You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रामदास आठवले : समीर वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिकांचं मंत्रिपद जातं हे पाहू #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. समीर वानखेडेंची नोकरी की नवाब मलिकांचं मंत्रिपद जातं हे पाहू - रामदास आठवले
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल विभागाचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांची नोकरी घालवण्याचा इशारा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला होता. याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
समीर वानखेडे यांची नोकरी जाते की नवाब मलिकांचं मंत्रिपद जातं, हे पाहूया, असं आव्हान आठवले यांनी दिलं आहे.
शनिवारी (23 ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.
राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणांकडून राज्यात कारवाया होत असल्या तरी त्यातून शरद पवार यांच्या कुटुंबाला अथवा कुणालातरी त्रास देण्याचा उद्देश नाही, असं आठवले यांनी स्पष्ट केलं.
या यंत्रणा पूर्णत: स्वतंत्र असून, त्यांच्या कारवाईंमध्ये केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा संबंधच येत नसल्याचं त्यांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र टाईम्समधील बातमीनुसार राजकीय नेत्यांनी तपास चालू असताना तपास यंत्रणा आणि त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर हा कायदा व सुव्यवस्थेला मोठा धोका आहे, असं मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.
2. राज्यातला एक तक्रारदार गायब आहे - उद्धव ठाकरे
"राज्यात सध्या एक तक्रारदारच गायब झाला आहे. त्याने तक्रार केली, आरोप केले आणि पळून गेला. कुठे गेला काहीच माहीत नाही पण त्याच्या तक्रारीवरून इकडे तपास आणि धाडींचे सत्र सुरू आहे', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांचं नाव न घेता टीका केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन शनिवारी (23 ऑक्टोबर) सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या हस्ते झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
ठाकरे यांनी यावेळी व्यवस्थेमधील काही विषयांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. न्यायदान प्रक्रियेच्या विलंबात सर्वसामान्य माणूस पिचला जातो. कोर्टात चकरा मारून आयुष्य संपते आणि खर्चही परवडत नाही. म्हणून न्यायदानाची प्रक्रिया गतिमान करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळीच परमबीर सिंग यांच्यावरही त्यांनी नाव न घेता निशाणा साधला. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
अँटिलिया स्फोटक-सचिन वाझे प्रकरण समोर आल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. सध्या या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे.
गेल्या काही काळापासून परमबीर सिंग यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेसुद्धा गेल्या कित्येक दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत.
3. देशात फक्त 23 कोटी लशी दिल्या हे पुराव्यानिशी सिद्ध करू - संजय राऊत
देशात केंद्र सरकार देत असलेला 100 कोटी लसीकरणाचा आकडा खोटा असून फक्त 23 कोटी लस दिल्या गेल्या आहेत, आपण ही गोष्ट पुराव्याने सिद्ध करु, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
नाशिक दौऱ्यावर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत बोलत होते.
"लडाखची सीमा पार करून चीनचे सैन्य भारतात आले, काश्मीरमध्ये शीख हत्याकांड झाले आणि आपल्याकडे लसीचे उत्सव साजरा केले जातात," अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
'राज्यातील भाजपचे सरकार घालवले आता दिल्लीला कूच करायची. देशात महाविकास आघाडी म्हणून नाही तर शिवसेना म्हणून जाणार,' असंही राऊत म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.
4. 'म्हणूनच तुम्हाला मास्क घालायला सांगितलं होतं'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याविषयी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरे यांनी लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थना केली. याशिवाय, त्यांनी आपण राज ठाकरे यांना मास्क घालायला सांगितलं होतं, असं म्हणत पूर्वी पाठवलेल्या पत्राचीही आठवण करून दिली आहे.
'मास्क हे एक कवच आहे. आपल्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचं काम ते करतं. त्यामुळे आतापासून आपणही मास्क परिधान करा,' अशी विनंती क्रास्टो यांनी राज ठाकरे यांना केली.
ही बातमी लोकमतने दिली.
5. ...म्हणून सरकारला पेट्रोल-डिझेलवरचा टॅक्स हटवणं अशक्य - बाबा रामदेव
पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पण योगगुरू बाबा रामदेव यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा बचाव केला आहे. सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरचा टॅक्स हटवणं का अशक्य आहे, याचं कारण त्यांनी सांगितलं.
नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, "कच्च्या तेलाच्या किंमतीच्या प्रमाणात पेट्रोल डिझेल विकले गेले तर दोन्ही स्वस्त होतील. पण इंधनावर टॅक्स लावला जातो.
देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी टॅक्स आवश्यक आहे. त्यामुळेच सरकारला टॅक्स हटवणं अशक्य होत आहे, असं बाबा रामदेव म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)