'आर्यन खानचे प्रकरण हे अपहरण आणि खंडणीचं'- नवाब मलिक

नवाब मलिक

फोटो स्रोत, facebook

आर्यन खानचे प्रकरण अपहरण आणि खंडणीचं आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपचा कार्यकर्ता मोहित कम्बोज याच्या मेहुण्याच्या माध्यमातून आर्यन खानला क्रूझवर नेलं असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी आज (7 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, "आर्यन खानचे प्रकरण अपहरण आणि खंडणीचे आहे. मोहित कम्बोजच्या मेहूण्याच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला. अपहरण करून 25 कोटी रुपये मागण्याचा खेळ सुरू झाला. 18 कोटी रुपयात डील झाली. 50 लाख रुपये घेण्यात आले. परंतु एका सेल्फीने खेळ उघड झाला हे खरं आहे."

या घटनांचा मास्टरमाईंड मोहित कम्बोज आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मोहित कम्बोज आणि समीर वानखेडे यांचे चांगले संबंध असल्याचंही ते म्हणाले.

7 ऑक्टोबरला कम्बोज आणि समीर वानखेडे ओशीवारा कब्रस्तान येथे भेटल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. या दोघांच्या बैठकीचा व्हीडिओ आम्ही लवकरच जारी करणार असल्याची घोषणा मलिक यांनी केला.

नवाब मलिक पुढे म्हणाले, "18 कोटी रुपयाचं प्रकरण समोर आलं आहे. प्रभाकर साईल यांनी पोलीस स्टेशनला जबाब दिला आहे. मोहित कम्बोज आणि सॅम डिसूजा समीर वानखेडे यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे."

'अस्लम शेख यांनाही क्रूझवर बोलवण्यात आलं होतं'

काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनाही क्रूझवर पार्टीसाठी बोलवण्यात आलं होतं असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. अस्लम शेख यांना विचारा असंही ते पत्रकारांना परिषदेत म्हणाले.

असलम शेख

फोटो स्रोत, facebook

"अस्लम शेख यांना क्रूझवर येण्यासाठी आग्रह केला जात होता परंतु ते गेले नाहीत. उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करण्याचा गेम होता." असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहिम कम्बोज म्हणाले, "दाढिवाला ड्रग पेडलर अस्लम शेख यांना बोलवत होता असं नवाब मलिक म्हणाले. या ड्रग पेडलरचा महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख यांच्याशी काय संबंध आहे?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शाहरूख खानला आवाहन

या प्रकरणात शाहरुख खान यानेही समोर येऊन बोलावं असं आवाहन नवाब मलिक यांनी केलं आहे.

शाहरुख खान, आर्यन खान

फोटो स्रोत, InSTAGRAM

ते आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, "मुलाला अपहरण केल्यानंतर खडंणीसाठी दबाव आणला जात असेल तर दबावाखाली काही रक्कम दिल्यास तो गुन्हा ठरत नाही. ते पीडित आहेत. त्यामुळे अशा प्रकरणातील सर्वांनी समोर येऊन उघडपणे बोलण्याची गरज आहे. मी त्यांना आवाहन करतो."

'सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही'

नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "मी माझ्या आयुष्यात कधीही सुनील पाटील याला भेटलो नाही. याउलट भाजपच्या मंत्र्यांसोबतचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे असं मला म्हणायचं नाही. तो समीर वानखेडेंच्या आर्मीचा भाग आहे. 6 ऑक्टोबरला पत्रकार परिषद झाल्यानंतर सुनील पाटील यांचा मला फोन आला. ते भेटायला येणार होते. परंतु आले नाहीत."

'सॅम डिसूजाला पकडण्यात का आलं नाही?'

सॅम डिसूजा आणखी एका प्रकरणातील आरोपी आहे असा दावा नवाब मलिक यांनी केला. एका केसमध्ये सचिन टोपे आणि त्याच्या पत्नीला अटक झाली होती.

या प्रकरणात सॅम डिसूला 23 जून रोजी एनसीबीने नोटीस बजावली परंतु आजही तो हजर झाला नाही. 23 जून पासून आजपर्यंत त्याला अटक का झाली नाही असे प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केले.

सॅम डिसूजाने हवालामार्फत पैसे दिल्लीला पाठवल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. हवालासोबतचे त्यांचे संभाषण सांगत असताना नवाब मलिक म्हणाले, सॅम डिसूने हवाला करणाऱ्याला पावती मागितली, तो म्हणाला हवालाची कधी पावती मिळते का?

'मी तुम्हाला घाबरत नाही' - मोहित कम्बोज

नवाब मलिक यांनी भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कम्बोज आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे जवळचे संबंध असल्याचं म्हटलं आहे. याला प्रत्युत्तर देताना कम्बोज यांनी समीर वानखेडे यांच्याशी आपला काहीही संबंध नसून माझ्या आयुष्यात मी कधीही त्यांना भेटलो नाही असं स्पष्टिकरण दिलं आहे.

कम्बोज म्हणाले, "मी सुनील पाटील यांचा उल्लेख केल्यानंतर आज नवाब मलिक यांनी मान्य केलं की सुनील पाटील याच्याशी संपर्क झाला होता. फोनवर बोलणं झालं होतं हे सुद्धा मलिक यांनी मान्य केलं."

ते पुढे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांची मुलं या पार्टीला येणार होती. या ड्रग पेडलरशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांचे संबंध आहेत. सुनील पाटील यांच्याशी त्यांचा संपर्क झाला याची कबुली मलिक यांनी दिली. केवळ त्यांनी वेळ आणि तारीख बदलून सांगितली."

नवाब मलिक यांच्या संपत्तीबाबतही मोहित कम्बोज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा त्यांनी केला. एवढे पैसे आणि मुंबईत एवढे फ्लॅट कुठून आले? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

तसंच नवाब मलिक यांनी उल्लेख केलेले हॉटेल्स माझे नाहीत असंही त्यांनी सांगितलं. 1100 कोटी रुपायांचा आरोप खोटा आहे. मी निवडणूक लढवत असताना माझी संपत्ती साडे तीन कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं असंह ते म्हणाले.

नवाब मलिक यांना आव्हान देत मोहित कम्बोज म्हणाले, "मी तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही कोणतीही चौकशी करा, कुठलीही केस करा मी तुम्हाला घाबरत नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)