नवाब मलिक यांचे आरोप चुकीचे असल्याचं सिद्ध करा, कोर्टाची ज्ञानदेव वानखेडेंना सूचना

ज्ञानदेव वानखेडे

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC

मंत्री नवाब मलिक यांनी NCB मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याबाबत आरोप केल्यानंतर त्याविरोधात वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात अब्रुनुकसानीचा दावा केला होता.

वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने त्यांना मलिक यांचं म्हणणं चुकीचं असल्याचं सिद्ध करा, अशी सूचना दिली आहे.

ही सुनावणी मुंबई हायकोर्टात न्या. माधव जामदार यांच्यासमोर घेण्यात आली. यादरम्यान कोर्टाने नवाब मलिक यांनाही काही सूचना केल्याचं दिसून आलं.

कोर्टात काय घडलं?

नवाब मलिक यांच्या आरोपांसंदर्भात ज्ञानदेव वानखेडेंकडून दाखल अब्रुनुकसानी याचिकेवर बुधवारी (10 नोव्हेंबर) मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.

मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात एक अॅफेडेव्हिट दाखल करावं, असंही कोर्टाने म्हटलं.

एका राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते तसंच एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही ट्विट केलेली माहिती तुम्ही तपासली होती का, असा प्रश्न कोर्टाने विचारला.

तसंच तुम्ही या माहितीची खात्री पटवली असल्यास तुम्ही त्याबाबत अॅफेडेव्हिट दाखल करा. हे अॅफेडेव्हिट एका पानाचं असलं तरी चालेल, असं कोर्टाने मलिक यांना सांगितलं.

समीर वानखेडे यांच्यासंदर्भात बोलताना कोर्टाने खालील गोष्टींकडे लक्ष वेधलं.

समीर वानखेडे

फोटो स्रोत, Getty Images

समीर वानखेडे हे एक सरकारी अधिकारी आहेत. त्यांच्याबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असं कोर्टाने म्हटलं.

त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे हे मंत्र्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं कसं सिद्ध करतात, यावर सगळं अवलंबून आहे, असं न्या. माधव जामदार म्हणाले.

मलिक जे काही बोलत आहेत, ते प्राथमिक दृष्ट्या चुकीचं असल्याचं सिद्ध करावं, अशी सूचना कोर्टाने वानखेडे यांना दिली.

यावेळी कोर्टात ज्ञानदेव वानखेडे यांची बाजू अॅड. अर्शद शेख हे मांडत होते. त्यांनी कोर्टाला मलिक याचं एक ट्विट दाखवलं त्यामध्ये ते समीर यांची बहीण यास्मिन यांना लेडी डॉन असं संबोधतात.

तसंच दुसऱ्या एका ट्विटमध्ये मलिक यांनी म्हटलं होतं, समीर दाऊद वानखेडे, यहाँ से शुरू हुआ फर्जिवाडा.

या ट्विटसोबतच मलिक यांनी वानखेडे यांचा कथित जन्मदाखला ट्विट केला होता. पण हे मलिक यांनी ट्विट केलेलं हे प्रमाणपत्र बनावट असल्याचं स्पष्टीकरण अर्शद शेख यांनी दिलं.

या प्रकरणी पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

त्यापैकीच एक आरोप म्हणजे वानखेडे हे अनुसूचित समाजाचे नसून मुस्लीम असल्याबाबत आहे.

नवाब मलिक

फोटो स्रोत, facebook

काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा जन्माचा दाखला ट्विटरवर शेअर केला. त्याचं खरं नाव 'समीर दाऊद वानखेडे' असं असल्याचा दावा मलिक यांनी केलाय.

तर या आरोपांना उत्तर देताना बीबीसीशी बोलताना समीर वानखेडे म्हणाले, "मी हिंदू आहे. माझे वडीलही हिंदू आहेत. माझी आई मुस्लीम होती. पण आईवडिलांनी दोघांनी धर्म बदलला नाही."

समीर वानखेडेंच्या आईचं नाव झहीदा असून 2015 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. "मी धर्मनिरपेक्ष कुटुंबातून येतो," असं समीर वानखेडे बीबीसीशी बोलताना सांगतात.

समीर वानखेडेंवर होणाऱ्या आरोपांचं खंडन करण्यासाठी त्यांचे वडीलही प्रसारमाध्यमांसमोर आले. ते म्हणाले, "माझं नाव दाऊद नाही. माझं नाव ज्ञानदेव कचरुजी वानखेडे आहे."

बुधवारी (27 ऑक्टोबर) ला समीर वानखेडेंचा निकाहनामा नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला. या निकाहनाम्यात समीर वानखेडेंचं नाव 'समीर दाऊद वानखेडे' असं लिहीण्यात आलंय.

मग निकाहनाम्यात नाव दाऊद का? यावर बोलताने ते म्हणतात, "प्रेमाने माझी पत्नी मला दाऊद म्हणून हाक मारायची. त्यांनी तसं नाव ठेवलं असेल."

2006 मध्ये समीर वानखेडे यांचं लग्न डॅा. शबाना कुरैशी यांच्यासोबत झालं होतं. पण 10 वर्षानंतर त्यांनी 2016 साली घटस्फोट घेतला होता.

समीर वानखेडे यांचे वडील यांनी लग्नाआधीच धर्मांतर करून दाऊद असं नाव स्वीकारलं होतं, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. या आरोपानंतर त्याविरोधात वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात अब्रूनुकसानीचा दावा केला आहे.

समीर वानखेडेंविरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रार

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी केलेल्या विविध आरोपांनंतर आता त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे. त्यांच्यावरील जातीचा खोटा दाखल केल्याच्या आरोपावरून भीम आर्मी भारत एकता मिशननं जात पडताळणी समितीकडं तक्रार केली आहे.

समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचा विवाह

फोटो स्रोत, kranti redkar instagram

समीर वानखेडे यांनी जातीचा खोटा दाखला सादर करून नोकरी मिळवली. त्यामुळं आरक्षित वर्गातील एका उमेदवाराची हक्काची नोकरी हातून गेली, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

वानखेडे हे मागासवर्गीय नसून त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा बळकावली आहे. त्यामुळं जात पडताळणी विभागाकडे त्यांची तक्रार केल्याचं, भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक कांबळे यांनी सांगितलं.

वानखेडेंसारख्या अनेक बनावट अधिकाऱ्यांनी हुशार आणि गरीब विद्यार्थ्यांच्या जागा बळकावल्या आहेत. त्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशाराही संघटनेनं दिला आहे.

समीर वानखेडेंकडून तपास काढून घेतला

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास NCBचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडे राहणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

आर्यन खान

फोटो स्रोत, Instagram

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे डीडीजी अशोक मुथा-जैन यांनी बीबीसीला सांगितले की समीर वानखेडे यांच्याकडून सहा प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. त्यापैकी आर्यन खानचे प्रकरण देखील एक आहे.

या सर्व प्रकरणांवर संजय सिंह हे नजर ठेवणार आहेत, अशी माहिती NCB ने दिली. संजय सिंह हे NCB चे वरिष्ठ अधिकारी आहेत.

2 ऑक्टोबर रोजी एका क्रूझवर टाकण्यात आलेल्या धाडीनंतर समीर वानखेडे यांच्या पथकाने आर्यन खानला अटक केली होती. आर्यनवर ड्रग्ज प्रकरणात आरोप लावण्यात आले होते.

पण नंतर या प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीही यामध्ये एन्ट्री घेतली.

मलिक यांनी वानखेडे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले आहेत. त्यानंतर प्रभाकर साईल या स्वतंत्र साक्षीदारानेही वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोप केले. त्यामुळे या प्रकरणाची दखल दिल्लीनेही घेतली.

अखेरीस, आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांच्यासंदर्भात मोठी कार्यवाही समोर आली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)