समीर वानखेडेंविरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रार : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. समीर वानखेडेंविरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रार
समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी केलेल्या विविध आरोपांनंतर आता त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे. त्यांच्यावरील जातीचा खोटा दाखल केल्याच्या आरोपावरून भीम आर्मी भारत एकता मिशननं जात पडताळणी समितीकडं तक्रार केली आहे.
समीर वानखेडे यांनी जातीचा खोटा दाखला सादर करून नोकरी मिळवली. त्यामुळं आरक्षित वर्गातील एका उमेदवाराची हक्काची नोकरी हातून गेली, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
वानखेडे हे मागासवर्गीय नसून त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा बळकावली आहे. त्यामुळं जात पडताळणी विभागाकडे त्यांची तक्रार केल्याचं, भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक कांबळे यांनी सांगितलं.
वानखेडेंसारख्या अनेक बनावट अधिकाऱ्यांनी हुशार आणि गरीब विद्यार्थ्यांच्या जागा बळकावल्या आहेत. त्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशाराही संघटनेनं दिला आहे.
न्यूज 18 लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
2. बॉम्ब फोडण्यापेक्षा दिल्लीत जाऊन तोंड उघडा, रोहित पवारांचा फडणवीसांना चिमटा
नवाब मलिक यांनी आरोपांच्या मालिकेमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही गंभीर आरोप केले आहेत. त्यावर उत्तर देताना मलिकांनी लवंगी फटाका फोडला आहे. मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, असं म्हणत फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
फडणवीस यांच्या या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी चिमटा काढला आहे. दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याऐवजी दिल्लीत जाऊन तोंड उघडावं, म्हणजे लोकांची कामं होतील, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
पवार कुटुंबावर होत असलेल्या कारवाईवरही रोहित पवारांनी टीका केली. अशा प्रकारे ईडी आणि सीबीआयच्या कारवायांना पवार कुटुंब घाबरणार नाही? पवारांविरोधात ट्रकभर पुरावे आणणार होते, त्याचं काय झालं? असंही रोहित पवार म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जनतेच्या हितासाठी चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यामुळं विरोधकांचा पोटशूळ उठला असल्याचा आरोपही रोहित यांनी केला आहे.
टीव्ही 9 मराठीनं हे वृत्त दिलं आहे.
3. आधीच्या सरकारनं कब्रस्तानच्या भींतीच बांधल्या- योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर केलेल्या भाषणामध्ये पुन्हा एकदा स्मशानभूमी आणि कब्रस्तानचा उल्लेख केलाय.

फोटो स्रोत, LUDOVIC MARIN/GETTY IMAGES
आधीच्या सरकारनं केवळ कब्रस्तानांच्या भींती बांधल्या. मात्र उत्तर प्रदेशचं सरकार सध्या मंदिरांची सजावट, निर्मिती यासाठी पैसा खर्च करत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
अयोध्येत दीपोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात योगींनी हे वक्तव्य केलं आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर केलेल्या या वक्तव्याकडे राजकीय दृष्टीनं पाहिलं जात आहे.
अयोध्येतील राम मंदिराचाही योगींनी उल्लेख केला. हे मंदिर उभं करण्यात आता जगातली कोणतीही शक्ती अचडण निर्माण करू शकत नाही, असं योगी म्हणाले.
लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
4. सरकारने भीतीपोटी केली इंधन दरकपात - प्रियंका गांधी
दिवाळीच्या तोंडावर सरकारनं उत्पादन शुल्कामध्ये कपात केल्यानं इंधनांचे दर काहीसे कमी होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळं पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 10 रुपये प्रतिलीटरनं स्वस्त होणार आहे.
मात्र, मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. सरकारनं लोकांसाठी मनापासून हा निर्णय घेतलेला नसून, भीतीपोटी घेतला असल्याचं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी म्हटलं आहे.
वसुली सरकारला आगामी निवडणुकांमध्ये त्यांनी केलेल्या लुटीचं उत्तर मिळेल, असंही प्रियंका गांधींनी म्हटलं आहे.
केंद्रानं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानं, राज्यांनीही यावरील व्हॅट कमी करावा असं आवाहन राज्य सरकारला अर्थ मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलं आहे.
लोकमतनं याबाबत वृत्त दिलं आहे.
5. सरकार पाच वर्षं चालू शकते तर शेतकऱ्यांचे आंदोलन का नाही - राकेश टिकैत
शेतकरी आंदोलनाचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सरकार पाच वर्षं चालू शकतं, तर शेतकरी आंदोलनही सुरू राहू शकतं असं टिकैत म्हणाले. एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गाझीपूर याठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ "दो दिये, शहिदों के लिए" या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. राकेश टिकैत यांनी याठिकाणीच शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी केली.
सरकारनं यापूर्वी शेतकऱ्यांबरोबर 22 जानेवारी रोजी अखेरची चर्चा केली होती. शेतकऱ्यांनी सरकारला 26 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या दिवशी आंदोलनाला एक वर्षं पूर्ण होणार आहे.
आंदोलकांच्या संख्येबाबत बोलताना शेतकरी ट्रॅक्टरसह दोन तासांच्या स्टँडबाय मोडवर आहेत. गरज असेल तेव्हा ते आंदोलन स्थळी पोहोचतील. त्यामुळं गर्दी पेक्षा लोकांची मतं आणि विचार महत्त्वाचे आहेत, असं टिकैत म्हणाले.
शेतकरी संघटनांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद असल्याचा मुद्दाही त्यांनी खोडून काढला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








