शाहरूख खानच्या मागे भारतीय महिला इतक्या वेड्या का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अपर्णा अल्लुरी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तुम्हाला शाहरूख खान इतका का आवडतो? मी माझ्या काही मैत्रिणींना हा प्रश्न विचारला तेव्हा त्या चकित झाल्या.
शाहरूखबद्दल कोणी असाही प्रश्न कोणी विचारू शकतं याचा त्यांनी विचारच केला नव्हता. मी पण कधी असा विचार केला नव्हता, पण एका नव्या पुस्तकाने मला त्याबद्दल विचार करायला भाग पाडलं.
डेस्परेटली सीकिंग शाहरूख असं त्या पुस्तकाचं नाव आहे.
माझ्या मैत्रिणी म्हणाल्या की, शाहरूख क्यूट वाटतो. एक हिरो म्हणून तो आपलासा वाटतो, त्याचा स्वभाव विनोदी आहे, मुलाखतीत तो स्पष्ट बोलतो. पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावतानाच्या त्याच्या प्रवासाबद्दल तो खुलेपणाने सांगतो. खोटी नम्रता दाखवत नाही.
मग मी त्यांना अजून काही प्रश्न विचारले. मग त्यांनी शाहरूखच्या वेगवेगळया भूमिकांविषयी सजगपणे विचार करायला सुरुवात केली. त्या मुली म्हणाल्या की, शाहरूखने कधी 'माचो' रोल नाही केले. तो नेहमीच एक संवेदनशील नायक म्हणून समोर आला. तो त्याच्या नायिकेवर प्रेम करायचा, तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला असायचा.
माझी एक मैत्रिण म्हणाली की आम्हा बायकांना त्याच्या रोमँटिक प्रतिमेमुळे तो आवडतो हे खरंय. हा विचार तिलाच चकित करणारा होता.
लेखिका शरण्या भट्टाचार्य यांनी शाहरूखच्या कितीतरी महिला चाहत्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्या महिलांनीही अशीच उत्तरं दिली. पण यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे शाहरूख महिलांना का आवडतो याची कारणं एका वेगळ्याच प्रकारच्या असमानतेची कहाणी सांगत होती.
'आपलासा वाटणारा शाहरूख'
शरण्या लिहितात, "जेव्हा त्या महिला चाहत्या मला सांगायच्या की त्यांना शाहरूख नक्की कधी आणि केव्हापासून आवडायला लागला तेव्हा त्या मला खरंतर जगाने त्यांना कधी कमी लेखलं, त्यांची स्वप्नं कशी पायदळी तुडवली गेली, त्यांचं मन कधी खट्टू झालं, त्यांच्या आयुष्याकडून प्रेमाबदद्ल काय अपेक्षा होत्या याची कहाणी सांगत असायच्या."
लेखिकेने गेल्या वीस वर्षांत लग्न झालेल्या, सिंगल आणि दोन्हीच्या अध्येमध्ये असलेल्या अनेक महिलांना विचारलं. या वीस वर्षांत त्यांना वर सांगितलेली उत्तरं मिळाली. या महिलांमध्ये हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन महिला आहे. नोकरी करणाऱ्या आहेत, न करणाऱ्या आहेत, शांत आहेत, काही बेचैन आहेत, पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे... सगळ्यांना शाहरूख आवडतो.

फोटो स्रोत, YRF
शाहरूख आपल्या जगात 1990 च्या दशकात आला. कोका-कोला, केबल टीव्हीच्या नव्या युगात भारतात आर्थिक सुधारणा होत होत्या. जग ग्लोबलाझेशनच्या दिशेने जात होतं.
शरण्या म्हणतात, "आर्थिक उदारीकरणानंतर महिलांच्या बदलत्या आयुष्याची कथा मला सांगायची होती आणि या कथेत मला या महिलांना 'आपलासा वाटणारा' शाहरूख भेटला."
शरण्या देशातल्या एका झोपडपट्टीत उदबत्त्या बनवणाऱ्या महिलांचा सर्व्हे करत होत्या. त्यांना लक्षात आलं की या महिलांना आपल्या मजुरीविषयी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा कंटाळा आला होता.
त्यांनी त्या महिलांशी संवाद साधताना त्यांच्याशी वेगळ्या विषयांवर गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांनी विचारलं की त्यांना हिंदी पिक्चरमधला कोणता हिरो सर्वाधिक आवडतो.
शरण्या म्हणतात, "ज्या गोष्टीतून त्यांना सगळ्यांत जास्त आनंद मिळत होता त्या गोष्टीविषयी बोलायला त्यांना फार आवडत होतं."
या एका प्रश्नाने त्या मजूर महिला खुलल्या. मोकळेपणाने गप्पा मारायला लागल्या. शरण्याच्या लक्षात आलं की जगण्याचा संघर्ष, मजुरी आणि घरातलं दारिद्र्य याबरोबर त्यांच्यात एक गोष्ट अजून कॉमन आहे - शाहरूख खान.
सगळ्या शाहरूखच्या चाहत्या होत्या. मध्यमवर्गीय महिलेपासून श्रीमंत महिलांपर्यंत सगळ्यांच्या बोलण्यात एक गोष्ट वारंवार पुढे येत होती - आमच्या आयुष्यातले पुरुष पडद्यावर दिसणाऱ्या शाहरूख खानसारखे का असू शकत नाहीत?
शरण्या म्हणतात, "याच महिला शाहरूख खानची (आपल्यासमोर असणारी) प्रतिमा बनवत होत्या. ही प्रतिमा या महिलांच्या खऱ्या आयुष्यातल्या इच्छा-आकांक्षावर आधारित आहे."
शाहरूख त्याच्या नायिकेप्रति संपूर्ण समर्पित आहे. ही प्रतिमा अशा पुरुषाची आहे ज्याला महिलांची कदर आहे आणि तो त्यांचे विचार, त्यांचं म्हणणं मनापासून ऐकतो.
महिलांचा आदर्श पार्टनर
शाहरूखने अनेक भूमिका केल्यात. त्याने साकारलेल्या हिरोचं नशीब हेलकावे खात असतं. म्हणूनच तो या सगळ्या बायकांना आवडतो कारण या बायकांचंही नशीब कुठे त्यांच्या हातात असतं?

फोटो स्रोत, YRF
पडद्यावर शाहरूख जी भूमिका वठवत असतो त्यात काही अंशी दुबळेपणा जरूर दिसतो. शाहरूख रडताना लाजत नाही. बॉलिवुडमध्ये हिरोला रडताना दाखवणं दुर्मिळ होतं. शाहरूखच्या हिरोने आपल्या भावना कधी लपवल्या नाहीत आणि नायिकांच्या भावनांचीही नेहमी कदर केली.
कपडे शिवणाऱ्या एका तरूण मुस्लीम मुलीने म्हटलं, "शाहरूख जसा 'कभी खुशी, कभी गम' मध्ये काजोलला हात लावतो, तिच्याशी बोलतो तसाच स्पर्श माझ्या नवऱ्याने कधीतरी मला केला असता तर? पण मला माहिती होतं की असं कधी होणार नाही. माझ्या नवऱ्याचा हात आणि मूड दोन्ही रखरखीत असतं. त्याच्याकडून अशी अपेक्षा करणं मुर्खपणा आहे."
आपल्या लग्नात खुश नसणाऱ्या एक जुन्या काळातल्या राजघराण्यातल्या महिलेने म्हटलं होतं की तिला आपल्या मुलाला एक 'चांगला पुरूष' बनवायचं आहे. असा पुरूष ज्याच्या बायकोला सुरक्षित वाटेल, नवऱ्याकडून प्रेम मिळेल. अगदी तेच वाटेल जे पडद्यावरच्या नायिकांना शाहरूखबरोबर वाटतं.
बरं असंही नाहीये की शाहरूखच्या या चाहत्या त्याची प्रत्येक भूमिका डोक्यावर घेतात. ज्या भूमिकांमध्ये शाहरूख हिरोईनला त्रास देतो, तिचा छळ करतो त्या भूमिका या महिलांनी रिजेक्ट केलेल्या आहेत.
या महिलांनी पडद्यावरच्या शाहरूखच्या भूमिकांमधलं ग्लॅमर, त्यातला ड्रामा याचा आनंद घेतला असेल पण त्यांच्या डोक्यात या गोष्टी कायमस्वरूपी राहात नाहीत. त्यांच्या मनात छाप सोडतात त्या सिनेमात हरवलेल्या लहान लहान गोष्टी.
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा शाहरूखच्या सर्वाधिक हिट चित्रपटांपैकी एक आहे आणि कदाचित बॉलवुडमध्ये सर्वाधिक पसंत केलेला रोमँटिक सिनेमा असेल. पण शाहरूखच्या एका चाहतीच्या आईने एक गोष्ट सांगितली जी कदाचित फार लोकांच्या लक्षातही आली नसेल.
त्या म्हणाल्या होत्या, "मी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर असा हिरो पाहिला जो घरातल्या बायकांबरोबर स्वयंपाक घरात गाजर सोलत होता, स्वयंपाक घरात इतका वेळ देत होता."
त्यांच्यासाठी हे खूप रोमँटिक दृश्य होतं. शाहरूखच्या चाहत्या महिलांना त्याच्याविषयी शारीरिक आकर्षण वाटत नाही असं नाही, पण त्याहीपेक्षा या गोष्टी या महिलांसाठी जास्त महत्त्वाच्या आहेत.
दुःख हलकं करणारा शाहरूख
शाहरूख या महिलांना त्यांच्या रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यातून लांब घेऊन जातो. त्यांचं अपेक्षाभंगाचं दुःख हलकं करतो.

फोटो स्रोत, Getty Images
या बायकांचं स्वप्न असतं की शाहरूखशी लग्न व्हावं, तो बॉलिवुड स्टार आहे म्हणून नाही तर तो दुसऱ्यांच्या भावना समजून घेतो म्हणून. आणि जो माणूस दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांची काळजी घेतो, तोच माणूस तुम्हाला नोकरी करू देऊ शकतो, पैसे साठवू देऊ शकतो आणि तुमची स्वप्नं जिवंत ठेवण्याची परवानगी देऊ शकतो. मग हे स्वप्न शाहरूखचा पुढचा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरपर्यंत जाण्याचं का असेना.
शाहरूखच्या चाहत्यांमध्ये सगळ्या आर्थिक गटांमधल्या, सगळ्या वयांच्या बायका आहेत. मग शाळकरी वयात खोट बोलून शाहरूखचा पिक्चर पाहून नंतर त्या 'गुन्ह्या'साठी आईच्या हातचा मार खाणारी सरकारी अधिकारी असेल, किंवा आपल्या मेहनतीने कमवलेल्या पैशांतून भावाला काही पैशांची लाच देऊन 'थिएटरपर्यंत सोड' अशी विनंती करणारी कपडे शिवणारी बाई असेल किंवा रविवारी शाहरूखचा सिनेमा पाहायचा म्हणून सलग चार रविवार चर्चाच्या पादरींशी खोटं बोलणारी मोलकरीण असेल.
या सगळ्या बायकांसाठी पिक्चर पाहण्याचा शुल्लक वाटणारा आनंद एका चोरलेल्या स्वातंत्र्यासारखा होता. काही क्षण का होईना, मनसोक्त आयुष्य जगून घेण्याचं स्वातंत्र्य.
काही गरीब महिलांना तर आपल्या वयाच्या मध्यावर येईपर्यंत शाहरूखचा कोणताही पिक्चर पाहिला नव्हता. पण त्याच्या गाण्यांनीच त्या चाहत्या बनल्या. पण ती गाणी ऐकणंही महिलांसाठी सोपं नव्हतं.
शरण्या म्हणतात, "बायकांनी मजा-मस्ती करावी हेही समाजाला मान्य नसतं. कोणतं गाणं ऐकणं किंवा आवडत्या हिरोला पाहायला जाणं या गोष्टीकडेही वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. कोणती बाई म्हणाली की तिला अमुक एक हिरो आवडतो तर तिच्याविषयी लगेचच गैरसमजुती बनू शकतात."

फोटो स्रोत, Getty Images
शरण्या म्हणतात, "भले या महिला खूप स्वतंत्र विचारांच्या नसतील पण आपल्या लहान लहान गोष्टींमधल्या आनंदासाठी त्यांनी विद्रोह केला. गादीखाली शाहरूख खानचं पोस्टर लपवून, त्याच्या पिक्चरची गाणी ऐकून, त्या गाण्यावर डान्स करून त्यांनी हा विद्रोह केला. कारण या लहानसहान विद्रोहातून त्यांनी दाखवून दिलं की त्यांना आयुष्याकडून काय हवं होतं.
उदाहरणार्थ मी ज्या सरकारी अधिकारी असणाऱ्या महिलेबद्दल बोलले होते, तिने स्वतःचा मार्ग निवडून उच्चपदावर जाण्याचं लक्ष्य ठेवलं होतं म्हणजे भविष्यात तिला कधी कोणी शाहरूख खानचा पिक्चर पाहाण्यापासून थांबवणार नाही. तिला दुसरं कोणाची परवानगी घ्यावी लागणार नाही.
एका तरूण मुलीचं लग्न ठरलं होतं. शाहरूखचा चित्रपट पाहाताना तिला कळलं की तिचा होणारा नवरा शाहरूखचा फॅन नाहीये आणि त्याला त्याच्या होणाऱ्या बायकोने शाहरूखचे सिनेमे पाहाणंही पसंत नाही. ते लग्न मोडलं कारण ती मुलगी पळून गेली."
(आज तीच मुलगी एअर होस्टेस आहे आणि तिने शाहरूख जसा नायिकांशी वागतो तसंच वागणाऱ्या दुसऱ्या मुलाशी लग्न केलं आहे.)
शाहरूख कदाचित मी किंवा माझ्यासारख्या सुविधासंपन्न आणि स्वतंत्र जगातल्या महिलांसाठी स्वप्नपुर्तीची वचनं आणत नव्हता. पण मी हे पुस्तक वाचलं तेव्हा मला लक्षात आलं की मी कधी माझी आई आणि मावशांनी केलेल्या 'शांतीत क्रांती'ला सीरिसयली घेतलं नाही.
शांततेत केली जाणारी ही क्रांती त्यांना दर शुक्रवारी लेट नाईट शो साठी थिएटर्समध्ये नेऊन सोडायची. मलाही त्या सोबत घेऊन जायच्या. तेव्हा मला मी किती भाग्यवान आहे हे लक्षात येत नव्हतं.
पण आपल्या या कथेत ज्या ज्या महिलांचा उल्लेख झालाय त्यांची परिस्थिती वेगळी असूनही शाहरूख त्यांच्यातला सामायिक धागा आहे.
एका महिलेनी सांगितलं की ती शाहरूखचे इंटरव्ह्यू पाहून चांगलं इंग्लिश बोलणं शिकली.
शाहरूख आपल्या काळातला एक ठसठशीत आयकॉन आहे. पण तो बॉलिवुडमध्ये आला तेव्हापासून आतापर्यंत अनेक गोष्टी बदलल्या आहेत.
"आजकालच्या तरूण मुलींना शाहरूखशी लग्न करायचं नाहीये. त्यांना शाहरूखसारखं बनायचं आहे. त्यांना त्याची स्वायतत्ता आणि यश हवंय."
(शरण्या भट्टाचार्य यांचं पुस्तक 'Desperately Seeking Shah Rukh: India's Lonely Young Women and the Search for Intimacy and Independence' हार्पर कॉलिन्स इंडियाने प्रकाशित केलं आहे. )
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








