परमबीर सिंह: अँटिलिया स्फोटकं प्रकरणापासून ते बेपत्ता होण्यापर्यंतची कहाणी

परमबीर सिंह

फोटो स्रोत, Ashish Raje

    • Author, मयांक भागवत, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी न्यूज

1 ऑक्टोबरला अधिकाऱ्यांनी राज्यात एक खळबळजनक घोषणा केली. मुंबईचे माजी मुख्य पोलीस आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता आहेत.

दोनच वर्षांपूर्वी परमबीर सिंह यांची 45,000 पोलिसांचा ताफा असणाऱ्या मुंबई पोलिसांच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती.

59 वर्षांचे परमबीर सिंह आता कुठे आहेत हे माहिती नाही. ते त्यांच्या ऑफिसमध्ये नाहीत, त्यांच्या मुंबईतल्या घरी नाहीत आणि चंदीगडमधल्या त्यांच्या मूळ घरी - कुटुंबासोबतही नाहीत.

पोलिसांनी आता त्यांच्याच एका अधिकाऱ्याचा शोध घेणं एकीकडे सुरू केलंय. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत मुंबईतल्या घरी राहणाऱ्या त्यांच्या पत्नी आणि मुलीने आणि परदेशात राहणाऱ्या मुलाने आणि त्यांच्या वकिलांनी परमबीर सिंहांच्या ठावठिकाण्याबद्दल मौन बाळगलंय.

आधी पोलीस अधिकारी सचिन वाझेंवर आरोप झाले, मग गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्तांवरही आरोप झाले.

परमबीर सिंह एकाएकी बेपत्ता झाले नाही. या गोष्टीची सुरुवात झाली फेब्रुवारीमध्ये. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या मुंबईतल्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली.

पुढच्या काही दिवसांतच या गाडीचे तथाकथित मालक असणाऱ्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमध्ये सापडला. त्यांचा खून करून मग मृतदेह पाण्यात टाकण्यात आल्याचा निष्कर्ष नंतर पोलिसांनी काढला.

त्यानंतर मनसुख हिरेन यांच्याशी ओळख असणारे पोलिस अधिकारी सचिन वाझेंना अटक करण्यात आली.

मुंबईच्या क्राईम ब्रांचमध्ये असणाऱ्या वाझेंचा मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सचिन वाझेंनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत.

मार्च 2021मध्ये परमबीर सिंह यांना आयुक्त पदावरून हटवण्यात आलं आणि महाराष्ट्राच्या होमगार्डच्या प्रमुखपदी त्यांची नेमणूक करण्यात आली.

"अशी बदली नेहमीची नाही. ते मुंबई पोलिसांच्या प्रमुखपदी असताना त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काही गंभीर चुका केल्या आहेत. या चुका अत्यंत गंभीर आहेत आणि म्हणूनच त्यांची बदली करण्यात आली आहे," महाराष्ट्राचे तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली होती. पण नेमक्या चुका काय होत्या, हे स्पष्ट करण्यात आलं नाही.

अनिल देशमुख आणि परमबीर सिंह

फोटो स्रोत, Ashish Raje

परमबीर सिंह यांनी मार्चच्या मध्यात नवीन जबाबदारीचा पदभार स्वीकारला. त्यांचं हे साधं नवीन ऑफिस त्यांच्या आधीच्या ऑफिसपासून जवळच होतं.

त्यानंतर काहीच काळात त्यांनी तेव्हा गृहमंत्री असणाऱ्या अनिल देशमुखांवर खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप करणारं पत्र सरकारला पाठवलं. पण यासोबत पुरावे देण्यात आले नाहीत.

अनिल देशमुखांनी त्यांच्यावर करण्यात आलेले हे आरोप फेटाळले पण एप्रिल 2021मध्ये त्यांना महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

एन्फोर्समेंट डिरेक्टरेट म्हणजेच ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी पाचवेळा समन्स बजावलं. नोव्हेंबर 2021मध्ये अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. यावेळी परमबीर सिंह यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, "ज्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले तो परदेशात पळून गेलाय."

दरम्यानच्या काळात परमबीर सिंह मे 2021पासून वैद्यकीय सुटीवर गेले आणि त्यानंतर दोनदा त्यांनी त्यांची सुटी वाढवली.

आणि मग ते बेपत्ता झाले.

मुंबईतल्या मलबार हिल भागातल्या बहुमजली इमारतीमध्ये परमबीर सिंह यांचं निवासस्थान आहे. ते कुठे आहेत याबद्दल त्यांची पत्नी वा मुलीने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बीबीसीने परमबीर सिंह यांचे वकील अनुकूल सेठ यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. परमबीर सिंह भारताबाहेर गेल्याची शक्यता काही भारतीय माध्यमांनी वर्तवली होती. ते रशियात असल्याचं एका माध्यमाने म्हटलं तर ते बेल्जियममध्ये असल्याचं दुसऱ्या एका माध्यमाने म्हटलं होतं.

"आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. ते एक सरकारी अधिकारी असल्याने सरकारच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही. आणि जर ते गेले असतील, तर ते चांगलं नाही," महाराष्ट्राचे आताचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

मुंबईतल्या मलबार हिल भागातल्या याच इमारतीत परमबीर सिंह यांचं घर आहे.

फोटो स्रोत, Ashish Raje

फोटो कॅप्शन, मुंबईतल्या मलबार हिल भागातल्या याच इमारतीत परमबीर सिंह यांचं घर आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालच्या एका समितीची स्थापना केली आहे. परमबीर सिंह यांच्यावर बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि बुकीजनेही खंडणीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

आतापर्यंत अनिल देशमुख यांच्यावर कोणी आरोप केले नसले तरी त्यांना 12 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

परमबीर सिंह अद्याप या समितीसमोर चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. पण या चौकशीलाच आव्हान देणारी याचिका त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत दाखल केलीय.

परमबीर सिंह यांनी अशी याचिका या समितीसमोर दाखल करणं हे एकप्रकारे ते कायदा चुकवत नसल्याचं दाखवत असल्याचं त्यांच्या वकिलांनी म्हटलंय.

अद्यापही या केसबद्दलची फारशी ठोस माहिती उपलब्ध नाही. स्फोटकं भरलेल्या कार प्रकरणामध्ये आणखी कोणाचा हात होता का? अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांना पदावरून का हटवलं?

तेव्हा गृहमंत्री असणाऱ्या देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर परमबीर सिंह गायब का झाले? या प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीसमोर परमबीर सिंह हजर का होत नाहीत?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत.

समाजशास्त्राचे पदवीधर असणाऱ्या परमबीर सिंह यांचे वडील सरकारी अधिकारी तर आई गृहिणी. एक धडाडीचे अधिकारी अशी त्यांची ओळख होती. ते कायम फिट रहायचे, क्रिकेट खेळायचे.

मुंबई पोलिसांमधल्या चार दशकांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी दुर्गम भागांतल्या माओवाद्यांशीही सामना केला आणि शहरातल्या गँगस्टर्सविरोधातही.

1990च्या दशकात त्यांचं पोस्टिंग मुंबईमध्ये झालं होतं. त्यावेळी मुंबईतल्या अंडरवर्ल्डला निपटून काढण्यामध्ये त्यांनी त्यांच्या टीमसोबत मोठं काम केलं होतं.

मुंबईतल्या गँगस्टरचा वेध घेणाऱ्या एन्काऊंटर स्पेशालिस्टसोबतच्या कार्यपद्धतीमुळे ते प्रकाशझोतात आले होते.

मुंबईतल्या गुन्हेगारी जगताविषयी लिहिणारे पत्रकार एस. हुसैन झैदी म्हणतात, "परमबीर सिंह यांच्यासोबत इतर ज्येष्ठ अधिकाऱ्यांवर शहरातून अंडरवर्ल्डचा सफाया करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आणि यासाठी त्यांनी 3 विशेष एन्काउंटर पथकं तयार केली."

पुढच्या वर्षी परमबीर सिंह 60 वर्षांचे होत निवृत्त होतील. "मी भारतातच आहे. देश सोडून गेलेलो नाही," ऑगस्ट महिन्यात एका पत्रकाराशी फोनवरून बोलताना सिंह यांनी सांगितलं होतं.

पण ते अजूनही कुठे आहेत आणि समोर का येत नाहीत, हे त्यांच्याच पथकाला माहीत नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)