संजय राऊत- सुप्रिया सुळे यांचा डान्स व्हायरल, विरोधकांची टीका #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा डान्स व्हायरल, विरोधकांची टीका

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी राऊत लग्नबंधनात अडकणार आहे. या सोहळ्याआधी राऊत कुटुंबाकडून मुंबईत संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमातील संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या डान्स व्हिडिओची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी आग्रह करत संजय राऊत यांना एका गाण्यावर ठेका धरण्यास भाग पाडलं. सुळे यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नृत्यात सहभागी व्हायला लावल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

दरम्यान, विरोधकांनी सुळे आणि राऊत यांच्या डान्स करण्यावर टीका केली आहे.

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं, "एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता.

"एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?"

2. कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- सरन्यायाधीश

विधिमंडळ जे कायदे पारित करतं, त्याच्या परिणामांचा अभ्यास किंवा मूल्यमापन करत नाही, असं सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

ते म्हणाले, "विधिमंडळ जे कायदे पारित करतं त्याच्या परिणामांचा अभ्यास किंवा मूल्यमापन करत नाही. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्टचे कलम 138 लागू करणे हे याचे उदाहरण आहे."

आधीच कामाचा प्रचंड ताण असलेल्या न्यायदंडाधिकाऱ्यांवर हजारो खटल्यांचा बोजा वाढला आहे. त्याचप्रमाणे, विशेष पायाभूत सोयी निर्माण केल्याशिवाय विद्यमान न्यायालयांचे 'व्यावसायिक न्यायालये' असं नामकरण केल्यानं खटले प्रलंबित राहण्याची समस्या सुटणार नाही, असंही सरन्यायाधीशांनी नमूद केलंय.

3. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. आरोग्य विभागाच्या तपासणीतून ही माहिती पुढे आली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

"या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

"या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार आहे," असं महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितलं आहे.

4. '11 राज्यांतील 70 टक्क्यांहून अधिक महिलांचं हिंसाचाराबाबत मौन'

11 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 70 टक्क्यांहून अधिक महिलांनी त्यांच्याविरोधातील हिंसाचाराविषयी कधीच कुणाला काही सांगितलं नसल्याचं, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 मधून समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

आसाम (81.2), बिहार (81.8), मणिपूर (83.9), सिक्कीम (80.1) आणि जम्मू काश्मीर (83.9) या ठिकाणी तर हे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक असल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलंय.

8 राज्यांमधील 10 टक्क्यांपेक्षाही कमी महिलांनी शारिरीक हिंसाचारातून बचावण्यासाठी मदत मागितली. यात आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मणिपूर, नागालँड यांचा समावेश होतो.

5. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 4 दिवस पाऊस

राज्याच्या बहुतांश भागात आजपासून (29 नोव्हेंबर) पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. सकाळनं ही बातमी दिलीय.

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पुणे, नाशिकसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ात काही भागांत चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

1 डिसेंबरला कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)