ममता बॅनर्जी भवानीपूर पोटनिवडणुकीत मोठ्या फरकानं विजयी

फोटो स्रोत, SANJAY DAS/BBC
- Author, टीम बीबीसी हिंदी
- Role, नवी दिल्ली
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. भाजपच्या प्रियंका टिबरीवाल यांचा त्यांनी पराभव केला.
भवानीपूर विधानसभा जागेसाठी 30 सप्टेंबरला मतदान झालं होतं. आज (3 ऑक्टोबर) मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळवून देणाऱ्या ममता बॅनर्जी स्वतः मात्र नंदिग्राम विधानसभा मतदारसंघातून शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी त्यांचा हा पारंपरिक मतदारसंघ पुन्हा रिक्त करून देण्यात आला होता.
दक्षिण कोलकात्याच्या या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला होता, तर डाव्या पक्षांनीही याठिकाणी कमकुवत उमेदवार मैदानात उतरवला होता.
भाजपकडून पश्चिम बंगालमधील भाजपच्या प्रवक्त्या आणि महिला आघाडीच्या नेत्या प्रियंका टिबरीवाल या ममता बॅनर्जींना टक्कर देण्यासाठी मैदानात उतल्या होत्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
प्रियंका टिबरीवाल पश्चिम बंगालमधील भाजपचा प्रसिद्ध किंवा सुपरिचित चेहरा आहेत. पण त्यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक जिंकलेली नव्हती.
मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी महत्त्वाची निवडणूक
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळवून देणाऱ्या ममता बॅनर्जी स्वतः मात्र नंदिग्राम विधानसभा मतदारसंघातून शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात पराभूत झाल्या होत्या.
ममता यांनी 5 मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्या पदावर कायम राहण्यासाठी त्यांना सहा महिन्यांमध्ये निवडणुकीत विजय मिळवणं गरजेचं होतं.

फोटो स्रोत, Facebook
ममता यांना निवडून येता यावं म्हणून मे महिन्यातच भवानीपूरमधून विजयी झालेले तृणमूलचे नेते शोभन देव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला होता.
ममता बॅनर्जी भवानीपूरमधून दोन वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या आहेत. त्यांनी याठिकाणी 2011 मध्ये पोटनिवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2016 मध्येही निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता.
शुभेंदू अधिकारी यांना आव्हान देण्यासाठी त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडत नंदिग्राममधून निवडणूक लढवली. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
कोण आहेत प्रियंका टिबरीवाल?
भाजपनं पश्चिम बंगालमधील त्यांच्या प्रवक्त्या आणि महिला आघाडीच्या नेत्या प्रियंका टिबरीवाल यांना ममता बॅनर्जींच्या विरोधात मैदानात उतरवलं आहे.
टिबरीवाल पेशाने वकील आहेत आणि पश्चिम बंगालमधील भाजपचा प्रमुख चेहराही आहेत. त्यांनी दोन वेळा निवडणूक लढवली आहे आणि दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

फोटो स्रोत, @IMPRIYANKABJP
त्यांनी पहिली निवडणूक 2015 मध्ये कोलकाता महानगर पालिकेत लढली होती. त्याठिकाणी त्यांचा पराभव झाला होता.
याचवर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी एंटाली या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तृणमूलच्या स्वर्ण कमल साहा यांनी त्यांचा 58,257 मतांनी पराभव केला होता.
मूळ मारवाडी समुदायातील असलेल्या प्रियंका हिंदी भाषिक आहेत. पण त्या बंगालीही चांगली बोलतात. काही प्रमाणात तरी त्या ममता बॅनर्जींचा सामना करू शकतील असं विश्लेषकांचं मत आहे.

फोटो स्रोत, @IMPRIYANKABJP
"मला वाटतं की ममता यांना वॉकओव्हर मिळालेला नाही. डाव्यांनी अनोळखी चेहरा देऊन आणि काँग्रेसनं उमेदवार न उतरवून त्यांनी वॉकओव्हर दिया असला तरी, भाजपनं चांगला उमेदवार दिला आहे," असं पश्चिम बंगालमधील दैनिक जागरणचे स्टेट ब्युरो प्रमुख जयकिशन वाजपेयी म्हणाले.
"भाजपनं पोटनिवडणुकीसाठी समिती तयार केली आहे. प्रत्येक वार्डची जबाबदारी नेत्यांना दिली आहे. त्यावरून ते संपूर्ण शक्तिनिशी ही निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट होतं," असंही ते म्हणाले.
प्रियंका टिबरीवाल पश्चिम बंगालच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातही कायदेशीररित्या सक्रिय राहिलेल्या आहेत. त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून सुप्रीम कोर्टातही कॅव्हेट दाखल केलं आहे.
"निवडणुकीतील हिंसाचाराच्या मुद्द्यावर त्या उच्च न्यायालयापर्यंत गेल्या. वकील म्हणून त्या सक्रिय आहेत. त्यांनी एंटाली सोडून गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना न्यायालयाच्या माध्यमातून पुन्हा पक्षात आणलं आहे," असं वाजपेयी म्हणाले.
मात्र, ज्येष्ठ पत्रकार जयंतो घोषाल यांचं मत हे जयकिशन वाजपेयी यांच्यापेक्षा वेगळं आहे. प्रियंका पूर्ण ताकदीने लढतील हे खरं असलं तरी त्या ममतांना विशेष टक्कर देऊ शकणार नाहीत, असं ते म्हणाले.
"प्रियंका टिबरीवाल यांच्या विजयाची शक्यता अगदीच कमी आहे. पण या निवडणुकीत जिंकणं हाच एकमेव उद्देश नाही. या जागेवर 2016 विधानसभा निवडणुकीत भाजपचा मतांचा टक्का वाढला होता.
ममता नंदिग्रामला गेल्या त्यावेळी भाजपनं त्यांच्यावर टीका केली. भवानीपूर ममतांसाठी सुरक्षित मतदारसंघ राहिला नसल्यामुळं, ममता घाबरून नंदिग्रामला गेल्याची टीका करण्यात आली होती. त्यामुळं याठिकाणी मतांचा टक्का टिकवण्याचा किंवा वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल," असं घोषाल म्हणाले.

फोटो स्रोत, PM TEWARI
"ममता निवडणूक जिंकल्या तरी, जर त्यांना पूर्वीपेक्षा कमी मतं मिळाली, तर त्यांच्यासाठी हा टीका करण्यासाठी चांगला विषय ठरेल," असं घोषाल म्हणतात.
प्रियंका टिबरीवाल पश्चिम बंगाल भाजपच्या कोणत्याही गटात सहभागी नाहीत. "पश्चिम बंगाल भाजपमध्ये अंतर्गत राजकारणही आहे. इथं नेत्यांचे गट आहेत. पण प्रियंका टिबरीवाल या गटबाजीत सहभागी नाहीत, असं घोषाल म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








