर्क साधण्याची किंवा काम करण्याची आधुनिक साधनं कमी होती. आता उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीला हजर असतात. तेव्हा तसं नव्हतं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








