सरिता चहाकाटे: अचानक समोर आला वाघ अन् 70 वर्षांच्या आज्जींनी केले दोन हात

फोटो स्रोत, SUMIT PAKALWAR
- Author, सुमित पाकलवार
- Role, मुक्त पत्रकार, बीबीसी मराठीसाठी गडचिरोलीहून
अचानक आपल्यासमोर वाघ आल्यास काय करणार अशा प्रकारचे प्रश्न असलेला निबंध आपण केव्हातरी नक्कीच वाचला असेल. पण गडचिरोली जिल्ह्यातील मुरमुरी या गावी ही घटना प्रत्यक्षात घडली. ती पण एका शेतमजूर 70 वर्षीय आजीसोबत.
हा थरार अनुभवणाऱ्या आज्जीने क्षणाचाही विलंब न करता पुढे आलेल्या वाघावर फक्त हातांनी हल्ला चढविला आणि वाघाला पळवून लावले. एखाद्या चित्रपटातील वाटावा असा हा प्रसंग आहे. आज्जीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ताडोबा अभयारण्यातून पलायन केलेल्या जवळपास 15 ते 20 वाघांनी सध्या गडचिरोलीतील जंगलात बस्तान मांडले आहे. त्यामुळे वन्यप्राणी-मनुष्य संघर्ष पहायला मिळत आहे.
अशातच 22 नोव्हेंबर रोजी जिल्हा मुख्यालयापासून 30 किमी अंतरावर असलेल्या मुरमुरी या गावात पट्टेदार वाघाने एका 70 वर्षीय आजींवर हल्ला केल्याची घटना घडली. सरिता चहाकाटे असे या वृद्ध महिलेचे नाव आहे.
या घटनेचा सविस्तर वृत्तांत चहाकाटे आजींनी सांगितला.
त्यानुसार, चहाकाटे आजी नेहमीप्रमाणे दुपारी 12 वाजताच्या दरम्यान शेतावर धान कापणीचे काम करत होत्या.
तहान लागल्यावर त्या बांधावर पाणी पिण्यासाठी गेल्या. पाणी पीत नाही तोच पुढे वाघ दिसल्याने या आजींची भंबेरी उडाली. वाघाने सावज पुढे बघून लगेच आजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढे जे घडले ते वाघालाही अपेक्षित नव्हते.
आजींनी क्षणाचाही विलंब न करता रिकाम्या हातांनी थेट वाघाचा प्रतिकार केला. समोरून झालेल्या अनपेक्षित हल्ल्यामुळे वाघ देखील घाबरला आणि तेथून धूम ठोकली, असं आजींनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
विशेष म्हणजे वाघासोबत दोन हात करणारी आजी दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी कामावर हजर होत्या. आम्ही घटनास्थळी भेट दिली तेव्हा त्यांच्या तोंडून घडलेला प्रसंग ऐकायला मिळाला.
यावेळी आजीसोबत कामावर असलेल्या महिलांनी देखील घटनेबद्दल सांगितले. यावेळी आजीच्या चेहऱ्यावर प्राण वाचल्याचे समाधान होते पण कुठलीही भीती दिसत नव्हती.
वनरक्षकांकडून पंचनामा
मुरमुरी हे गाव कुनघाडा वनपरिक्षेत्रात येतं. जोगणा येथील वनक्षेत्र सहाय्यक विवेकानंद चांदेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आम्ही त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला. सोबत वाघाच्या वावरासंदर्भात माहिती देखील दिली.

फोटो स्रोत, Sumit Pakalwar/BBC
वनविभागाकडून वेळोवेळी वाघापासून संरक्षणासंदर्भात दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केल्यामुळे आज त्या महिलेचा जीव वाचल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी घटनास्थळावर वाघाच्या पायाचे ठसे देखील स्पष्ट दिसत होते. गेल्या काही महिन्यांपासून जंगली हत्ती आणि वाघाच्या उपद्रवामुळे गडचिरोली वनविभागासमोर नवे आव्हान उभे ठाकल्याचेही चित्र आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









