साकीनाका बलात्कारानंतर मुंबईला पुन्हा हादरा, अल्पवयीन मुलीवर बलात्कार #5 मोठ्याबातम्या

महिला अत्याचार

फोटो स्रोत, iStock

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. साकीनाका बलात्कारानंतर मुंबईला पुन्हा हादरा, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

साकीनाका बलात्कार प्रकरणामुळं महाराष्ट्र हादररेला असतानाच ठाण्याच्या उल्हासनगरमध्येही बलात्काराची एक घटना घडली आहे. याठिकाणी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचं वृत्त महाराष्ट्र टाईम्सनं दिलं आहे.

उल्हासनगरमधील रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार घडला आहे. 14 वर्षांच्या या अल्पवयीन मुलीवर एका पडक्या घरात बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी श्रीकांत गायकवाड उर्फ दादा याला अटक केली आहे.

शिर्डीहून कल्याणला आलेली ही मुलगी उल्हासनगर स्थानकाजवळच्या स्कायवॉकवर उभी होती. त्याठिकाणी तिचे दोन मित्रही होते. तेव्हा एकजण तिच्याजवळ आला. त्याच्या हातात असलेला हतोडा दाखवून त्यानं तिच्या मित्रांना पळवून लावलं. त्यानंतर बळजबरीनं या तरुणीला घटनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला.

या प्रकारानंतर पहाटेपर्यंत मुलगी त्याठिकाणीच पडलेली होती. आरोपी बलात्कारानंतर पळून गेला. त्यानंतर तरुणीनं मित्रांना फोन केला आणि घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली.

पोलिसांनी तातडीनं तपास करत आरोपी गायकवाड याला अटक केली आहे. त्यानं गुन्हा मान्य केला असून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2. साकीनाका प्रकरणी 1 महिन्यात आरोपपत्र दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

साकीनाका याठिकाणी घडलेल्या महिलेच्या बलात्कार प्रकरणी एका महिन्यात आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. तसंच जलदगती न्याय कसा दिला जातो, हेही अशा नराधमांना दाखवून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या प्रकरणी तातडीनं सरकारी वकिलांची नियुक्ती करून न्यायालयीन खटल्याची तयारी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेत, त्यांना या सूचना केल्या. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

अत्याचार

फोटो स्रोत, Getty Images

हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठीदेखील प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई या शहराची ओळख सुरक्षित शहर अशी आहे. पण अशा घटनांमुळं ती ओळख डागाळू नये, याची काळजी घेण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी काही सूचना केल्या आहेत.

3. मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात सर्वांसमोर बाचाबाची, व्हीडिओ व्हायरल

महाविकास आघाडी सरकरामधील पक्षांच्या नेत्यांमध्ये बेबनाव असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यामध्ये सर्वांसमोरच बाचाबाची झाली.

दोघांमधील वादाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. टिव्ही 9 नं याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा तसंच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे अतिवृष्टी झालेल्या नांदगाव भागात दौऱ्यावर होते. पाहणीनंतर छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीतच भुजबळ आणि कांदे यांच्यामध्ये खडाजंगी उडाल्याचं पाहायला मिळालं.

छगन भुजबळ

फोटो स्रोत, Facebook/Chhagan Bhujbal

नांदगाव परिसराला गेल्या आठवड्यात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीनं आपत्कालीन निधी देण्याची मागणी सुहास कांदे यांनी केली. त्यावरूनच या दोघांमध्ये वाद वाढत गेल्याचं पाहायला मिळालं.

तहसिल कार्यालयात झालेल्या या बैठकीत छगन भुजबळ यांनी आपत्कालीन निधी देण्याचं आश्वासन दिलं. पण तातडीनं मदत मिळण्याची मागणी कांदे यांनी केली. त्यासाठी जिल्हाधिकारी, अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल, पण ते तातडीनं शक्य नसल्याचं भुजबळ म्हणाले त्यावर कांदे आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

या प्रकारानंतर सुहास कांदे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी देखील केली. छगन भुजबळ नांदगाव तालुक्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कांदे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

4. उत्तर प्रदेशात सर्व 403 जागा लढवणार शिवसेना, युतीदेखील करण्याच्या तयारी

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेनं उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. झी 24 तासनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

2022 च्या विधानसभा निवडणुकीत सर्व 403 जागा लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. या निवडणुकीसाठी भविष्यात युती करण्याचे संकेतही देण्यात आलेले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, परमबीर सिंह, सचिन वाझे

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या लखनऊमध्ये झालेल्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती, पक्षाचे प्रदेश प्रमुख ठाकूर अनिल सिंह यांनी दिली.

उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेलेली आहे. कोरोनाकाळात मृतदेहांचीदेखील विल्हेवाट लावता आली नाही. राज्यात सगळीकडं जंगराज आहे, अशी टीकाही त्यांनी योगी सरकारवर केली.

5. पंतप्रधान इंदिरा गांधींना अपात्र ठरवण्याचा निर्णय धाडसी - सरन्यायाधीश

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवण्याचा न्यायालयाचा निर्णय हा अत्यंत धाडसी निर्णय होता, असं सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अलाहाबाद हायकोर्टानं 1975 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर देशात 2 वर्षांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती, असं रमण्णा म्हणाले.

जस्टीस जगमोहन सिन्हा यांनी इंदिरा गांधींना अपात्र ठरवण्याबाबत निर्णय दिला होता आणि हा अत्यंत धाडसी निर्णय होता असं रमणा म्हणाले.

निवडणुकीतील गैरप्रकारांप्रकरणी इंदिरा गांधींना दोषी ठरवत त्यांना न्यायालयानं अपात्र ठरवलं होतं. तसंच त्यांना सहा वर्ष कोणतंही पद स्वीकारण्यासही अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्याचा परिणाम म्हणजे दोन वर्षांची आणीबाणी लावण्यात आली, असंही रमण्णा यांनी सांगितलं.

अलाहाबाद उच्च न्यायालयातील नव्या इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात रमणा यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचीदेखील पायाभरणी झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही यावेळी उपस्थिती होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)