सूर्यवंशीचा 100 कोटींचा गल्ला, हिट सिनेमाच्या फॉर्म्युल्याबद्दल अक्षय कुमार म्हणतो...

अक्षय कुमार

फोटो स्रोत, Unviersal PR

    • Author, सुप्रिया सोगले
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

कोव्हिडचं संकट कमी झाल्यानंतर सिनेमा थिएटर्स सुरू झाली. दिवाळीमध्ये रीलिज झालेल्या अक्षय कुमारच्या सूर्यवंशीने 100 कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला जमवत सिनेसृष्टीला एक नवीन आशा दिलीय.

पण नेमकं काय केलं म्हणजे सिनेमा हिट होईल याचा फॉर्म्युला अजून कोणालाही सापडला नसल्याचं सुपरस्टार अक्षय कुमारचं म्हणणं आहे.

भारतातली सिनेमा थिएटर्स कोव्हिडमुळे जवळपास दीड वर्षं बंद होती. त्यातही महाराष्ट्रातली सिनेमागृह इतर राज्यांच्या तुलनेत उशीरा सुरू झाली.

पण अखेरीस गेल्या महिन्यात महाराष्ट्र सरकारने निम्म्या क्षमतेने थिएटर्स सुरू करण्याची परवानगी दिली. यानंतर प्रेक्षकांना थिएटर्सकडे ओढून आणणारा सूर्यवंशी हा पहिला मोठा सिनेमा होता.

या आधी अक्षय कुमारचाच 'बेलबॉटम' सिनेमा रीलिज झाला होता. पण अनेक राज्यांमधली थिएटर्स तेव्हा बंद असल्याने या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तितकी चांगली कामगिरी झाली नाही.

पण सूर्यवंशीने पहिल्याच आठवड्यात 100 कोटींची कमाई करत सिनेमा निर्मात्यांना दिलासा दिलाय.

100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणारा अभिनेता अक्षय कुमारचा हा 15वा सिनेमा आहे. याआधी एअरलिफ्ट गोल्ड, हॉलिडे, राऊडी राठोड, हाऊसफुल्ल सीरिज, रुस्तम, जॉली LLB, केसरी, टॉयलेट- एक प्रेम कथा या सिनेमांनी 100 कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली होती.

प्रेक्षकांचे आभार मानत अक्षय कुमारने म्हटलंय, "मला इतकं प्रेम दिल्याबद्दल मी लोकांचे आभार मानतो. कोव्हिडच्या साथीतून सावरत आता लोकांना थिएटरला जाऊन, तिकीटं विकत घेत कुटुंबासोबत सिनेमा पहायला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. मी यासाठी प्रेक्षकांचे आभार मानतो."

'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि रणवीर सिंह पाहुणे कलाकार आहेत. अनेक स्टार्स सिनेमात असल्याने फरक पडतो का, यावर बोलताना अक्षय कुमारने सांगितलं, "माझ्यामते स्टार पॉवर असं काही नसतं. खरी पॉवर स्क्रिप्ट आणि स्क्रीनप्लेमध्ये असते."

अक्षयच्या मते अभिनेत्यांपेक्षा दिग्दर्शक आणि लेखक जास्त महत्त्वाचे असतात.

30 वर्षांच्या अभिनय कारकीर्दीत आजवर अक्षय कुमारेने अनेक यशस्वी आणि आठवणीत राहणाऱ्या सिनेमांमध्ये काम केलंय.

अक्षय कुमार

फोटो स्रोत, TWITTER/AKSHAYKUMAR

फोटो कॅप्शन, अक्षय कुमारचा बेलबॉटम सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.

पण नेमकी फिल्म कशामुळे हिट होते, याविषयी बोलताना अक्षयने सांगितलं, "फिल्म यशस्वी होण्याचा फॉर्म्युला कोणाकडेच नाही. सिनेमा कशामुळे चालला यामागचं नेमकं कारण कोणीच सांगू शकत नाही. मी माझ्या करियरवरून सांगतो.

मी पाहिलं की, स्क्रिप्ट चांगली असते, सिनेमा चांगला वाटतो, लोक ट्रायल शोला त्याचं कौतुक करतात पण प्रत्यक्षात तो सिनेमा पहायला कुत्रंही फिरकत नाही. पण काही फिल्मच्या ट्रायलला लोक तोंड लपवून फिरतात, तो सिनेमा कसा आहे हे विचारायच्या फंदातही कोणी पडत नाही आणि असे सिनेमे हिट होतात."

ज्या सिनेमाची निर्मिती हसत-खेळत होते त्याचं नशीब चांगलं असतं, असं अक्षयला वाटतं.

दरवर्षी चार ते पाच सिनेमे करणाऱ्या अक्षय कुमारला बॉलिवूडचा सर्वात यशस्वी सुपरस्टार मानलं जातं. त्याच्या फिल्मची कमाई 100 कोटींच्या पुढे जाते. या 100 कोटींच्या आकड्याने आपल्याला अधिक मोठ्या फिल्म्स करण्यासाठी हुरूप मिळत असल्याचं अक्षय कुमारचं म्हणणं आहे.

अक्षय सांगतो, "मी या फिल्म इंडस्ट्रीत आलोय, इथेच पैसा कमवीन आणि याच फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते गुंतवीन. अनेक नवीन थिएटर्स सुरू व्हावीत अशी माझी इच्छा आहे. आणखी मोठ्या बजेटच्या फिल्म्स तयार व्हाव्या आणि त्यांची कमाई 300-400 नाही तर 800 कोटींपर्यंत जावी. भारतामध्ये क्षमता भरपूर आहे, पण थिएटर्स कमी आहेत."

एखादा सिनेमा किती गल्ला जमवतो यामध्ये महाराष्ट्राची कामगिरी महत्त्वाची असते. आणि सध्या महाराष्ट्र सरकारने 50 टक्के आसन क्षमतेनेच थिएटर्स चालवायला परवानगी दिलेली आहे. पण आपण 100 टक्के क्षमतेने थिएटर्स सुरू करण्याची मागणी सरकारकडे करणार नसल्याचं अक्षय कुमारने सांगितलं.

महाराष्ट्र सरकार नागरिकांचं आरोग्य लक्षात घेत ही पावलं उचलत असून त्यांचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचं त्याने सांगितलं.

अक्षय कुमार

फोटो स्रोत, Unviersal PR

अनेक सिनेमांमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका बजावणाऱ्या अक्षय कुमारला 'जंजीर' सिनेमात अमिताभ बच्चन यांनी साकारलेली पोलिस अधिकाऱ्याची भूमिका सर्वाधिक आवडते. जगदीश राज आणि इफ्तेकारही आपल्याला आवडत असल्याचं तो सांगतो.

या अभिनेत्यांनी पोलिसांची जी प्रतिमा लोकांच्या डोळ्यांसमोर उभी केली, ती आजचे अभिनेतेही साकारण्याचा प्रयत्न करत असल्याचं अक्षय संगतो.

जगदीश राज आणि इफ्तेकार यांनी इतक्या सिनेमांमध्ये पोलिसाची भूमिका केली की, ते त्यांच्या कारमध्ये पोलिसांचा खाकी युनिफॉर्म ठेवत.

90च्या दशकात अक्षय कुमारनेही अनेक सिनेमात पोलिसाची भूमिका केली आणि सुरुवातीच्या काळात तोही पोलिसांची वर्दी आपल्या गाडीत ठेवत असे.

आपल्याला वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांत, वेगवेगळ्या भूमिका करायच्या असून प्रादेशिक सिनेमांमध्ये काम करायचीही आपली तयारी असल्याचं अक्षय सांगतो.

अक्षयने आजवर पंजाबी, कन्नड, तमिळ सिनेमांत काम केलंय. आता फक्त भोजपुरी सिनेमात काम करणं राहिलं असून चांगली ऑफर आल्यास आपण प्रादेशिक सिनेमात नक्की काम करू, असं अक्षयने म्हटलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)