You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिंदू आणि मुस्लिमांनी दंगलीसाठी परस्परांशी हातमिळवणी केली होती तेव्हा...
- Author, दिनयार पटेल
- Role, इतिहासकार
शंभर वर्षांपूर्वी पारतंत्र्यात असणाऱ्या भारतातील मुंबईमध्ये झालेली एक दंगल भारतीय इतिहासातील सर्वांत विचित्र प्रकारची दंगल मानली जाते.
या दंगलीत हिंदू आणि मुस्लीम एकमेकांविरोधात भांडत नव्हते, तर एकमेकांना साथ देत दुसऱ्या समूहांशी झगडत होते. त्या घटनेतून आजच्या भारताला कोणता धडा घेता येईल, याबद्दल इतिहासकार दिनयार पटेल सांगत आहेत..
मुंबईतील ही दंगल नोव्हेंबर 1921 मध्ये झाली. 'प्रिन्स ऑफ वेल्स दंगल' म्हणूनच ही घटना ओळखली जाते. आता ही दंगल विस्मृतीत गेली असली, तरी धार्मिक असहिष्णूता व बहुसंख्याकवाद यांमुळे सामाजिक भेदभाव वाढलेल्या काळात ही दंगल देशासमोर एक महत्त्वाचा दाखला घालून देणारी होती.
असहकार आंदोलनादरम्यान झालेली दंगल
या हिंसाचाराच्या घटनांमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक नेते, ब्रिटनचे भावी सम्राट आणि ऱ्हासशील तुर्कस्तानी साम्राज्याचे सुलतान यांचा कमी-अधिक सहभाग होता. तसंच स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व पॅन-इस्लामिझम अशा विविध विचारसरणी व उद्दिष्टंही याला कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातं.
ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स (आठवे एडवर्ड) नोव्हेंबर 1921 मध्ये परिस्थिती बिघडलेली असताना भारतातील त्यांच्या साम्राज्याचा दौरा करण्यासाठी आले होते. त्या दिवसांमध्ये भारतात महात्मा गांधींचं असहकार आंदोलन जोमात सुरू होतं. ब्रिटिशांच्या वासाहतिक सत्तेसाठी हे आंदोलन 1857 च्या बंडापेक्षाही धोकादायक होतं.
'हिंदू-मुस्लीम ऐक्या'चा कैवार घेत गांधीजींनी भारतीय मुस्लिमांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या खिलाफत चळवळीत सहभाग घेतला. पहिल्या महायुद्धात ओटोमान साम्राज्याचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिश तिथल्या सुलतानाला पदच्युत करतील, अशी चिंता या चळवळीतील आंदोलकांना सतावत होती. तुर्कस्तानचा सुलतान हा इस्लामचा वैध खलिफा आहे, अशी खिलाफत आंदोलकांची धारणा होती.
सांप्रदायिक ऐक्याच्या या अनोख्या काळात हिंदू व मुस्लीम यांच्यात एकजूट निर्माण झाली होती. याच ऐक्यामुळे ख्रिस्ती, शीख, पारशी व ज्यू अशा इतर अल्पसंख्याक समुदायांच्या मनात बहुसंख्याक समुदायांच्या वर्चस्वाविषयी भीती निर्माण केली.
उर्वरित अल्पसंख्याक समुदायांनी या संदर्भात घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, असं गांधी सांगत होते. "हिंदू-मुस्लीम यांच्यात समजूत प्रस्थापित झाली असली, तरी मोठे समुदाय लहान समुदायांवर प्रभुत्व गाजवतील असा याचा अर्थ नाही."
प्रिन्स ऑफ वेल्सचा दौरा
आपल्या दौऱ्यामुळे लोकांमध्ये स्वामिनिष्ठेची भावना वाढेल आणि गांधींचं आंदोलन प्रभावहीन होऊन जाईल, अशी निराधार आशा प्रिन्स ऑफ वेल्स यांना वाटत होती. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने ब्रिटनच्या आर्थिक साम्राज्यवादाचं प्रतीक असलेल्या परदेशी कपड्यांची होळी करून आणि उपोषण करून प्रिन्स ऑफ वेल्सचं स्वागत करायचं ठरवलं.
पण 17 नोव्हेंबर 1921 रोजी मुंबईतील रहिवासी मोठ्या संख्येने या उपोषणाचा विरोध करत प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागतासाठी हजर राहिले. जहाजातून प्रिन्स उतरल्यावर त्यांचं स्वागत करणाऱ्या या समूहामध्ये अनेक पारशी, ज्यू व आंग्ल-भारतीय होते.
गांधींनी अहिंसेचं पालन करण्याचे आदेश दिलेले असतानाही काँग्रेस व खिलाफत चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली. भारतातील पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट होमाई व्यारावाला त्या वेळी आठ वर्षांच्या होत्या आणि या घडामोडींच्या एक साक्षीदारही होत्या.
2008 साली घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पारशी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागतासाठी गरबा नृत्य कसं केलं होतं याची आठवण सांगितली होती. काहीच दिवसांनी त्यांना मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड हिंसक संघर्ष पाहायला मिळाला. दंगलखोरांनी सोड्याच्या बाटल्यांचा घातक अस्त्र म्हणून वापर केला. पारशी लोकांच्या दारू-दुकानांना लक्ष्य करत त्यावर दगडफेक करण्यात आली आणि दुकानं जाळून टाकण्याची धमकीही देण्यात आली.
पारशी व ख्रिस्ती यांना लक्ष्य करण्यात आलं
असहकार आंदोलनामध्ये दारूबंदीचाही समावेश करायचा गांधींनी बराच प्रयत्न केला होता. दारूच्या व्यापारावर नियंत्रण असणाऱ्या पारशी समुदायाने स्वतःहून दारूची दुकानं बंद करावीत, असा आग्रह गांधींनी धरला होता.
या काळातील हिंसाचाराने मुंबईला हादरवून सोडलं. हिंदू व मुस्लीम दंगलखोरांच्या जमावांनी पारशी लोकांच्या आर्थिक प्रभुत्वाचं व राष्ट्रवादी राजकारणाविरोधातील त्यांच्या धोरणाचं प्रतीक असणाऱ्या दारूदुकानांना लक्ष्य केलं. दारूची दुकानं सुरू ठेवणाऱ्या पारशी लोकांच्या घरांना आग लावण्याची धमकी देण्यात आली. दुकानदार त्यांच्याकडील दारूचा साठा जवळच्या नाल्यात रिकामा करणार असतील, तरच त्यांना मोकळं सोडलं जात असे.
परंतु, यात केवळ पारशी व आंग्ल-भारतीय लोकच पीडित होते आणि निष्पाप होते असं नाही. त्यांच्यातील अनेकांनी काठ्या, बांबू आणि बंदुका घेऊन हिंसाचारात सहभाग घेतला होता. त्यांनी खादी घातलेल्या लोकांवर हल्ले केले आणि 'गांधी टोपी मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या. काँग्रेसशी संबंधित पारशी व ख्रिस्ती लोक दोन्ही बाजूंनी लक्ष्य होण्याची शक्यता होती.
या हिंसक घटनांवर गांधींनी तत्काळ प्रतिक्रिया व्यक्त केली. विविध समुदायाच्या नेत्यांना ते शांतता राखण्यासाठी एकत्र घेऊन आले.
गांधींचं पहिलं उपोषण
या सांप्रदायिक दंगलींविरोधात 19 नोव्हेंबरपासून गांधींनी पहिलं उपोषण सुरू केलं. हा हिंसाचार थांबत नाही तोवर आपण काहीही खाणार-पिणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या व्यूहरचनेचा परिणाम दिसला. त्यांनी उपोषण सोडावं, यासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत विविध समुदायांचे लोक विनंती करत होते.
परंतु, 'प्रिन्स ऑफ वेल्स दंगलीं'नी त्यांना आतून हादरवलं होतं. 'आपण स्वराज्याची चव चाखली आहे,' अशी त्यांनी घोषणा केली. बहुसंख्याक समुदायांच्या हिंसक वर्चस्वासंदर्भात अल्पसंख्याक समुदायांना वाटत असलेली भीती रास्त असल्याचं या दंगलींनी दाखवून दिलं आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे मुंबईत हिंसाचाराचं लोण उठल्यावर गांधींनी अल्पसंख्याकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी वेगाने पावलं उचलली.
काँग्रेस व खिलाफत चळवळीच्या कार्यकर्त्यांनी अल्पसंख्याकांच्या अधिकारांवर भर द्यावा आणि नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश गांधींनी दिले. अल्पसंख्याक समुदायांच्या हिताचं संरक्षण करण्याची अनिवार्य जबाबदारी बहुसंख्याकांवर आहे, अशी घोषणा गांधींनी केली. त्यांनी सभांमध्ये व काँग्रसच्या विविध प्रकाशनांमध्ये अल्पसंख्याक प्रतिनिधींना महत्त्वाच्या राजकीय संधी देऊ केल्या.
सर्वधर्मीय ऐक्यावर भर
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधींनी 'हिंदू-मुस्लीम ऐक्या'ची घोषणा 'हिंदू-मुस्लीम-शीख-पारशी-ख्रिस्ती-यहुदी (ज्यू) ऐक्य' अशी बदलली. ही घोषणा लांबलचक असली तरी तिचा परिणाम झाला. स्वतंत्र भारतात आपल्यालाही स्थान असेल, अशी आश्वस्तता अल्पसंख्याक समुदायांच्या मनात निर्माण करण्याचं काम या घोषणेने केलं.
या दंगलींमध्ये किमान 58 लोकांना प्राण गमवावे लागले. मुंबईतील सहा दारू-दुकानांपैकी एका दुकानावर हल्ला झाला. प्रिन्स ऑफ वेल्सच्या दौऱ्याच्या आरंभीच असे दंगे होणं त्यांच्यासाठी अशुभसूचक होतं. भारतात अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत हल्ले अथवा हत्या करण्याच्या धमक्यांनी झालं.
परंतु, गांधींच्या दृढ मुत्सद्देगिरीमुळे या दंगली आता विस्मृतीत गेल्या आहेत. या दंगलींमुळे मुंबई कायमची जखमी होऊ नये, अशी तजवीज त्यांनी केली. अशा रितीने त्यांनी बहुसंख्याकवादाचा धोकाही यशस्वीरित्या बाजूला सारला.
या दंगलींमधून आज आपण कोणता धडा घ्यावा?
या दंगली आजच्या भारतासाठी एक धडा आहेत. सांप्रदायिक हिंसाचार बहुतांशाने राजकारणातून उद्भवतो, हे 'प्रिन्स ऑफ वेल्स दंगलीं'मधून दिसून आलं. जुन्यापुराण्या व भरून न निघणाऱ्या धार्मिक मतभेदांमुळे हे होत नाही.
1921 मधील राजकीय परिस्थितीमुळे हिंदू व मुस्लीम इतर संप्रदायांविरोधात लढण्यासाठी एकत्र आले. परंतु, काँग्रेस व खिलाफत चळवळीची युती तुटल्यानंतर काही वर्षांनी हिंदू व मुस्लीम एकमेकांविरोधात मोठमोठ्या हिंसक दंगली करू लागले.
त्या घटनेतून आणखी एक शिकवण मिळते. बहुसंख्याकवाद ही खूपच चंचल व जटिल गोष्ट आहे. तो कसा व कधी बदलेल याचा अंदाज बांधता येत नाही.
यामुळेच बहुधा गांधींनी अल्पसंख्याकांमधील सर्वांत छोट्या समुदायाला सहनशीलता बाळगायला न सांगता बहुसंख्याकवाद दूर ठेवण्यासाठी प्रदीर्घ खटपट केली.
गांधींनी शंभर वर्षांपूर्वी एक इशारा दिला होता. आज बहुसंख्याक समुदाय दुसऱ्यांवर अत्याचार करण्यासाठी एकत्र येत असेल, तर 'कपटनीती व खोट्या धार्मिकतेच्या दबावाखाली येऊन हे ऐक्य कधीतरी तुटून जाईल.'
(दिनयार पटेल यांनी लिहिलेलं दादाभाई नौरोजी यांचं चरित्र अलीकडेच प्रकाशित झालं आहे.)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)