तब्बू : चित्रपटात मुख्य भूमिकेत नसली तरी ती केंद्रस्थानी असते

तब्बू

फोटो स्रोत, Instagram Tabu

    • Author, सुंदरम आनंद
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

"वय तिचा प्रभाव कमी करू शकत नाही, किंवा परंपरांची बंधनंही तिच्या गुणांची झळाळी झाकू शकत नाही," असं शेक्सपिअरनं 'अँटनी अँड क्लियोपेट्रा' मध्ये नायिका क्लियोपेट्रासाठी लिहिलं आहे.

शेक्सपिअरच्या या ओळींना खरं ठरवणारं व्यक्तिमत्वं आपण बॉलिवूडमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या नजरा नकळत तब्बूवर जाऊन थांबतात.

चार दशकांपासूनच्या सिने कारकिर्दीत ग्लॅमर आणि गांभीर्य, लोकप्रियता आणि अभिनयातील दर्जा, हास्य आणि करुण रस असलेला अभिनय अशा दोन्ही टोकांचं संतुलन राखत, तिनं काळ आणि नियमांच्या बंधनांची चौकट तोडत तिची यशोगाथा लिहिली आहे.

योगायोगाने बनली अभिनेत्री

तबस्सूम हाश्मी म्हणजेच तब्बू ही हैदरबादच्या एका सुशिक्षित कुटुंबात लहानाची मोठी झालेली. त्यांच्या नात्यातील शबाना आझमी यांनी सिनेमाध्ये तोवर पाय रोवले होते. शिवाय मोठी बहीण फराह हाश्मीचा ओढाही सुरुवातीपासून चित्रपटांकडेच होता.

तब्बूला सिनेसृष्टीबद्दल कधीही आकर्षण नव्हतं. मात्र, 'बाझार' (1982) चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेनं आणि नंतर देवानंदच्या 'हम नौजवान' (1984) चित्रपटामुळं नकळत तब्बूची पावलं चित्रपट सृष्टीकडे पडत गेली.

'टेलिग्राफ'ला दिलेल्या एका मुलाखतीत तब्बूनं स्वतः याबाबत सांगितलं आहे. "मला कधीही अभिनेत्री बनण्याची इच्छा नव्हती. हे केवळ योगायोगानं घडलं. कदाचित त्यामुळंच अभिनय क्षेत्रात कुणी माझं आदर्श नव्हतं किंवा मी कुणासारखा अभिनय करण्याचा प्रयत्न (रेफरन्स पॉइंट) केला नाही."

यशाच्या मार्गावर आगेकूच

तब्बूला पहिला लीड रोल बोनी कपूर यांनी 'प्रेम' (1995) या चित्रपटाद्वारे दिला. पण मोठ्या पडद्यावर प्रमुख अभिनेत्री म्हणून व्यंकटेश बरोबर तेलुगू चित्रपट 'कुली नं 1' (1991 ) मध्ये ती झळकली होती. तर तब्बूला मिळालेलं यश किंवा पहिला हिट चित्रपट 'विजयपथ' (1994 ) हा ठरला.

तब्बू

फोटो स्रोत, Getty Images

अजय देवगण बरोबरच्या या चित्रपटासाठी तब्बूला 'बेस्ट डेब्यू अॅक्ट्रेस' चा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

त्यानंतर 'हकिकत' (1995), 'साजन चले ससुराल' (1996 ), 'जीत' (1996), 'बॉर्डर' (1997), 'चाची 420' (1998), 'बीवी नं 1' (1999), 'हम साथ-साथ हैं' (1999) अशा यशस्वी चित्रपटांनी तब्बूला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली.

गंभीर अभिनयातील हातखंडा

नव्वदीनंतर तब्बू ही एक यशस्वी अभिनेत्री बनली होती. त्यानंतर पंजाबमधील कट्टरवादाच्या समस्येवर आधारित गुलजार यांचा 'माचिस' (1996) चित्रपट आणि ब्रिटिश काळातील घटनांवर आधारित कमल हसन यांनी लिहिलेला आणि प्रियदर्शन यांनी निर्मिती केलेल्या 'कालापानी' (1996) हा मल्याळी चित्रपट या दोन चित्रपटांनी तब्बूच्या अभिनयातील खरी कमाल प्रेक्षकांसमोर आणली.

'माचीस' चित्रपटात 'वीरां' या शीख तरुणीच्या भूमिकेसाठी तब्बूला 'सर्वोत्तम अभिनेत्री'चा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. तर त्यानंतर दुसऱ्याच वर्षी तब्बूनं प्रियदर्शन यांच्या 'विरासत' (1997) चित्रपटात 'गहना' या गावातील एका साध्या मुलीची भूमिका ज्या पद्धतीनं साकारली ती पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

तब्बू

फोटो स्रोत, @Tabu

प्रत्येक चित्रपटानंतर तब्बूचा अभिनय अधिकाधिक खुलत चालला होता. तब्बूच्या अभिनयातील सहजपणा आणि दर्जा मधुर भंडारकरच्या प्रसिद्ध 'चांदनी बार' (2001) चित्रपटात पाहायला मिळाला. 'मुमताज' या बार डान्सरचं पात्र तिनं एवढ्या बारकाईनं साकारलं केलं होतं की, आजही हा अभिनय 'मेथड अॅक्टिंग'मधील आदर्श समजला जातो.

या पात्रासाठी तब्बूला दुसऱ्यांदा 'सर्वोत्तम अभिनेत्री'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

अष्टपैलू अभिनेत्री

तब्बू एक उत्तम अभिनेत्री आहे यात कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. मात्र, भाषा, विषय आणि पात्रांचं वैविध्य असलेल्या चित्रपटांमुळं तब्बूचं एक वेगळं स्थान निर्माण झालं आहे.

तब्बू

फोटो स्रोत, @Tabu

तब्बूनं तेलुगू, तमिळ, मराठी अशा भारतीय भाषांमधील चित्रपट तर केलेच, त्याचवेळी 'द नेमसेक' (2006), 'लाइफ ऑफ पाय' (2012) असे आंतरराष्ट्रीय चित्रपटही केले.

एका बाजुला अभिनेत्री म्हणून तिनं शेक्सपिअर (मकबूल आणि हैदर) चार्ल्स डिकेंस (फितूर), जेन ऑस्टिन (कंडूकोंडेन कंडूकोंडेन) अशा दर्जेदार रचनांवर आधारित चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याचवेळी 'हेरा-फेरी' (1999) आणि 'गोलमाल अगेन' (2017) सारख्या हलक्या - फुलक्या चित्रपटांनाही तब्बूनं कमी लेखलं नाही.

तब्बूनं साकारलेल्या पात्रांचा विचार करता, 'अस्तित्व' (2000) मधील द्विधा मनस्थितीतील गृहिणी 'अदिती पंडित' पासून ते 'चीनी कम' (2007) मधील प्रचंड आत्मविश्वास असलेली 'नीना वर्मा' पर्यंत आणि 'मकबूल'(2004) मधील कारस्थानी 'निम्मी' पासून ते 'दृश्यम'(2105) मधील कटोर पोलीस अधिकारी 'मीरा देशमुख' पर्यंत किंवा 'हैदर'(2014) मधील गूढ 'गझाला मीर' पासून 'अ सूटेबल बॉय' (2020) मधील आकर्षक 'सईदा बाई' पर्यंत, तिनं साकारलेल्या भूमिकांमध्ये प्रचंड वैविध्य आढळतं.

या सर्व चित्रपटांमधील तब्बूच्या अभिनयाचा बारकाईनं विचार करता, विषय समजून घेण्याबरोबर सहअभिनेत्यांबरोबर अभिनय करताना क्रिया-प्रतिक्रियांच्या माध्यमातून जीवंतपणा निर्माण करण्याची क्षमता त्यात आढळून येते. या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळं चित्रपटालाही एक वेगळी उंची प्राप्त होते.

त्यामुळंच 'लाइफ ऑफ पाय'चं दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध आतंरराष्ट्रीय दिग्दर्शक आंग ली यांनी तब्बू ही 'जागतिक सिनेसृष्टीची संपत्ती' असल्याचं म्हटलं आहे.

तब्बूचं यश

तब्बूनं वयाची पन्नाशी पार केली आहे. दोन राष्ट्रीय पुरस्कार, सहा फिल्मफेअर पुरस्कार आणि 'पद्मश्री' चा साज असलेल्या चार दशकांची तिची सिने कारकिर्द आजही चांगल्या पद्धतीनं सुरू आहे.

तब्बू

फोटो स्रोत, @Tabu

अभिनयाचा विचार करता शिखरावर असेलली तब्बू व्यावसायिक जीवनात तेवढीच विनम्र आहे. अचूक अभिनयासाठी 'इम्प्रुव्हायजेशन' आणि 'अफेक्टिव्ह मेमरी' दोन्ही गरजेचं असतं, हा ली स्ट्रासबर्ग यांचा अभिनयाचा सिद्धांत तब्बूच्या अभिनयाद्वारे अनेकदा खरा असल्याचं जाणवतं.

त्यामुळंच शेक्सपिअर आणि डिकेन्स न वाचताही तब्बूला त्या रचनांवर आधारित पात्रांना पुन्हा जीवंत करण्यात यश येतं. शिवाय त्यामुळंच एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भाषांमधील आणि अत्यंत भिन्न विषयांवरील चित्रपटात सर्वोत्तम अभिनय करण्यात तिला यश येतं.

चित्रपटात मुख्य भूमिका नसली तरी तिच्या अभिनय क्षमतेमुळं केंद्रस्थानी तब्बूच असते.

उदाहरण द्यायचं झाल्यास हॅमलेटवर आधारित 'हैदर' मध्ये आई गझाला मीर (गरट्रूड) च्या सहाय्यकाच्या भूमिकेत होती. पण तिचा अभिनय पाहिल्यानंतर 'द न्यूयॉर्क टाइम्स' नं - "चित्रपटाचं नाव हैदर ऐवजी गझाला असायला हवं होतं," असं म्हटलं होतं.

'माचीस' आणि 'हु-तू -तू' नंतर गुलजार यांनी तब्बू ही मीनाकुमारी आणि नूतन सारखी 'समजदार' अभिनेत्री असल्याचं मह्टलं होतं.

'सोफीज चॉइस' (1982), 'आउट ऑफ आफ्रिका' (1985), 'द आयर्न लेडी' (2011) अशा अविस्मरणीय चित्रपटांत मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्धी हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांच्या अभिनयात विषय, संदर्भ आणि भाषेतील बारकावे लक्षात घेऊन भावना पडद्यावर उतरवण्याची क्षमता पाहायला मिळते.

तेच वैशिष्ट्य तब्बूच्या अभिनयातही पाहायला मिळतं. कदाचित त्यामुळंच मीरा नायर यांनी 'टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'च्या मंचावर तब्बूला 'भारतीय सिनेसृष्टीची मेरिल स्ट्रीप' म्हटलं होतं.

तब्बूने 'टेलिग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत त्याबाबत अत्यंत विनम्रपणे उत्तर दिलं होतं. "अभिनय हा माझ्यासाठी एखाद्या अनुभवासारखा आहे. तो सहज घडतो," असं तिनं म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)