नवरात्र : घटस्थापनेपासून महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळे उघडणार #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. नवरात्र : घटस्थापनेपासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे उघडणार, राज्य सरकारचा निर्णय
येत्या नवरात्रीपासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरं उघडण्यात येतील, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शुक्रवारी (24 सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात ट्वीट करून या निर्णयाबाबत माहिती दिली.
7 ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस आहे. त्या निमित्ताने राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
तत्पूर्वी, कालच राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. दुपारी यासंदर्भातील निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने संध्याकाळी मंदिरांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
2. आरोग्य विभागाची 25-26 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा रद्द
महाराष्ट्रात 25 आणि 26 सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. पण ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, facebook
याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षार्थींची माफी मागितली. परीक्षा चार दिवसांवर असतानाही अभ्यासक्रमाची कल्पना नाही. अनेकांचे प्रवेशपत्र अद्याप मिळाले नाहीत. प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ दिलेली नाही.
तसंच दोन पदांसाठी अर्ज केलेल्या परीक्षार्थींना दोन्ही परीक्षांना बसणं अशक्य होईल, अशा प्रकारे नियोजन करणं ही यामागची कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.
3. 'यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यानंतर नितीन गडकरी हेच दिल्लीत महाराष्ट्राचे नेते'
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर दिल्लीत महाराष्ट्राचे नेते म्हणून नितीन गडकरी हेच आहेत, असं अजित पवार म्हणाले.

फोटो स्रोत, @nitingadkary
पुण्यात सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनादरम्यान आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
"निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडतो. पण नंतर विकास करताना एकत्र यायला हवं. दिल्लीत कोणत्याही पक्षाचा खासदार नितीन गडकरी यांना भेटतो तेव्हा ते आपलेपणाने त्यांचे प्रश्न सोडवतात," असं अजित पवार म्हणाले.
"पूर्वीच्या काळी यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्राला फायदा व्हायचा. तसाच फायदा आता गडकरींमुळे राज्याला मिळत आहे," असंही पवार यांनी म्हटलं. ही बातमी ई-सकाळने दिली.
4. मी हात जोडतो, किरीट सोमय्यांना अडवू नका - हसन मुश्रीफ
भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला येण्यापासून अडवलं जाऊ नये, असं आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या कोल्हापुरात जाऊन पत्रकार परिषद घेणार होते.

फोटो स्रोत, Getty Images
पण किरीट सोमय्या यांना कोल्हापूरात जाण्यापासून पोलिसांकडून रोखण्यात आलं होतं. या घटनेचे मोठे राजकीय पडसाद उमटले, अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, आता स्वतः हसन मुश्रीफ यांनीच सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यापासून अडवलं जाऊ नये अशी विनंती केली आहे.
"सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की, कोणीही त्यांची अडवणूक करू नये. त्यांना शांततेच्या मार्गाने येऊ द्यावं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कोणतीही कृती करु नका. जे बोलायचं ते त्यांना बोलू द्या," असं मुश्रीफ म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. मानपाडा बलात्कार प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये - अस्लम शेख
"डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीचा छळ करून करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये," अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
पालकमंत्री शेख यांनी शुक्रवारी (24 सप्टेंबर) सायंकाळी मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी ते पत्रकारांसोबत बोलत होते.
"या प्रकरणात राजकीय दबाव येता कामा नये. सर्व आरोपींना लवकराच लवकर कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरून असा गुन्हा करण्यास कुणीही धजावणार नाही," असं शेख म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








