महाराष्ट्र अतिवृष्टी : शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई कुणीही देऊ शकत नाही -दादा भुसे

शेतकरी, पाऊस, मराठवाडा
फोटो कॅप्शन, पावसामुळे झालेलं नुकसान
    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

विदर्भ-मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस, मका ही हाताशी आलेली पिकं उद्ध्वस्त झाली. अजूनही अनेक शेतं पाण्याखाली आहेत. पंचनामे सुरू आहेत. आता शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत.

सरकारकडून मदत कधी मिळणार? पीकविम्याच्या तक्रारींवर सरकार काय करणार? मुख्यमंत्र्यांनी अजून नुकसानग्रस्त भागांचा दौरा का केला नाही? अशा शेतकऱ्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीने महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रश्न - या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालय. त्यांना मदतीची अपेक्षा आहे. सरकार कधी मदत करणार आहे?

दादा भुसे - हे खरं आहे की, या पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक गेलं. जीवितहानी झाली. जनावरे गेली. अजूनही पुण्यात पाऊस पडतोय. आतापर्यंत 38 लाख हेक्टर जमिनीचे पंचनामे कर करण्यात आले आहेत.

दादा भुसे, शेतकरी, पाऊस, महाराष्ट्र, अतिवृष्टी

फोटो स्रोत, Facebook/Dadaji Bhuse

अजूनही पंचनामे सुरू आहेत. ही पंचनाम्यांची प्रक्रिया जशी पूर्ण होईल, तशी निकषांप्रमाणे मदत दिली जाईल. जिरायत, बागायत, नदीकाठची शेतं सगळ्याचे निकष वेगवेगळे आहेत. त्यामुळे पंचनाम्यांनंतर किती मदत द्यायची हे स्पष्ट होईल.

प्रश्न - पंचनाम्याचं काम आणि ही प्रक्रिया खूप संथ गतीने होत आहे, अशा अनेक तक्रारी बीबीसी मराठीकडे आल्या आहेत. विशेषत: औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या तक्रारी आहेत. तुमचं यावर काय म्हणणं आहे?

दादा भुसे - हे खरं नाहीय. जिथे जिथे नुकसान झाले आहे, तिथे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एक-दोन मागेपुढे होत असेल. पण मी सरकारकडून आश्‍वस्त करतो की कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.

दादा भुसे, शेतकरी, पाऊस, महाराष्ट्र, अतिवृष्टी

फोटो स्रोत, Facebook/Dadaji Bhuse

प्रश्न - राज ठाकरेंनी सरकारला पत्र लिहिलं आहे की, पंचनामे होत राहतील आता शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. तात्काळ त्यांना 50 हजारांची मदत करा, हे शक्य आहे का?

दादा भुसे - विरोधी पक्ष म्हणून मागणी करणं काही वाईट नाही. पण मागणी करताना हे व्यवहारिकदृष्ट्या शक्य आहे का? हे पाहिलं पाहिजे. सरकारचे निकषानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाईल. पण 100% नुकसान भरपाई कोणीच देऊ शकत नाही. मग सरकार कोणाचही असू दे. 100% नुकसान भरपाई होऊ शकत नाही. आपण शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी खारीच्या वाट्याची मदत करणाचं काम करतो.

प्रश्न - म्हणजे नेमकी किती टक्के नुकसान भरपाई तुम्ही देऊ शकता?

दादा भुसे - आताचे जे निकष आहेत त्या निकषानुसार, 100 % नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला देता येत नाही. हे निकष बदलण्याची गरज आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्रही लिहिलं आहे.

प्रश्न - तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की, काही गोष्टी व्यवहारिकदृष्ट्या शक्य नसतात. युतीचं सरकार असताना आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांना 25 हजार रूपये हेक्टरी मदत द्यावी ही मागणी केली होती. हे व्यवहारिकदृष्ट्या योग्य आहे का? ही मदत आता देणं का शक्य नाही?

दादा भुसे - त्यावेळी उद्धव ठाकरेंनी निश्चित ही मागणी केली होती. पण या सरकारमध्ये एनडीआरफच्या निकषांपेक्षा अधिकची मदत आपण शेतकऱ्यांना केली आहे.

प्रश्न - केंद्र सरकारकडे मदतीसाठी राज्य सरकार विनंती करणार का?

दादा भुसे - पहिल्या टप्प्यात जे नुकसान झालेला तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. आता जो पाऊस सुरू आहे तो ही अहवाल आम्ही केंद्र सरकारकडे पाठवू.

दादा भुसे, शेतकरी, पाऊस, महाराष्ट्र, अतिवृष्टी

फोटो स्रोत, Facebook/Dadaji Bhuse

प्रश्न - 2019 साली पीकविमा कंपन्यांवर शिवसेनेने मोर्चा काढला होता. उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चात सहभागी झाले होते. आता ते मुख्यमंत्री आहेत. तरीही हा प्रश्न सुटलेला नाही. शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या संबंधित असंख्य तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर तोडगा का निघत नाही?

दादा भुसे - पंतप्रधान पीकविमा योजना ही केंद्र सरकारची आहे. याचे निकषही केंद्राचे आहेत. मागच्यावर्षी शेतकऱ्यांचा, राज्याचा आणि केंद्राचा हिस्सा मिळून 5800 कोटी रूपये होतात. पण पीकविमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई फक्त 750 कोटी रूपये देण्यात आले आहेत. अजून 200 कोटी देण्याचं त्यांनी मान्य केले आहे. याचा सारांश फक्त 1000 कोटी रूपये नुकसान भरपाई दिली जातेय. 27 लाख 72 हजार शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे पीकविमा कंपना कळवलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने जे पंचनामे केले आहेत ते ग्राह्य धरून पीकविमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई दिली जावी अशा सूचना आम्ही वारंवार दिल्या आहेत. पण कंपन्या केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्यामुळे त्या राज्याच्या सूचनांचं पालन करत नाहीत. आम्ही दिल्लीतूनही याचा पाठपुरावा करत आहोत.

प्रश्न - नुकसानग्रस्त भागात मुख्यमंत्री कधी दौरा करणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. तुम्हाला माहिती आहे का?

दादा भुसे - सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देणं गरजेचं आहे. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते ते काम करतायेत. मुख्यमंत्रीही शेतकऱ्यांना काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत हे आश्वस्त करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांची काळजी आहेच, याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना निश्चितपणे लवकरच येईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)