किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत या 9 घोटाळ्यांचे आरोप केले आहेत, त्याचं पुढे काय झालं?

अजित पवार आणि अशोक चव्हाण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

किरीट सोमय्या यांनी नुकताच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. मुश्रीफ यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

पण, सोमय्यांनी आरोप केल्याचं हे काही पहिलंच प्रकरण नाहीये. त्यांनी आतापर्यंत अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. यातल्या काही नेत्यांना पद गमवावं लागलं, तर काही जणांच्या मागे चौकशी संस्थांचा ससेमिरा लागला आहे.

त्यामुळे सोमय्या यांनी आरोप केलेले हे नेते कोण आहेत, त्यांच्यावर सोमय्यांनी काय आरोप केले आहेतआणि या आरोपांचं पुढे काय झालं, हे आता आपण जाणून घेणार आहोत.

1. अजित पवार

कथित सिंचन घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले होते.

सिंचन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना किरीट सोमय्या यांनी मार्च 2016 मध्ये म्हटलं होतं, "अजित पवारांच्या संबंधित एका सिंचन घोटाळ्यातलं होमवर्क अंतिम टप्प्यात आहे. याची चौकशी झाली की अजित पवार यांची दिवाळी आर्थर रोड कारागृहात जाणार."

सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात तसंच त्यांच्या पूर्ततेमध्ये अनियमतता आढळली, असं CAGनं म्हटलं तेव्हा अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. त्यामुळे या नियमितता आणि गैरव्यवहाराची जबाबदारी अजित पवारांची आहे असं तत्कालीन विरोधी पक्षांनी म्हटलं होतं. महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान, डिसेंबर 2019मध्ये अॅंटिकरप्शन ब्युरोने (लाचलुचपत प्रतिबंध खाते) अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी क्लीन चिट दिली.

2. अशोक चव्हाण

काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झालेला आदर्श घोटाळाही किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला होता.

मुंबईतल्या आदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याचं हे प्रकरण होतं.

हे प्रकरण समोर आल्यानंतर नोव्हेंबर 2010 मध्ये अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

3. छगन भुजबळ

किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर वारंवार आरोप केले आहेत.

कथित महाराष्ट्र सदन घोटाळा, सदनिका घोटाळा आणि आर्मस्ट्राँग घोटाळा, अशा वेगवेगळ्या वेळी आरोप केले आहेत.

भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना झालेल्या महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यामध्ये भुजबळ यांना लाखो रुपयांची लाच देण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना दोन वर्षे तुरुंगात राहावं लागले होतं.

सप्टेंबर 2021मध्ये कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं भुजबळ यांना दोषमुक्त केलं.

छगन भुजबळ

फोटो स्रोत, Getty Images

आर्मस्ट्राँग कंपनीच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा व्हाईट केला आहे. मुळात ज्यांच्याकडून ही कंपनी खरेदी केली ती कंपनीच बनावट आहे. आर्मस्ट्राँग असेल किंवा मुंबईतील इमारत या सर्व बनावट कंपनांच्या नावाने खरेदी करुन भुजबळांनी तब्बल 120 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप सोमय्या यांनी नाशिकमध्ये केला.

तर सोमय्या यांनी आरोपांमध्ये ज्या ज्या गोष्टी दाखवल्या त्या सगळ्या गोष्टी 4 ते 5 वर्षांपूर्वीच्या जुन्या गोष्टी आहेत. ही सगळी प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असून ती न्यायप्रविष्ट आहेत. किरीट सोमय्यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

4. नारायण राणे

नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी नोव्हेंबर 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

राणे यांचे नीलम हॉटेल आणि ग्रुप ऑफ कंपनीमध्ये शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार आहेत. शेकडो कोटी रुपयांचे कर्ज, समभाग व उलाढाली आहेत. काही कंपन्या काढून कमी रुपयांचे समभाग दाखवून ते अधिक किंमतीला विकून मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

नारायण राणे

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, खासदार नारायण राणे

सप्टेंबर 2021मध्ये नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

5. प्रताप सरनाईक

किरीट सोमय्या यांनी डिसेंबर 2020मध्ये शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर अनधिकृत इमारत बांधली असल्याचा आरोप केला.

"प्रताप सरनाईक यांनी 250 कोटी रुपये लाटले असून विहंग हाऊसिंग स्किममध्ये मोठा घोटाळा केला आहे. त्या कंपनीवर कारवाई देखील झाली होती. आता त्या कंपन्याच अस्तित्वातच नाही आहेत", असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

प्रताप सरनाईक

फोटो स्रोत, Getty Images

या संबंधित कागदपत्रे त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयात सादर केले होते. यानंतर प्रताप सरनाईक यांनी किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला होता.

सध्या प्रताप सरनाईक आणि कुटुंबीयांमागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

6. अनिल परब

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी 2019 मध्ये केला होता. त्यानुसार त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती.

परब यांनी वांद्रे पूर्वेकडील गांधी नगर येथील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळ्या जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केले असल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती.

याप्रकरणी चौकशी करून अनधिकृत बांधकाम तोडून संबंधित जागा नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली.

अनिल परब

फोटो स्रोत, Adv. Anil Parab/facebook

फोटो कॅप्शन, अनिल परब

या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, परब यांनी सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

7. भावना गवळी

सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी त्यांनी ED,CBI, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे केली.

तर भूखंड माफियांच्या गोष्टी आम्ही उघड करत असल्यामुळेच बाहेरचे लोक बोलवून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, असा आरोपही गवळी यांनी केला.

भावना गवळी

फोटो स्रोत, FACEBOOK/Bhavana Pundlikrao Gawali

फोटो कॅप्शन, भावना गवळी

सोमय्या यांच्या आरोपाच्या काही दिवसांनंतर सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर छापे टाकले.

8. मिलिंद नार्वेकर

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता कोकणात दापोलीमध्ये समुद्र किनारी बंगला बांधला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

महाविकास आघाडी सरकार नार्वेकरांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

या आरोपानंतर मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला.

9. हसन मुश्रीफ

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर 127 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध माध्यमांतून भ्रष्टाचार आणि घोटाळे करत शेकडो कोटींची बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

हसन मुश्रीफ

फोटो स्रोत, Facebook/Hasan Mushrif

फोटो कॅप्शन, हसन मुश्रीफ

मुश्रीफ यांनी हे आरोप फेटाळले असून किरीट सोमय्यांच्या आरोपांमागे भाजपचं षडयंत्र आहे, असं म्हटलं.

आरोपांतून काय साध्य होतं?

महाविकास आघाडी सरकारमधले नेते आणि मंत्र्यांविरोधात सोमय्या सातत्यानं आरोप करत आहेत. यातून नेमकं काय साध्य होतं किंवा यामागचा हेतू काय असू शकतो, असा प्रश्न उपस्थित होतो.

किरीट सोमय्या, भाजप, शिवसेना, मुंबई

फोटो स्रोत, Hindustan Times

याविषयी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, "भ्रष्टाचाराविरोधातलं राजकारण यशस्वी होत असतं. यामुळे लोकांमध्ये एकप्रकारचं परसेप्शन तयार होतं. हे सोमय्या यांना चांगलंच माहिती आहे आणि त्याचा ते फायदा घेत आहेत. हे सरकार म्हणजे महावसुली सरकार आहे, अशाप्रकारचं परसेप्शन तयार करण्याचा हा भाग असतो."

तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत अस्तित्व टिकवायचं असेल तर महाविकास आघाडी सरकार भ्रष्ट आहे, हे दाखवायचा भाजपचा प्रयत्न असू शकतो, असं मत लोकमतचे सहाय्यक संपादक संदीप प्रधान मांडतात.

त्यांच्या मते, "2024ची लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र लढले तर ते भाजपसमोर मोठं आव्हान उभं करू शकतात. त्यामुळे मग शिवसेना हिंदुत्वापासून दूर चालली आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री कसे भ्रष्ट आहेत, हे दाखवून द्यायचा भाजप प्रयत्न करत आहे. याच अनुषगानं सत्तेतल्या आक्रमक नेत्यांवर आरोप केले जात आहेत. जेणेकरून या नेत्यांच्या लढण्याच्या क्षमतेला ब्रेक लागतो आणि यातून जनतेत नेत्यांविरोधात एक परसेप्शन तयार होण्यास मदत मिळते."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)