You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबान : उपचारांसाठी दिल्लीत आलेल्या अफगाण नागरिकांवर उपासमारीची वेळ
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दिल्लीच्या लाजपतनगर भागातली वर्दळ सध्या बरीच वाढली आहे. कोव्हिड लॉकडाऊननंतर गेलेली चमकधमक पुन्हा परतू लागली आहे.
या परिसरातील जे-ब्लॉकमध्ये महागड्या गाड्यांमधून लोक अफगाणी हॉटेलांमध्ये जेवणासाठी जातात. दिल्लीच्या बड्या लोकांमध्ये याठिकाणच्या अफगाणी हॉटेलांमध्ये जेवण करणं म्हणजे एकप्रकारे स्टेटस सिंबॉलच मानलं जातं.
अफगाणी खाद्यप्रकारांचा सुवास दरवळत असलेल्या या हॉटेलांपासून 300 मीटर अंतरावरच 50 वर्षीय रहमतुल्लाह हेसुद्धा राहतात.
पण आपल्या आणि आपल्या मुलाच्या रात्रीच्या जेवणाची सोय कशी करावी, या काळजीने त्यांना ग्रासलं आहे.
दोन महिन्यांपूर्वीच रहमतुल्लाह आपल्या मुलासोबत भारतात आले होते. मुलाचे उपचार करण्यासाठी त्यांनी काही जमवलेले पैसेही आणले होते.
उपचारानंतर त्यांना अफगाणिस्तानला परतायचं होतं. पण याच दरम्यान तालिबानने तिथली सत्ता हस्तगत केली.
या परिस्थितीमुळे भारत आणि अफगाणिस्तानमधील विमानांची उड्डाणं रोखण्यात आली आहेत.
पैसे संपले, परतीचा मार्गही बंद
दोन-तीन महिन्यांपूर्वी उपचारासाठी भारतात आलेल्या अनेक अफगाणी नागरिकांवर ही परिस्थिती ओढवली आहे.
सध्या त्यांच्या हातातले सगळेच पैसे संपले आहेत. शिवाय देशात परतण्यासाठीचे सर्व मार्गही सध्या बंद झाले आहेत.
त्यामुळे इतरांकडून मदत मागत त्यांचा उदरनिर्वाह सुरू असल्याचं दिसून येतं.
दिल्लीत राहत असलेल्या अफगाणी समाजातील अहमद झिया गनी सांगतात, "उपचारांसाठी भारतात आलेल्या नागरिकांची मदत करण्याचा कोणताच मार्ग सध्या उपलब्ध नाही. लोक एकमेकांमध्ये पैसे गोळा करून त्यांच्या जेवणाची, औषधांची व्यवस्था करत आहेत. पण असं जास्त दिवस तर चालू शकणार नाही.
उपचार करण्यासाठी भारतात आलेले रहमतुल्लाह अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांतात अजार्जाओ गारामसील परिसरात सापार गावचे रहिवासी आहेत.
व्यवसायाने ते एक शेतकरी आहेत. पण त्यांची स्वतःची जमीन नाही. इतरांच्या जमिनीवर ते गहू आणि ज्वारीची शेती करतात.
18 महिन्यांपूर्वी रहमतुल्लाह यांचे चिरंजीव अमानुल्लाह नोकरीच्या शोधात इराणला निघून गेले होते.
तिथं त्यांचा भीषण अपघात झाला. त्यामुळे त्यांचे दोन्ही हात आणि उजवा पाय कापावा लागला. या अपघातात त्यांचा उजवा डोळाही निकामी झाला. तसंच डाव्या पायाची सगळी बोटे कापावी लागली आहेत.
जखमा भरल्यानंतर रहमतुल्लाह यांनी आपल्या मुलाला वैद्यकीय व्हिसावर दिल्लीला आणलं. तिथं अमानुल्लाह यांना कृत्रिम पाय लावण्यात आले. तसंच त्यांच्या नाकावर प्लास्टिक सर्जरीही करण्यात आली.
यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ते पुन्हा अफगाणिस्तानला परतण्याची तयारी करत होते.
यादरम्यान अफगाणिस्तानातली परिस्थिती प्रचंड बिघडली. संपूर्ण देशात हिंसाचार पसरला.
लाजपतनगरमध्ये एका छोट्याशा घरात रहमतुल्लाह राहतात. पण सध्या त्यांच्याकडे भाडं किंवा दुभाष्याला देण्यासाठीही पैसे नाहीत.
लाजपतनगरमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या इतर अफगाणी नागरिकांप्रमाणे ते हिंदी बोलू शकत नाहीत. ते लहानपणापासून आपल्या गावीच राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं शिक्षणही झालेलं नाही. त्यांना लिहिता-वाचताही येत नाही.
बीबीसीशी बातचीत करताना त्यांनी आपली कहाणी सांगितली.
ते म्हणतात, "माझा मुलगा इराणला गेला होता तेव्हा आम्हाला वाटलं होतं की तो काही पैसे पाठवून देईल. आपल्या लग्नाची व्यवस्था करेल. अमानुल्लाहला एका प्लास्टिक कंपनीत कामही मिळालं. पण तिथं तो घसरून एका मोठ्या मशिनमध्ये सापडला. आम्ही आशा सोडून दिली होती. पण अल्लाहनेच त्याला वाचवलं."
अमानुल्लाह या अपघातात गंभीर जखमी झाले. 15 महिने त्यांच्यावर इराणमध्येच उपचार करण्यात आले.
कुटुंबाकडून प्रतीक्षा
रहमतुल्लाह सांगतात, "मी 18 महिन्यांपासून कोणतंच काम केलेलं नाही. आपल्या मुलासोबतच मी राहत आहे. वाचवलेले सगळे पैसे खर्च झाले. कर्ज घेऊन मुलावर उपचार केले. पुन्हा दिल्लीला येऊन मुलाला कृत्रिम पाय लावून घेतले. पण आता आम्ही अडकलो आहोत."
अमानुल्लाह स्वतः कोणतंही काम करण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांचे वडिलच त्यांना आंघोळ, जेवण आणि कपडे घालण्याचं काम करतात.
आता अफगाणिस्तानात गावी राहणारे त्यांचे कुटुंबीयही त्यांची प्रतीक्षा करत आहेत.
रहमतुल्लाह यांच्या पत्नी आणि मुलांकडेही पैसे उरलेले नाहीत. आता कधी एकदा आपले पती भारतातून परततात, याकडे त्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळे विमानं पुन्हा सुरू होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने भारताकडे विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. पण तिथली परिस्थिती अजूनही नाजूक असल्याचं सांगत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने विमानसेवा सुरू करण्यास नकार दिला होता.
ही सेवा कधी पूर्ववत होते, ते सांगणं सध्या तरी शक्य नाही.
भारत अफगाणिस्तानातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शिवाय, तालिबान सरकारला अनेक देशांनी अद्याप मान्यता दिलेली नाही.
गेल्या महिन्यात तालिबान सरकारमधील नागरी विमान वाहतूक मंत्री हमीदुल्लाह अखुंदजादा यांनी भारताच्या नागरी विमान उड्डयन विभागाचे महासंचालक अरूण कुमार यांना त्यासंदर्भात एक पत्र लिहिलं होतं.
पण हा एक धोरणात्मक निर्णय असल्याने त्यासाठी अनेक बाजू तपासणं गरजेचं आहे, असं मत भारतीय विमान वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी व्यक्त केलं.
मोहिउद्दीन यांचीही मिळती-जुळती कहाणी
मोहिउद्दीन हेसुद्धा अफगाणिस्तानातून उपचारासाठी दिल्लीला आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही आल्या आहेत.
मोहिउद्दीन एकदा एका बॉम्बस्फोटात जखमी झाले होते. त्यामुळे त्यांचा उजवा पाय कापावा लागला होता. पत्नीची हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. तेसुद्धा देशात परतण्याची तयारी करत होते.
ते म्हणतात, "माझी मुलं तिथं चिंताग्रस्त आहेत. तुम्ही कधी परत येणार असं ते आम्हाला सतत विचारत असतात. आता काय करावं आम्हाला कळत नाही."
दिल्लीत उपचारासाठी आलेल्या अफगाण नागरिकांची संख्या सुमारे 675 इतकी आहे. या सर्व लोकांनी अफगाणिस्तानच्या दूतावासाकडे मदत मागितल्याने ही आकडेवारी मिळू शकली.
यापैकी जवळपास सर्वच जण अफगाणिस्तानच्या दूतावासाचे उंबरठे रोज झिजवत आहेत. पण त्यांना अद्याप कोणतंच ठोस आश्वासन मिळू शकलेलं नाही.
विमानसेवा बंद असल्याने अडचणी
जलाल खान सिनुजादा हे त्यातीलच एक. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "दूतावासाने मला कागदपत्रे मागितली होती. पण पुढे काहीच होऊ शकलं नाही. भारतातून थेट काबूलची विमानसेवा बंद आहे. त्यामुळे आम्ही इराण किंवा पाकिस्तानमार्गे परत जाऊ शकतो. त्यासाठी आम्हाला मदत मिळायला हवी. आमच्या राजदूतांनी यासाठी प्रयत्न करायला हवेत."
कैस युसूफजाई यांना ब्रेन ट्यूमर आहे. ते एकटेच उपचारासाठी दिल्लीला आले होते.
त्यांची किमोथेरपीही झाली आहे. आता फक्त ते मायदेशी परतण्यासाठी अस्वस्थ आहेत.
अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे कुटुंबीयांची काळजी पूर्वीपेक्षा जास्त सतावत राहते, असं ते म्हणाले.
दिल्लीत उपचारासाठी आलेले अफगाणी नागरिक अशाच प्रकारे अडचणीत सापडले आहेत. ते दिल्लीच्या आसपास आधीपासून राहत असलेल्या अफगाणी नागरिकांकडे मदतीसाठी आर्जव करत असल्याचं दिसून येतं.
UN कडूनही मिळाली नाही मदत
दिल्लीच्या अफगाण समाजाचे प्रमुख अहमद झिया गनी सांगतात, "इथं आधीपासून राहत असलेल्या अफगाण नागरिकांची स्थितीही दयनीयच आहे. शरणार्थींसाठी संयुक्त राष्ट्रसंघांकडून नियुक्त करण्यात आलेल्या युनायटेड नेशन्स हाय कमिश्नर फॉर रिफ्यूजीज संस्थेकडूनही त्यांना मदत मिळू शकत नाही.
दिल्लीतील अफगाणिस्तान दूतावास कार्यालयाचं काम पूर्वीप्रमाणे सुरू झालं आहे. तालिबान सरकारने पुन्हा पासपोर्ट-व्हिसा प्रक्रिया सुरू केली आहे. पण भारताने अद्याप नव्या सरकारला मान्यता दिली नाही. या कामात घाई करू नये, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे.
ज्याप्रमाणे भारतात अफगाणिस्तानचे नागरिक अडकले आहेत, त्याचप्रमाणे अनेक भारतीय नागरिक अफगाणिस्तानात अडकलेले आहेत.
इथं अडकलेल्या नागरिकांकडे पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे. पण अफगाणिस्तानत अडकलेले या मार्गाने येऊ शकत नाहीत. तसंच इराणही अफगाणिस्तान अडकलेल्या भारतीय नागरिकांना व्हिसा देत नसल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)