भारतीयांना प्रेमाबद्दल, जोडीदाराबद्दल-लग्नाबद्दल काय वाटतं? आकडेवारी काय सांगते ?

लग्न, प्रेम, आंतरधर्मीय, आंतरजातीय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईत मरिन ड्राईव्ह इथे एक जोडपं

प्रेम आणि लग्नाबद्दल भारतीयांना काय वाटतं? लग्न आणि सहजीवनासंदर्भात पत्रकार रुक्मिणी.एस यांनी डेटा जमा करून संशोधन केलं. त्यातून लग्नासंदर्भातील सामाजिक राजकीय कंगोरे अधोरेखित झाले आहेत.

राज्यातल्या एका छोट्या गावातून 22वर्षीय नितीन कांबळे महिन्यातून दोनदा मुंबईहून गावाला जाणारी बस पकडतो. त्याच्या घरचे गावी राहतात. जाताना दोन बॅगा घेण्याचं तो ठरवतो. एक बॅग तो घेऊन जातो. दुसऱ्या बॅगेतही नेण्यासाठी ऐवज असतो पण तो नेऊ शकत नाही. मुंबईत तो राहत असलेल्या वन रुम किचनरुपी घरात ती बॅग तशीच राहते.

तो आता मांसाहार करतो, अधेमध्ये बीअरही पितो. तो जी बॅग नेत नाही त्यामध्ये त्याने जपून ठेवलेल्या नात्याच्या आठवणी असतात. त्याची गर्लफ्रेंड वेगळ्या जातीची आहे. त्याच्या घरचे आणि मुलीच्या घरच्यांना हे पटणारं नाही याची त्याला जाणीव आहे.

हे तुम्हालाही ऐकल्यासारखं वाटत असेल, पण तुम्ही डेटा पाहिलात तर नितीन हा या सगळ्या सामाजिकव्यवस्थेचा एक लहानसा भाग असल्याचं कळेल.

भारतीय कशावर आणि किती पैसे खर्च करतात हे डेटा स्पष्ट करतो. ते काम काय करतात, कोणाला मतदान करतात, त्यांना काय आवडत नाही हे डेटा उलगडतो. डेटा जरी तांत्रिक असला तरी माणसांच्या आयुष्यात काय घडतंय याची माहिती देतात. भारतीयांना प्रेमाबद्दल, जोडीदाराबद्दल-लग्नाबद्दल काय वाटतं याचा तपशीलही समोर आला आहे.

मी जमा केलेल्या खंडप्राय माहितीचा आढावा घेतल्यानंतर भारतीयांचा प्रेमाविषयीचा दृष्टिकोन याबद्दल मी सविस्तरपणे सांगू शकते.

आजही ठरवून केलेल्या लग्नांचं प्रमाण अधिक

आपले चित्रपट पाहिले तर असं वाटतं की भारतीयांसाठी प्रेमभावना आणि साथीदाराइतकं दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. हे काही प्रमाणात खरंही आहे. मात्र आजही भारतीय समाजात बहुतांश लग्नं अरेंज्ड म्हणजे कुटुंबीयांद्वारे ठरवून होतात.

2018 मध्ये 1,60,000 घरांचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. लग्न झालेल्या 93 टक्के लोकांनी त्यांचं लग्न अरेंज्ड पद्धतीने झालं असल्याचं सांगितलं. फक्त 3 टक्के लोकांनी प्रेमविवाह झाल्याचं सांगितलं. 2 टक्के लोकांनी अरेंज्ड कम लव्ह पद्धतीने काहींनी लग्न केलं आहे. या डेटाचा अर्थ असा की घरच्यांनी मुलांचं लग्न ठरवलं आणि त्यानंतर मुलामुलींनी लग्न केलं.

एका आकडेवारीत किचिंत बदल झाला आहे. नव्वदीत आलेल्या मंडळींपैकी 94 टक्के लोकांचं लग्न अरेंज्ड पद्धतीने झालं होतं. विशीत-तिशीत असलेल्या मंडळींपैकी 90 टक्के लोकांचं लग्न अरेंज्ड पद्धतीने झालं आहे.

लग्न, प्रेम, आंतरधर्मीय, आंतरजातीय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लग्न

मी प्रेमविवाह करेन असं वाटलं होतं, असं मनीषा मोंडल सांगतात. मी माझ्या पालकांशी यावरून भांडत असे. घरापासून दूर असणाऱ्या महाविद्यालयात मी जात असे. महाविद्यालयात मुलांनी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. त्यावेळी बरोबरच्या मुलींनी तिला वॉशरुममध्ये नेऊन समजावलं. मुलांशी बोलू लागलीस तर तुझ्या प्रतिमेला धक्का बसेल.

मनीषा पूर्व भारतातल्या भिलई या छोट्या शहरात एका खाजगी कंपनीत काम करतात.

मनीषा यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा मोठा भाऊ दिवसातून काहीवेळा त्या भागात चक्कर टाकत असे. मनीषा यांच्यासाठी कॉलेज महत्त्वाचं होतं. त्यांनी अभ्यासावर आणि नंतर कामावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. प्रेमाबाबत नंतर बघू असं त्यांनी ठरवलं.

कॉलेजला शेवटच्या वर्षाला असताना बाबांनी त्यांच्याच जातीतल्या मित्राच्या मुलाशी त्यांचं लग्न ठरवलं. मी माझ्या आईबाबांना पाहिलं होतं. ते कधीच भांडायचे नाहीत. त्यामुळे लग्नानंतर माझंही आयुष्य असंच असेल असं मला वाटलं.

आंतरजातीय विवाहांचं प्रमाण तुलनेनं कमी

जातीतल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करणं हे भारतातल्या लग्नाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. 2014 मध्ये यासंदर्भात 70,000 माणसांचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. जातीबाहेर लग्न केल्याची उदाहरणं कुटुंबात किंवा ओळखीत 10 टक्केही नसल्याचं सर्व्हेक्षणात सहभागी लोकांनी सांगितलं. उपजातीतही फारसं कोणी लग्न करत नसल्याचं स्पष्ट झालं. कुटुंबात किंवा ओळखीत कोणी आंतरधर्मीय लग्न केल्याची उदाहरणं 5 टक्केही नाहीत.

भारतातील युवा वर्ग स्वत:च्या जातीपेक्षा वेगळ्या जातीच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करण्यासाठी उत्सुक आहे. पण तयार असणं आणि प्रत्यक्षात तसं करणं यात फरक असल्याचं सर्व्हेक्षणात दिसून आलं.

2015 मध्ये संशोधकांनी मॅट्रिमोनिअल वेबसाईटच्या माध्यमातून 1,000 लग्नाळू मुलींशी संवाद साधला. या गटापैकी निम्म्याहून अधिक मुलींनी मुलगा/साथीदार अन्य जातीतला चालेल असं सांगितलं. पण जातीतला मुलगा नवरा मिळून मिळाला तर त्याला त्यांचं प्राधान्य होतं.

पारंपरिक पार्श्वभूमीवर जातीबाहेर लग्न करण्याच्या वैयक्तिक निर्णयाकडे बंडखोरी म्हणून पाहिलं जातं. समाजाकडून बहिष्कृत होण्याचीही यात भीती असते.

2014 मध्ये दिल्लीतल्या सात जिल्ह्यांमध्ये 2013 मध्ये बलात्कारासंदर्भात देण्यात आलेल्या प्रत्येक निकालाचा मी अभ्यास केला. जवळपास 600 प्रकरणं होती. यापैकी 460 प्रकरणांमध्ये न्यायालयासमोर युक्तिवाद झाला. 40 टक्के प्रकरणांमध्ये पूर्वसंमती होती किंवा तसं सांगितलं जात होतं.

यापैकी बहुतांश जोडप्यांनी पळून जाऊन लग्न केलं आहे. साधारणत: अशा प्रकरणांमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये करतात. काही वेळा बलात्काराच्या शक्यतेनेही तक्रार केली जाते. यापैकी बहुतांश जोडप्यांचं आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न झालेलं होतं.

लैंगिक हक्काबाबत किती जागरुकता?

तरुण मुलंमुली त्यांच्या लैंगिक हक्कांबाबत स्वत: निर्णय घेत असल्याचं पाहणं हे पारंपरिक समाजरचनेला धरून नाही. यापेक्षा बलात्काराची बदनामी सहन केली जाते.

परिस्थिती चिघळू शकते. गेल्या दशकभरात पाखंडी विचारांच्या हिंदू संघटनांनी लव्ह जिहाद नावाची संकल्पना मांडली आहे. मुस्लीम मुलगा लग्नाच्या निमित्ताने हिंदूधर्मीय मुलाला सक्तीने धर्मांतर करायला लावत असल्याचा या संघटनांचा आरोप आहे.

लग्न, प्रेम, आंतरधर्मीय, आंतरजातीय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात आंतरजातीय तसंच आंतरधर्मीय लग्नांचं प्रमाण कमी आहे.

भाजप केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये सत्तेत आहे. मुलीला किंवा महिलेला लग्नासाठी सक्तीने धर्मांतर करायला लावणाऱ्या पुरुषांना कठोर कारवाईची तरतूद अनेक राज्यांनी केली आहे. आंतरधर्मीय लग्नासंदर्भात त्यांनी काही अलिखित नियमही आखले आहेत. त्यामुळे प्रेम दोघांचं असलं तरी संस्कृतीरक्षकांच्या नियमांचे अडथळे पार केले तरच ते लग्नापर्यंत जाऊ शकतं.

कथित संस्कृतीरक्षकांच्या प्रेम करणाऱ्यांवरील बडग्यामुळे आंतरधर्मीय लग्न करणार असलेली जोडपी गायब किंवा भूमिगत होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि लग्नासंदर्भातील डेटा म्हणजे माहिती दुरापास्त होण्याची आणि त्यातली अचूकता हरवण्याचीही शक्यता बळावली आहे.

आंतरधर्मीय लग्न केलेल्या एका जोडप्याशी मी बोलले. मुलीच्या घरच्यांकडून त्यांना अतिशय कटू वागणूक मिळाली. यामुळे त्यांनी लग्नाचं प्रमाणपत्र न घेण्याचा निर्णय घेतला. कारण तसं केलं असतं तर त्यांची नावं सरकारी दस्ताऐवजात सार्वजनिक झाली असती.

नितीनने त्याच्या आयुष्याचं असं वर्णन केलं. तो म्हणाला, तुमच्या माहितीनुसार आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न अतिशय कमी प्रमाणात होत आहेत. पण तुमचा डेटा प्रेमाचं गहिरेपण दाखवत नाही. या प्रेमासाठी अनेक जोडपी घरच्यांशी, समाजाशी लढत आहेत. पण त्यांना लढाईत पराभवाचा सामना करावा लागत आहे.

(लेखातील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची नावं बदलण्यात आली आहेत.

व्होल नंबर्स अँड हाफ ट्रूथ- व्हॉट डेटा कॅन अँड कॅनॉट टेल अस अबॉट मॉडर्न इंडिया हे रुक्मिणी लिखित पुस्तक अमेझॉन वेस्टलँडने प्रकाशित केलं आहे.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)