राहुल गांधींचं काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं घोडं नेमकं कुठं अडलंय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या निर्णय किंवा धोरणांवर टीका करायची असो, संसदेत विरोधकांना एकत्र आणायचं असो किंवा केंद्राच्या धोरणांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा विषय असो, प्रत्येकवेळी काँग्रेसकडून एकच चेहरा समोर येतो, तो म्हणजे राहुल गांधींचा.
पण काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा विषय समोर येताच, हा चेहरा पुन्हा धूसर वाटू लागतो.
काँग्रेस अध्यक्षाच्या शर्यतीत लांब कुठंतरी उभ्या असलेल्या या चेहऱ्याला पुन्हा एकदा पुढं आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी हा प्रयत्न भारतीय युवक काँग्रेस (आयवायसी) नं केला आहे. गोव्यात नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आयवायसीनं राहुल गांधींनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं, असा प्रस्ताव मंजूर केला आहे.
"राहुल गांधींनी अद्यक्षपद स्वीकारल्यास, केंद्र सरकारविरुद्ध लढा देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल," असा प्रस्ताव मंजूर करण्यामागचा उद्देश असल्याचं, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास म्हणाले.
पण राहुल गांधी पुन्हा एकदा ही जबाबदारी घेण्यासाठी तयार आहेत का? हा खरंतर यक्षप्रश्न आहे.
राहुल गांधींचा राजकीय प्रवास
2004 मधला काळ होता. त्यावेळी राहुल गांधी अवघे 34 वर्षांचे होते. ते अमेठीमधून सर्वप्रथम लोकसभा निवडणूक जिंकले होते. तीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात.
2007 मध्ये त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं सरचिटणीसपद देण्यात आलं. 2013 मध्ये त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं उपाध्यक्ष बनवण्यात आलं. डिसेंबर 2017 मध्ये त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यात आलं.
2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विजयाचं श्रेय राहुल गांधींना मिळालं.

फोटो स्रोत, Twitter
पण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तेव्हापासून आतापर्यंत पक्षाचे अधिकृत अध्यक्ष नसतानाही अध्यक्षपदाच्या बहुतांश जबाबदाऱ्या तेच सांभाळत असल्याचं सार्वजनिक व्यासपीठांवर पाहायला मिळतं.
याशिवाय इतरही अनेक वेळा ते चर्चेत राहिले आहेत. 2013 मध्ये आरोपी नेत्यांना वाचवणारा युपीए सरकारचाच अध्यादेश थेट पत्रकार परिषदेतच फाडण्याचा विषय असो, अथवा महत्त्वाच्या वेळी विदेशात जाण्याचा मुद्दा.
राहुल गांधींनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून 17 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. पक्षाच्या अध्यक्षानं जे काही करायला हवं, ते सगळं राहुल गांधी करताना दिसतही आहेत.
पंजाब काँग्रेसमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील तणावाचा मुद्दा असो अथवा छत्तीसगड काँग्रेसमध्ये सुरू असलेली अंतर्गत रस्सीखेच असतो. प्रत्येकठिकाणी अध्यक्षाच्या भूमिकेत राहुल गांधीच असल्याचं दिसून आलं आहे. असं असतानाही अधिकृतरित्या अद्यक्षपद स्वीकारण्यात ते संकोच का करत आहेत?
राहुल गांधींच्या राज्याभिषेकाची तयारी
"राहुल गांधींमध्ये याबाबत काहीही संकोच नाही. त्यांनी अध्यक्षपद सोडल्यापासूनच, त्यांना पुन्हा एकदा अध्यक्ष बनण्याची इच्छा आहे. पण परिस्थिती त्यांना साथ देत नसल्याचं चित्र आहे," असं ज्येष्ठ पत्रकार जतीन गांधी म्हणाले.

फोटो स्रोत, AFP
जतीन गांधी यांनी वीनू संधू यांच्यासह राहुल गांधींवर 'राहुल' नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
"2019 मध्ये जेव्हा राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत चार पानांचं पत्र लिहिलं होतं, तेव्हा त्याचा सारांश हाच होता की, जर मी पराभवाची जबाबदारी स्वीकारत असेल तर काँग्रेसमध्ये इतर अनेक असे नेते आहेत, ज्यांनीदेखील ही जबाबदारी स्वीकारायला हवी. त्या पत्रात राहुल गांधींनी केवळ दोन पॅराग्राफ त्यांच्या जबाबदारीवर लिहिले होते," असं ते म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पण त्या पत्रानंतर राहुल गांधींशिवाय दुसरी कोणीही पराभवाची जबाबदारीही स्वीकारली नाही, आणि कोणी पदही सोडलं नाही.
त्यामुळे त्यांच्या राज्याभिषेकाची तयारी पुन्हा एकदा सुरू झाली आहे, असं जतीन सांगतात. काँग्रेसमध्ये ही जुनीच परंपरा आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.
यासाठी जतीन गांधी, यांनी उदाहरणंही दिली आहेत.
"2007 मध्ये पहिल्यांदा राहुल गांधींना जेव्हा सर्वात आधी अखिल भारतीय कांग्रेस कमिटीचं सरचिटणीस बनवण्यात आलं होतं, तेव्हा 2006 पासूनच त्यांना मोठी जबाबदारी देण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. 2006 मध्ये हैदराबादमध्ये झालेल्या अधिवेशनात त्याची सुरुवात झाली होती. राहुल गांधींना मोठी जबाबदारी द्यायला हवी, याबाबत तेव्हा बड्या नेत्यांची वक्तव्यं आली होती," असं ते म्हणतात.
दुसरं उदाहरण 2020 चं आहे. फेब्रुवारीच्या महिन्यात केरळपासून राजस्थानपर्यंत जनआक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. तोदेखील राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्याच्याच प्रयत्नांचाच एक भाग होता. पण त्यानंतर कोरोनाची साथ पसरली. त्यामुळे सर्वकाही जागीच थांबलं. तसं झालं नसतं तर राहुल गांधी 2020 मध्येच पुन्हा अध्यक्ष बनण्याची दाट शक्यता होती. त्यात काँग्रेसमधील अंतर्गत 'बंडखोर' नेत्यांच्या गटाचं पत्र समोर आल्यानंतर हे प्रकरण पुन्हा थंडबस्त्यात गेलं.
एकूण सांगायचं झाल्यास युवक काँग्रेसनं मंजूर केलेला प्रस्ताव असेल किंवा गेल्या काही दिवसांत विविध राज्यांमधील काँग्रेसनं मंजूर केलेले प्रस्ताव असतील, हे सर्व प्रयत्न म्हणजे अध्यक्ष बनवण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्याचे प्रयत्न आहेत, असं जतीन गांधींचं मत आहे.
राज्याभिषेकासाठी राहुल किती तयार?
आणखी एक सत्य म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसला सातत्यानं विधानसभा निवडणुकीत, पराभवाचा सामना करावा लागत आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी भलेही समाधानाकारक नसली तरी त्यांची मतांची टक्केवारी ही 2014 एवढीच म्हणजे, 20 टक्क्यांच्या आसपास होती.

फोटो स्रोत, Iyc
मात्र, गेल्या एका वर्षात बिहार, आसाम आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांत त्यांची कामगिरी अत्यंत वाईट ठरली आहे. आघाडीसंदर्भातील पक्षाच्या निर्णयाला पक्षांतर्गतच आव्हान देण्यात आलं.
अशा परिस्थितीत राहुल गांधी पुन्हा एकदा राज्याभिषेकासाठी तयार होतील?
या प्रश्नाच्या उत्तरं देताना ज्येष्ठ पत्रकार पल्लवी घोष यांनी, राहुल गांधी अधिकृतरित्या जबाबदारी घेण्यासाठी सज्ज दिसत नाहीत, असं मत व्यक्त केलं. पल्लवी घोष सीएनएन न्यूज 18 मध्ये वरिष्ठ संपादिका आहेत. दोन दशकांपासून काँग्रेससंदर्भातील वृत्तांकन त्या करत आहेत. राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी अगदी सुरुवातीपासून पाहिलं आहे.
"पक्षाचं काम करण्यासाठी अध्यक्षपदावर असायलाच हवं, अशी गरज वाटत नसल्याचं, राहुल गांधी म्हणतात. त्यांच्या या संकोचामुळेच काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक रखडली आहे. दोन वेळा ती टाळण्यात आली. आणखी एक बाब म्हणजे, त्यांना त्यांच्या नव्या टीमसह अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान व्हायचं आहे. पण त्यासाठी सोनिया गांधी तयार नाहीत," असंही त्या म्हणाल्या.
राहुल गांधींना तरुण नेत्यांची टीम हवी आहे हे, काँग्रेसच्या आत आणि बाहेर असलेल्या सर्वांनाच माहिती आहे. सुष्मिता देव, जतीन प्रसाद, ज्योतिरादित्य सिंधिया यांना त्यांना त्यांच्या टीममध्ये ठेवायचं होतं. पण एकापाठोपाठ हे सगळे काँग्रेस सोडून गेले आहेत. आता त्यांना जे नेते त्यांच्या टीममध्ये हवे आहेत, त्यात एनएसयूआयचे अध्यक्ष नीरज, युवक कांग्रेसचे अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास, मणिकम टागोर, केसी वेणुगोपाल यांची नावं आघाडीवर आहेत.
"काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी सध्याची वेळ योग्य नसल्याचा सल्ला, राहुल गांधींना त्यांच्या राजकीय सल्लागारांनी दिला आहे. आगामी काळात उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब आणि उत्तराखंड अशा राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यात पंजाबमध्ये विजयाची आशा काही प्रमाणात होती. पण त्याठिकाणी प्रचंड अंतर्गत कलह आहे. त्यामुळं राहुल गांधी योग्य वेळेची वाट पाहत आहेत," असं पल्लवी घोष म्हणाल्या.
त्यामुळं आगामी काळातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे आडाखे बांधले जात आहेत.
अध्यक्ष बनण्यासाठीच्या अटी?
अध्यक्ष बनण्यसाठी राहुल गांधींची तयारी किती आहे? याबाबतही जतीन गांधींनी मत मांडलं. "त्यांना काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी अत्यंत अनुकुल परिस्थिती हवी आहे. म्हणजे तुम्ही नवी गाडी खरेदी करायला जात असाल तर गाडी किती अॅव्हरेज देते, याखाली छोट्या अक्षरांमध्ये हे केवळ 'टेस्ट कंडीशन'मध्ये लागू असल्याचं लिहिलेलं असतं. प्रत्यक्षात जेव्हा गाडी रस्त्यावर चालते, तेव्हा अॅव्हरेज हा फार कमी असतो. राहुल गांधींना काँग्रेस चालवण्यासाठी तशी 'टेस्ट कंडीशन' हवी आहे. रस्त्यावर उतरताच अॅव्हरेज कमी होणारी, गाडी चालवण्यात त्यांन रस नाही," असं जतीन म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter
"राहुल गांधींच्या अनाधिकृत नेतृत्वात काँग्रेस पक्ष 2008 मधील, डाव्या पक्षांप्रमाणे वर्तन करत आहे. म्हणजे त्यांना जनतेची नाडी अथवा मुद्दे नेमके ओळखण्यात यश मिळेनासं झालं आहे. अध्यक्ष बनण्यासाठी राहुल गांधींना पक्षावर पूर्णपणे नियंत्रण हवं आहे. त्यांना पक्षाच्या कामकाजात वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप नको आहे.
तसंच अध्यक्ष बनण्यापूर्वी एक किंवा दोन राज्यांमध्ये पक्षानं चांगली कामगिरी करावी, अशीही त्यांची इच्छा आहे. तसं झालं नाही तर, किमान भाजपची कामगिरी थोडी खराब व्हावी, म्हणजे राहुल गांधींच्या आंदोलनांना त्याचं किमान काही श्रेय तरी मिळेल. त्याशिवाय ज्या राज्यांत त्यांची सत्ता आहे, त्याठिकाणी त्यांच्या शब्दाला किंमत असावी, अशीही त्यांची इच्छा आहे," असं मत जतीन गांधी यांनी मांडलं.
म्हणजेच युवक काँग्रेसच्या प्रस्तावावर राहुल गांधी अंमलबजावणी करू शकतात, पण त्यासाठी त्यांच्या काही अटी असतील. त्यामुळेच पुन्हा एकदा अद्यक्षपदी विराजमान होण्यासाठी विलंब होत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








