'नरेंद्र मोदी यांचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण जास्त आवडतो' - प्रीतम मुंडे #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, facebook

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. नरेंद्र मोदी यांचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण जास्त आवडतो - प्रीतम मुंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आतापर्यंत एकही पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला सर्वाधिक आवडतो, असं प्रतिपादन बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केलं आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान प्रीतम मुंडे बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, "पंतप्रधान मोदी यांचा मला सगळ्यांत आवडणारा गुण म्हणजे​ त्यांनी गेल्या 7 वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याविषयी त्यांच्यावर टीका झाली. पण जो माणूस आपलं काम करतो, तो आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत राहतो.

"कोणत्याही व्यक्तीबाबत चांगलं बोलणारे 10 जण असले तर टीका करणारे 2 जण असतात. आपण विचलित न होतं आपलं काम करत राहणं महत्त्वाचं असतं, असं त्या म्हणाल्या. ही बातमी ई-सकाळने दिली.

2. कसलीही कारणं सांगू नका, माझ्या गतीने काम करा - अजित पवार

बारामती येथील पेट्रोल पंपाच्या परवानगीच्या कामात उशीर होत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी दर्शवली आहे.

अजित पवार

फोटो स्रोत, facebook

यासंदर्भात कसलीही कारणं सांगू नका, माझ्या गतीने काम करा, अशी सूचना अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना दिली आहे.

हे काम दिवाळीपूर्वी पूर्ण झालं पाहिजे. तुम्हाला आवश्यक तिथं सर्व सहकार्य तुम्हाला केलं जाईल, असं पवार यांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.

3. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला DGCA चा परवाना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळावरील IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडच्या SPVला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून (DGCA) चालन परवाना प्राप्त झाला आहे.

यामुळे चिपी विमानतळावरून विमान वाहतूक करण्यासाठी कंपनीला हिरवा झेंडा मिळाला आहे.

विमान

फोटो स्रोत, Getty Images

DGCA ने कंपनीला एरोड्रोम लायसन्स दिलं आहे. त्यामुळे चिपी विमानतळ एयरलाईन्स आणि सर्वसामान्य जनतेसाठी खुला करणे कंपनीला शक्य होईल.

येत्या 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ सुरू होत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिणेकडील राज्ये, मुंबई व त्यानंतर देशातील अनेक वेगवेगळे भाग हवाईमार्गे जोडले जावेत हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

4. सरकार टिकणार हे सांगणं म्हणजे दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न - आशिष शेलार

"तुमचं सरकार पाच वर्षे टिकणार असेल तर तुम्हाला बोलावं का लागत आहे? सरकार टिकणार हे सांगणे म्हणजे आपल्या अंतर्गत असलेला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न आहे," अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार

फोटो स्रोत, facebook

आपले पाप झाकण्यासाठी देखणेपणाने का होईना बोलावं लागतं. संजय राऊत तेच करत आहेत. मोदी यांच्या नावावर मतं मिळवायची आणि जिंकून आल्यावर दुसरीकडे जायचं. शिवसेना दुबळी आहे. त्यामुळेच ते आता पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असं शेलार यांनी म्हटलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

5. रामदास कदम यांनी सरकार अस्थिर करण्याचं काम केलं, मनसे नेत्याचा आरोप

शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केलं आहे, असा गंभीर आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेत पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांची सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे.

रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांची देखील बेनामी संपत्तीची माहिती जगासमोर आणावी, असं आव्हान खेडेकर यांनी सोमय्या यांना दिलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)