कंगनाचं ते वक्तव्य चुकीचं, पण मोदी सरकारबाबतची भावना काही अंशी बरोबर-चंद्रकांत पाटील #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. कंगनाचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं, पण मोदी सरकारबाबतची भावना काही अंशी बरोबर - चंद्रकांत पाटील

'देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले' असे वाद्गग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावतने केलं होतं.

तिच्या वक्तव्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असताना आहेत. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले, "कंगना राणावतच्या भावना नेमक्या काय आहेत मला माहीत नाही. पण तिचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे. देशाच्या स्वातंत्र्यावर नकारात्मक टिप्पणी करण्याचा अधिकार कुणालाही नाही."

"पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे मोदी सरकारबाबत तिची भावना काही अंशी बरोबरही आहे," असं पाटील यावेळी म्हणाले. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

2. राज्यात एसटी पुन्हा धावण्यास काही प्रमाणात सुरुवात

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. गेले तीन दिवस एसटीचा संप 100 टक्के सुरू होता. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर कालपासून कर्मचारी मोठ्या संख्येने कामावर परतत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

शुक्रवारी (12 नोव्हेंबर) एकूण 17 डेपोंमधून बस सोडण्यात आल्या. त्यांमधून 800 पेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला, असं चन्ने यांनी सांगितलं.

काही ठिकाणी राज्यात एसटी तसंच खासगी बसवर दगडफेक करण्यात आली. त्या प्रकरणी राज्यभरात 36 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असं चन्ने यांनी सांगितलं.

दरम्यान, आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांची संख्याही कमी झाल्याचं दिसून आल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याचं म्हटलं जात आहे. ही बातमी लोकमतने दिली.

3. एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे-शरद पवार यांच्यात चर्चा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्हे दिसत नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे यांसंदर्भात मैदानात उतरल्याचं शुक्रवारी (12 नोव्हेंबर) दिसून आलं.

एसटी कर्मचारी संघटनेतील काही प्रतिनिधींनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या अडचणी मांडल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

शुक्रवारी ठाकरे हे पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले.

त्यानंतर राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास तासभर महत्वपूर्ण चर्चा झाल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

4. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या नादाला लागू नका, संजय राऊत यांचा जे. पी. नड्डा यांना सल्ला

महाराष्ट्रातील सध्याच्या भाजप नेत्यांच्या नादाला लागू नका, अन्यथा राज्यातला उरला-सुरला भाजपदेखील नष्ट होईल, असा सल्ला शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दिला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून टाका, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र भाजपा नेते-पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राऊत यांनी वरील वक्तव्य केलं.

आम्ही पाहिला तो भाजप आणि आताचा भाजप यांमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. जे. पी. नड्डा यांना मी कायम एक संयमी आणि सुसंस्कृत नेते म्हणून पाहिलं आहे. त्यांच्या कानात भाजपाच्या काही कपटी, कारस्थानी लोकांनी काही सांगितलं असेल तर त्यांच्या नादी लागू नये. अन्यथा महाराष्ट्रात उरला-सुरला भाजपादेखील नष्ट होईल, असं संजय राऊत म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली.

5. 'अधिकारी, राजकारणी, श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावी, मग आमच्या पोरांनी का मराठीत शिकावं?'

अधिकारी, राजकारणी, श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावी, मग आमच्या पोरांनी का मराठीत शिकावं? असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विचारला आहे.

मुंबईत मराठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री बच्चू कडू बोलत होते.

मराठी शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा सुधरवण्यासाठी पालकांची, विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि नेत्यांची मानसिकता बदलवण्याची गरज आहे. यासाठी कठोर निर्णय आणि त्याग करावा लागेल असं कडू यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "राजकारणी भाषणं करतात मराठीवर बोलतात मात्र आपली पोरं इंग्रजी शाळेत शिकवतात. आता गरीबाच्या पोराला देखील अक्कल आली आहे. श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावं मग आम्ही मराठीत का घालावं, अशी भूमिका कडू यांनी मांडली. ही बातमी एबीपी माझाने दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)