उद्धव ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही, इतर मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात - देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. उद्धव ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही, इतर मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात - देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत मंगळवारी (16 नोव्हेंबर) ते बोलत होते.
"एक मुख्यंमत्री आहेत, त्यांना कुणी मुख्यमंत्री मानत नाही, इतर काही मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात, त्यामुळेच महाराष्ट्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे," अशी टीका फडणवीस यांनी केली.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पण नंतर त्यांनी त्यांच्यावर एकामागून एक निशाणा साधला.
"आमच्या काळात प्रकल्पांवर चर्चा व्हायची. पण आज हर्बल तंबाखू, गांजा यांच्यावर चर्चा होते. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत भ्रष्ट सरकार म्हणून यांची नोंद होईल," अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही बातमी लोकमतने दिली.
2. हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या - नाना पटोले
"भारतीय जनता पक्षात हिंमत असेल तर त्यांनी केंद्र सरकार बरखास्त करून पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात," असं आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
'महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्या,' अशी टीका भाजपने केली होती, त्याच्या प्रत्युत्तरादाखल काँग्रेसनेही त्यांना प्रतिआव्हान दिलं आहे.
CBI, ED, आयकर, NCB यांच्यासारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर कारवाई केली. महाराष्ट्राला बदनाम केलं तरी सरकार पडणार नाही. उलट ते भक्कम झालं आहे, असं पटोले म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
3. विक्रम गोखले आम्हाला वडिलांच्या स्थानी, ते विचार करूनच बोलले असतील - अवधूत गुप्ते
अभिनेत्री कंगना राणावतच्या 'देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं' या भूमिकेला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन दर्शवलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर आता संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांनी गोखले यांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे.
"विक्रम गोखले हे आम्हाला वडिलांच्या स्थानी आहेत. ते विचार करूनच बोलले असतील," अशी प्रतिक्रिया अवधूत गुप्ते यांनी याप्रकरणावर बोलताना दिली.
"गोखले यांनी व्यक्त केलेलं मत संपूर्ण विचाराअंती असावं. त्यावर बोलण्याची माझी पात्रता नाही," असं गुप्ते म्हणाले.
दरम्यान, कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर थेट बोलणं मात्र गुप्ते यांनी टाळलं. ही बातमी पुढारीने दिली.
4. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह येणार पुण्यात
पुणे महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच महापालिकेच्या एका कामासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.
पुणे महापालिका भवनातील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन तर नव्या इमारतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते करण्याचं नियोजन सत्ताधारी भाजपने केलं आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम होईल. ही बातमी ई-सकाळने दिली.
5. शिवसेनेला कुणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही - उदय सामंत
"ही बाळासाहेबांचीच शिवसेना आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशानं विचार करावा इतकं चांगले काम सुरू आहे. त्यामुळे कुणाच्या सर्टिफिकेटची शिवसेनेला आवश्यकता नाही," असं प्रतिपादन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, facebook
महाराष्ट्राला पार्ट टाईम मुख्यमंत्री नको, फडणवीसांसारखा फूल टाईम मुख्यमंत्री हवा, असं भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी म्हटलं होतं.
त्यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, "टी. रवी यांना आपण ओळखत नाही. कधी निवडणुका घेतल्या तरी महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकणार. त्यामुळे टी. रवी यांची दखल घ्यावी असं मला वाटत नाही." ही बातमी लोकसत्ताने दिली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








