You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात महागाई आणखी वाढण्याची शक्यता IMF नं का व्यक्त केली आहे?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
कोथिंबीर 60 ते 80 रुपये जुडी, टोमॅटो 40 ते 80 रुपये किलो, कांदे 50 ते 65 रुपये किलो, तूरडाळ 130 ते 140 रुपये किलो...गेल्या काही दिवसांत राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये भाज्या आणि अन्नधान्याचे भाव असे कडाडले आहेत.
दिवाळी तोंडावर आलीये आणि सर्वसामान्यांचं दिवाळं निघणार अशीच परिस्थिती झाली आहे.
फक्त खाद्यपदार्थच नाही, तर कपड्यांपासून कंप्युटरपर्यंत अनेक गोष्टी महाग झाल्यात आणि आता येत्या काळातही या किंमती चढ्याच राहतील, अशी भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. इतकंच नाही, तर किंमती आणखी वाढू शकतात असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (IMF) ने दिला आहे.
पण त्यामागचं नेमकं कारण काय आहे? आणि मुळात सध्या सगळं एवढं महाग का झालं आहे?
कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी अर्थव्यवस्था अक्षरश: ठप्प झाली होती. आता सगळे व्यवहार पुन्हा रुळावर येताना दिसतायत. पण सगळं अजून सुरळीत झालेलं नाही.
महागाई वाढण्याची कारणं काय?
महागाई वाढण्याचा थेट संबंध इंधनाच्या किंमतींशी आहे. गेले काही महिने पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज नवी उंची गाठतायत.
तुमच्याकडे गाडी असो, किंवा नसो... भारतात डिझेल शंभर रुपयांच्या वर गेल्याचा थेट परिणाम सर्वांच्या खिशावर झालाय. कारण मालवाहतुकीसाठी विशेषतः शेतमालाची ने-आण करण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. साहजिकच, भाज्यांच्या किंमती वाढल्या आहेत.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा सण साजरे करण्याविषयी उत्साह दिसतो आहे आणि त्यामुळे बाजारात सर्वच गोष्टींची मागणी वाढली आहे. पण त्या वेगानं पुरवठा होत नाहीये.
जगभरातच मागणी आणि पुरवठ्याचं हे समीकरण बिघडलं आहे आणि त्याचा परिणाम इतर अर्थव्यवस्थांवरही होतो आहे.
उदाहरण द्यायचं, तर चीनमध्ये कोळशाची टंचाई आणि त्यातून ऊर्जासंकट निर्माण झालं. त्याचा परिणाम फोन आणि काँप्युटर चिपसारख्या वस्तूंच्या निर्मितीवर झाला आहे. आता जगभरात एकीकडे या वस्तूंची टंचाई निर्माण झालीय आणि दुसरीकडे वर्क फ्रॉम होममुळे कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचा वापर मात्र वाढलाय. साहजिकच किंमतीही वाढल्या आहेत.
कपडे आणि अन्य वस्तूंच्या बाबतीत कामगारांच्या मजुरीतही वाढ झाल्यानं उत्पादन खर्च वाढला आहे, त्याचा भार शेवटी गिऱ्हाईकांच्या खिशावर पडतो आहे. मग प्रश्न पडतो, हे चक्र कुठे थांबणार आणि महागाई कधी कमी होणार?
अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती कशी आहे?
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, म्हणजे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड अर्थात IMF नं गेल्या आठवड्यातच जागतिक आर्थिक रागरंग दाखवणारा आपला अहवाल जाहीर केला.
त्यानुसार भारतात जीडीपी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर या आर्थिक वर्षात 9.5 असा कायम राहील. म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेची गेल्या वर्षीच्या तुलनेत होत असलेली वाढ कायम राहील. तसंच महागाईचा दर 6.2 टक्क्यांवरून 5.6 टक्क्यांपर्यंत कमी होईल असंही हा अहवाल सांगतो.
मग आता तुम्ही म्हणाल की सगळं चांगलंच चाललंय की. पण हे चित्र प्रत्यक्षात वेगळं आहे.
इथे हे लक्षात घ्यायला हवं, ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेतली आहे आणि गेल्या वर्षी तर काही महिने सगळं बंदच होतं. मग यंदा इकॉनॉमिक रिकव्हरी म्हणजे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया वेगानं सुरू झाली, पण डेल्टा व्हेरियंटनं डोकं वर काढलं आणि अर्थचक्राचा वेग पुन्हा थोडा मंदावला.
त्यामुळे आता भारतातच नाही, तर अमेरिका, युके, जर्मनी आणि चीनसह जगभरातील इतर प्रमुख देशांतही महागाई काही काळ कायम राहण्याचा धोका IMF ला वाटतोय.
सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, भारतात महागाईचा दर कमी जरूर झाला आहे, पण अजूनही तो आधीच्या तुलनेत वाढलेला आहे आणि तो येत्या काळात पुन्हा वाढण्याची भीतीही काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
महागाई कधी कमी होईल?
याचं थेट उत्तर कधीच देता येणार नाही. कारण जगाची अर्थव्यवस्था सतत बदलते आहे आणि त्याचा परिणाम भारतातील व्यवहारांवरही होतो आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत अमेरिकेसारख्या जगातील प्रमुख अर्थव्यवस्था पूर्वपदावर आलेल्या दिसू शकतात. पण युकेसारख्या काही देशांना त्यासाठी दोन ते तीन वर्षंही लागू शकतील. तर काही गरीब देशांना या घसरणीतून सावरण्यासाठी 2024 हे सालही लागू शकतं.
म्हणजे येत्या काही महिन्यांत भारतात परिस्थिती सुधारेल, पण ती इतक्यात पूर्ववत होणार नाही आणि तोवर महागाई कायम राहण्याचीच शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती खाली उतरल्या, तर यातून थोडा दिलासा मिळू शकतो.
आणखी एका गोष्टीची टांगती तलवार भारतावर आहे. ती म्हणजे हवामान बदल.
अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचं नुकसान झालं आहे, त्याचा परिणामही भाजीपाला आणि अन्नधान्याच्या पुरवठ्यावर आणि पर्यायानं त्यांच्या किंमतीवर होऊ शकतो.
मुंबईतील राह फाऊंडेशनच्या सारिका कुलकर्णीही त्याकडे लक्ष वेधतात.
अन्नधान्याच्या वाढत्या किंमतींविषयी बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या आहेत, "एकीकडे जगाची लोकसंख्या वाढतेय आणि परिणामी अन्नधान्यासाठीची मागणी सातत्याने वाढतेय. पण पाण्याची उपलब्धता व जमिनीचा कस कमी होणं, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, पुढच्या पिढीला शेतीत रस नसणं अशा विविध कारणांमुळे शेतीखाली असणाऱ्या जमिनीचं प्रमाण कमी होतंय.
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचं प्रतिबिबं अन्नधान्याच्या किंमतीत उमटतं आणि या किंमती वाढतात. अडचणी काय आहेत हे आपल्याला समजलेलं आहे त्यामुळे अजूनही आपल्याकडे यावर तोडगा काढण्याची संधी आहे. पण जर आपण त्याकडे दुर्लक्ष करत राहिलो तर मात्र मग आशा संपत जाईल."
भारतात महागाई आणखी वाढण्याच्या शक्यतेविषयी आयएमएफच्या प्रमुख अर्थाशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं आहे, की "महागाई ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. भारताला कोळसा तसंच तेलाच्या वाढत्या किंमतींवरही लक्ष ठेवावं लागेल."
त्या पुढे असंही सांगतात, की भारताला कोव्हिडविरोधी लसीकरणाचा वेगही कायम ठेवावा लागेल कारण देशात तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे.
देशात पुन्हा साथीचा प्रभाव वाढला, तर त्याचा परिणाम उद्योग व्यवसायांवर होऊन पुढे महागाईचं दुष्टचक्र कायम राहू शकतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)