You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जय भीम फेम अभिनेता सूर्या आणि दिग्दर्शकाला नोटीस
'जय भीम' चित्रपटातील बदनामीकारक दृश्यं काढून टाकून विनाअट माफी मागावी अशी कायदेशीर नोटीस अभिनेता सूर्या आणि दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल यांना मिळाली आहे.
या चित्रपटाशी संबंधित व्यक्तींनी वन्नियार समाज आणि या समाजातील माणसांविरोधातील खोटी, द्वेषमूलक आणि बदनामीकारक वक्तव्यं करणे थांबवावे तसंच प्रसारणही थांबवावं असं या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. 5 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणीही करण्यात आली आहे.
चित्रपटात दाखवण्यात आलेले प्रसंग खऱ्याखुऱ्या कथेवर बेतलेले असले तरी राजकन्नूचा छळ करणारा पोलीस हा जाणीवपूर्वक वन्नियार जातीचा दाखवण्यात आल्याचा आरोप नोटिशीत करण्यात आला आहे.
खऱ्या कथेत कच्च्या कैद्याच्या तुरुंगात झालेल्या मृत्यूमध्ये सहभागी पोलीस अधिकारी धर्माने ख्रिश्चन आहे, असं नोटिशीत म्हटलं आहे.
चित्रपट तयार करणाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक वन्नियार आहे हे दाखवण्यासाठी वन्नियार संगमशी संबंधित प्रतीक अग्नीकुंडम दाखवण्यात आल्याचं म्हटलं आहे.
वन्नियार संगमच्या सदस्यांची बदनामी तसंच समाजाच्या प्रतिष्ठेची हानी करण्याच्या दुष्ट हेतूने करण्यात आल्याचा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, सूर्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. "मी फक्त माझं कर्तव्य बजावलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या उत्कर्षासाठी हातभार लावणे हे माझे काम आहे. मला संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळत आहे. एखाद्याला केवळ प्रसिद्धीसाठी बदनाम करण्याची मला आवश्यकता नाही. आपण आपल्या आपल्या मार्गाने समता आणि बंधुत्वासाठी लढू," असे सूर्याने म्हटले आहे.
वन्नियार समाजाचा अपमान केल्याप्रकरणी अभिनेता सूर्या आणि पट्टाली मक्काल काटची (पीएमके) यांच्यात संघर्ष झाला.
तामिळनाडू राज्यात मायिलादुथुराई इथे चित्रपटाचं प्रदर्शन पीएमकेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं.
तामिळ सुपरस्टार सूर्या याचा हा चित्रपट दिवाळीच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. दुसरीकडे या चित्रपटावर वादही निर्माण झाला आहे.
तामिळनाडूमध्ये 1993 साली घडलेल्या एका घटनेवर 'जय भीम' हा चित्रपट बेतलेला आहे.
सिनेमातील एका सीनवर आक्षेप घेतला जात असून तो काढून टाकावा अशी मागणी अनेकांनी केली आहे.
प्रकाश राज यांनी सिनेमातील एका सीनमध्ये हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीच्या कानाखाली लगावली आहे. 'मला का मारले?' असा प्रश्न ती व्यक्ती विचारते. त्यावर प्रकाश राज यांचं पात्र 'तामिळमध्ये बोल' असं म्हणतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)