मांसाहारी पदार्थ रस्त्यावर विकण्यावरून गुजरातमध्ये वादंग, कारण...

फोटो स्रोत, ANI
- Author, तेजस वैद्य
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
रस्त्यावर अंडी तसंच मांसाहारी पदार्थ विकू न देण्याचा गुजरातमधील बडोदा, राजकोट, भावनगर आणि जुनागढ इथल्या भाजपशासित महापालिकांचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
मांसाहारी पदार्थ रस्त्यावर विक्रीस ठेवल्याने लोकांच्या धार्मिक दुखावतात असा युक्तिवाद भाजपच्या काही नेत्यांनी केला आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बडोदा महापालिकेने हा निर्णय लागू केल्याच्या 24 तासांच्या आत तो रद्दबातल केला. शहरातील रस्त्यांवर अंडी तसंच मांसाहारी पदार्थ विकण्याला परवानगी असेल.
काही बातम्यांनुसार, महापालिकांमधील सत्ताधारी पक्षाने लिखित परिपत्रक जारी करण्याऐवजी अधिकाऱ्यांना यासंदर्भात तोंडी सूचना दिल्या आहेत.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर. पाटील यांनी संबंधित महापालिकांनी घेतलेले निर्णय हे त्या संस्थांचे वैयक्तिक निर्णय असून, पक्षाशी त्याचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
ते म्हणाले, "राजकोट आणि जामनगरमधील स्थानिक प्रशासनाशी मी बोललो आहे. रस्त्यावर विक्रीसाठी उपलब्ध असलेले अंडी तसंच मांसाहार पदार्थ हटवू नका अशा सूचना दिल्या आहेत. हा तिथल्या नेत्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. संपूर्ण राज्यात अशा निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही. या निर्णयाचा आणि भाजपचा पक्ष म्हणून काहीही संबंध नाही".
वाद निर्माण झाल्यानंतर गुजरातचे महसूल मंत्री राजेंद्र त्रिवेदी म्हणाले की, "पदपथावर गाड्या मांडण्याचा कोणालाही अधिकार नाही. पदपथ हा पादचाऱ्यांसाठी असतो.
पदपथावर कोणतंही अतिक्रमण येता कामा नये. पदपथावर किंवा रस्त्याच्या बाजूला कोणते पदार्थ विकले जातात हे महत्त्वाचं नाहीये. पदपथावरच्या हातगाड्या हटवायला हव्यात", असं ते म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
रस्त्यांवरच्या गाड्या हटवण्याच्या महापालिकेच्या निर्णयांचं त्यांनी स्वागतच केलं.
वादानंतर बडोदयाच्या उपमहापौर नंदा जोशी यांनी सांगितलं की, "महिला आणि मुलांना रस्त्यावर मांसाहारी पदार्थ शिजवल्यामुळे डोळ्यांना त्रास होत असल्याचं सांगितलं. तक्रार दाखल झाल्यानंतर यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. मांसाहारी पदार्थ नीट झाकले जातील अशा सूचना देण्यात आल्या. स्वच्छतेचं पालन केलं जातंय ना याकडेही लक्ष पुरवण्यात येईल."
नव्या वर्षाची कठीण सुरुवात
निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर राजकोटमधल्या फूलछाब चौकातील अंडी विकणाऱ्या गाड्यांना हटवण्यात आलंय.
हातगाड्या हटवण्यात आल्या त्यावेळी राजकोटचे उपायुक्त ए.आर.सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "लोकांना रस्त्यावर गाड्या आवडत नाहीत. या गाड्यांमुळे वाहतुकीचाही खोळंबा होतो".
हबीब गनी यांच्या पुतण्याची लॉरी अर्थात हातगाडीही हटवण्यात आली. हबीब यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "दिवाळीच्या सुट्टीनंतर लाभ पंचम अर्थात हिंदू परंपरेनुसार पाचव्या दिवशी व्यवसायाला सुरुवात झाली. मात्र त्याचदिवशी अधिकाऱ्यांनी गाड्या हटवल्या. ज्या ठिकाणी चाळीस पन्नास वर्ष गाड्या उभं राहत आहेत त्यांनाही हटवण्यात आलं."
5 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटलं होतं की मांसाहाराची आवश्यकताच नाही. प्राण्यांना मारता कामा नये. मानवी शरीरासाठी शाकाहार उत्तम आहे.
राजकोट इथल्या स्वामीनारायण मंदिरात आयोजित दिवाळी अन्नकूट फेस्टिव्हलदरम्यान ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शाकाहारी गुजरात
मांसाहार प्रतिबंध हा गुजरातमधला सगळ्यांत चर्चित मुद्दा आहे. गुजरात शाकाहारी राज्य अशी प्रतिमा आहे.
वैष्णव आणि जैन धर्माच्या प्रभावामुळे गुजरात हा प्रामुख्याने अहिंसक असल्याचं प्रसिद्ध अन्न तज्ज्ञ डॉ. पुष्पेश पंत यांनी सांगितलं. पण हे किती प्रमाणात खरं आहे याची पडताळणी केली पाहिजे.
गुजरातमध्ये मांसाहार कोण करतं?
जात किंवा समाज-उपपंथ प्रमाणे अन्नाचंही राजकारण असतं. राजकीय पक्षाचे नेते किंवा एखादा धार्मिक गट ठराविक पदार्थ खाण्याची किंवा न खाण्याची शिफारस करतो तेव्हा त्यामागचं राजकारण समजून घेणं सर्वसामान्य माणसासाठी अवघड आहे.
प्रसिद्ध पत्रकार वीर संघवी लिहितात, भारत कधीच शाकाहारी देश नव्हता. भारतात शाकाहार हिंदू नव्हे तर जैन धर्मामुळे प्रचलित आहे.
जैन धर्मीयांसाठी पवित्र अशा पर्युषण काळात कत्तलखाने बंद असावेत अशी मागणी गुजरातमध्ये केली जाते.

फोटो स्रोत, Mint
गुजरातमध्ये ओबीसी अंतर्गत 147 उपजातींचा समावेश होतो.
गुजरातमधल्या भटक्या आणि विमुक्त जमातींसाठी गेली अनेक वर्षं काम करणाऱ्या मितल पटेल यांनी सांगितलं की, "भटक्या तसंच विमुक्त जमातींपैकी 70 टक्के मांसाहार करतात. यामध्ये ठाकोर, नाट, बजानिया, छारा, वाडी, सरनिया यांचा समावेश आहे. मांसाहार करणाऱ्यांचं प्रमाण जास्त असलं तरी गुजरातची शाकाहारी ही प्रतिमा जैन आणि वैष्णव पंथाच्या प्रचारामुळे झाली आहे".
समाजशास्त्रज्ञ गौरांग जानी यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "जैन समाजाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. जैन आणि वैष्णव हे समाज लोकसंख्येने लहान असले तरी त्यांची व्यवसाय आणि राजकीय व्यवस्थेवरची पकड मजबूत आहे. म्हणूनच शिक्षणात, सांस्कृतिक तसंच साहित्यिक ठिकाणी शाकाहारी मंडळी मोठ्या संख्येने दिसतात".
समुद्री आहाराचं केंद्र
गुजरातला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे समुद्रातून मिळणाऱ्या पदार्थांचं गुजरात मोठं आगार आहे.
पारसी, आदिवासी, क्षत्रिय आणि समुद्राशी संलग्न समाजांसाठी मांसाहार हा आहाराचा अविभाज्य भाग आहे. त्यांचे मांसाहारी पदार्थ लोकप्रिय आहेत.

फोटो स्रोत, NurPhoto
गौरांग जानी सांगतात की, "समुद्राजवळ राहणारी माणसं वर्षानुवर्ष मांसाहार करत आहेत. पण विदेशात व्यवसाय करणारे वाणी आणि जैन आहेत. या मंडळींनी समुद्रानजीक राहणाऱ्यांचं आयुष्य कसं असतं याबाबत सांगितलेलं नाही.
अंबाजी ते अहावा एवढा परिसर आदिवासींचा आहे. ही मंडळी मांसाहार करतात.
गुजराती माणसं म्हणजे व्यापार-व्यवसाय करणारी अशी प्रतिमा आहे. समाजातील धुरिणांनी आदिवासी किंवा समुद्राजवळ राहणाऱ्यांबद्दल भाष्यच केलेलं नाही".
गेल्या 200 वर्षांत गुजरातमध्ये स्वामीनारायण पंथाचा प्रसार सामाजिक आणि राजकीय जीवनात मोठ्या प्रमाणावर झाला आहे.
गुजराती थाळीत मांसाहार?
स्वातंत्र्यापूर्वी अनेक संस्थानं गुजरात आणि काठियावाडमध्ये होती. स्वातंत्र्यापूर्वी शिकार करणं हा गुन्हा नव्हता. शिकार केलं गेलेल्या प्राण्यांपासून राजघराण्यांच्या शाही मुदपाकखान्यात खास पदार्थ तयार केले जायचे.
गुजरातमध्ये समुद्रात मिळणाऱ्या पदार्थांपासून लोणची तयार केली जातात.

फोटो स्रोत, Getty Images
इराणहून गुजरातमध्ये स्थायिक झालेली पारशी मंडळींनी गोश्त आणि कबाबासारखे पदार्थ आणले.
धनसाक हा वैशिष्ट्यपूर्ण पारसी पदार्थ मटण आणि धान्य तसंच भाज्या एकत्र करूनच बनवला जातो.
पारसी समाज गुजरातला समुद्रामार्गे आला. त्यामुळे त्यांच्या आहारात माशाला मोठं महत्त्व आहे. त्याचं पत्रानी मच्छी हे व्यंजन अतिशय प्रसिद्ध आहे.
वीर संघवी यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "देशातल्या सर्वोत्तम मांसाहारी पदार्थांपैकी काही गुजरातचे आहेत. खोजा, मेमन या मुस्लीम समाजातील मंडळींची ती देणगी आहे."

फोटो स्रोत, The India Today Group
उच्चवर्णीयांच्या प्रभावामुळे शाकाहारी गुजराती थाळी प्रसिद्ध झाली आहे.
गुजराती थाळीतही मांसाहारी पदार्थ असतात. पण याचा उल्लेख कुठेही केला जात नाही. गुजराती वाहिन्यांवरच्या खाद्यपदार्थांविषयीच्या कार्यक्रमांमध्येही मांसाहारी पदार्थ कसे तयार करायचे हे दाखवत नाहीत.
शाकाहार, मांसाहार आणि राजकारण
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी राजकारण केलं जातं, असं हबीब गनी सांगतात.
2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकामुळे आमच्या हातगाड्या रस्त्यावरून हटवण्यात आल्या.
गांधीजी हे जन्माने वैष्णव होते. ते शाकाहाराचं पालन करायचे. दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यादरम्यानही त्यांनी शाकाहाराचंच पालन केलं. त्यांनी सुरू केलेल्या एका मासिकाचं नावही शाकाहार असं होतं.
ते शाकाहाराचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यामुळे समाजातल्या एका वर्गाला लोकांनी अंडी, मच्छी, मटण खाऊ नये असं वाटतं.
गौरांग जानी सांगतात की, गांधीजींनी शाकाहाराला प्रोत्साहन दिलं. पण मांसाहार करणाऱ्या लोकांवर टीका केली नाही. लोकांचं चारित्र्य आणि मांसाहार असा संबंध त्यांनी कधीही जोडला नाही.
गौरांग यांच्या मते, हिंदुत्वाच्या वाढीसाठी येणारी पढी मांसाहारापासून दूर राहणं हे राजकारणाला हावंच आहे.
त्यामुळे शाकाहाराची राजकीय संदर्भातून मांडणी केली जाते.
गुजरातमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा गुजराती संस्कृतीपेक्षाही मोठा आहे. काश्मीर, महाराष्ट्र, बंगाल या राज्यांमध्ये ब्राह्मण समाजाची माणसंही मांसाहार करतात पण कोणीही आक्षेप घेत नाही.
द रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने 2014 सँपल रजिस्ट्रेशन सिस्टमचा अहवाल जारी केला. त्यानुसार गुजरातमध्ये 61.80 टक्के नागरिक शाकाहारी आहेत. 39.05 टक्के लोक मांसाहार करणारे आहेत. याचा अर्थ प्रत्येक पाच लोकांपैकी दोनजण मांसाहार करणारे आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








