अनिल परब : 'सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर ST कामगारांना भडकवत आहेत'

अनिल परब

फोटो स्रोत, ADV. ANIL PARAB/FACEBOOK

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांचा संप भडकवण्याचं काम करत असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय.

कर्मचाऱ्यांनी सरकारला सहकार्य करावं आणि संप मागे घ्यावा, असं आवाहन परब यांनी केलंय. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात येणार असल्याचंही परब यांनी म्हटलंय.

आंदोलन वेगळ्या दिशेने नेलं जात असल्याचंही परब म्हणाले.

"विरोधक या संपात आपली पोळी भाजून घेत आहेत, भाजपने कामगारांना भडकवलं आहे, त्यांना माहीत आहे त्यांनी चुकीची मागणी लावून धरली आहे म्हणून ते आता भरकटवण्यासाठी काहीही आरोप करतील, काहीही विषय काढतील," असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.

संप भडकल्याने एसटीचं आणखी नुकसान होत असल्याचंही परब यांनी म्हटलंय.

अनिल परब म्हणाले, "विलीनीकरणाच्या मागणीसाठी त्यांनी समितीसमोर जावं. कामगारांनी कामावर जावं. राजकीय पक्ष पोळी भाजून बाहेर जातील पण नुकसान तुमचं होईल. खोत, पडळकर संप भडकवण्याचे काम करतायत. एसटी आणखी खड्ड्यात जाईल, असं वागू नका. माझ्यावर टीका करा, पण कामगारांचे नुकसान करू नका. हे कामगारांच्या पाठिशी उभे राहणार नाहीत "

आझाद मैदानावर जायची आपली तयारी आहे, पण त्यांनी अडेलतट्टू भूमिका घेतल्यास काय, असं म्हणत आपण हायकोर्टाच्या निर्णयानुसार काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या प्रमुख मागणीसाठी 26 ऑक्टोबरपासून ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

GETTY IMAGES

फोटो स्रोत, Getty Images

या आंदोलनाला राज्यातील विविध भागातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि एसटीचा संप सुरू झाला. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामध्ये भाजपनेही उडी घेतली.

4 नोव्हेंबरला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं, "एसटी कर्मचाऱ्यांनी हताश होऊन आत्महत्या करू नये. त्यांच्या न्यायहक्कासाठी आम्ही वकिलांची फौज उभी करणार."

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत माजी मंत्री सदाभाऊ खोतसुद्धा आंदोलनात उतरले. मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केलं.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत मंत्रालयाकडे मोर्चा वळवला होता. यावेळी तिघांनाही पोलिसांनी अडवलं होतं.

याविषयी यापूर्वी बोलताना परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले होते, "संप सुरू झाला तेव्हा प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चा झाली. ते म्हणाले निलंबनाची कारवाई करू नका आम्ही संप मागे घेण्याचं आवाहन करतो. परंतु हा शब्द विरोधकांकडून पाळला गेला नाही. प्रवाशांना नाहक त्रास होतोय त्यामुळे आम्ही निलंबनाची कारवाई केली."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)