नारायण राणेंच्या अटकेची कारवाई अनिल परबांच्या आदेशाने झाली?

अनिल परब

फोटो स्रोत, Adv. Anil Parab/facebook

फोटो कॅप्शन, अनिल परब
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिवहनमंत्री अनिल परब यांनी नारायण राणेंच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकला, असा आरोप महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी केलाय.

अनिल परब यांच्यावर आरोप करताना भाजप नेत्यांनी टीव्ही-9 वृत्तवाहिनीच्या एका क्लिपचा आधार घेतलाय.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी या कथित क्लिपबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही, तर शिवसेना नेत्यांनी याबाबत अनिल परब यांनाच प्रतिक्रिया विचारा असं म्हणत बोलणं टाळलं.

दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, "अनिल परब यांची क्लिप घेऊन आम्ही कोर्टात जाणार आहोत," अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय.

नारायण राणेंना उद्धव ठाकरे सरकारने राजकीय सूडबुद्धीने अटक केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता.

अनिल परब यांच्या आदेशांनी राणेंना अटक?

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाडमधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानानंतर रायगड पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली.

पण राणेंना अटक करण्याचे आदेश कोणी दिले? मुख्यमंत्र्यांनी स्वत: राणेंच्या अटकेचे आदेश दिले का? अशी चर्चा सुरू असतानाच परिवहनमंत्री अनिल परब यांची एक क्लिप व्हायरल झाली.

टीव्ही-9 मराठी वृत्तवाहिनीच्या या क्लिपमध्ये शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब फोनवरून कोणाशीतरी चर्चा करत असल्याचं दिसून येतंय. पण अनिल परब कोणाशी चर्चा करतात याबाबत ठोस माहिती नाही.

शिवसेना

फोटो स्रोत, facebook

या क्लिपमध्ये अनिल परब फोनवरून समोरच्या व्यक्तीला "तुम्ही घेताय का नाही ताब्यात? ऑर्डर कसली मागतायत ते? हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने त्यांचा जामीन नाकारलाय. मग थोडा पोलीस फोर्स वापरून करा," असं सांगताना ऐकू येत आहेत.

बीबीसी मराठीने माध्यमांवर व्हायरल झालेल्या या क्लिपची सत्यता पडताळून पाहिलेली नाही.

या कथित क्लिपमध्ये "मी रत्नागिरीत आहे. मी आत्ता विचारून घेतो सीएम साहेबांना," असंही परब म्हणाल्याचं ऐकू येतं.

फोनवरील हे संभाषण सुरू असताना अनिल परब यांनी मास्क घेतल्यामुळे ते काय म्हणतात हे स्पष्ट समजून येत नाहीये.

"कोणाला सांगू ब्रिफ करायला. मी डीजींना सांगतो," असंही परब समोरच्या व्यक्तीला सांगत असल्याचं ऐकू आलंय.

'राणेंच्या अटकेसाठी अनिल परब यांचा दबाव'

दरम्यान, महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी या क्लिपबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कोण आहेत अनिल परब?

फोटो स्रोत, Getty Images

अनिल परब यांची व्हायरल झालेली क्लिप घेऊन भाजप कोर्टात जाणार आहे.

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, "अनिल परब यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. याचिकेचं ड्राफ्टिंग पूर्ण झालंय. त्यांची व्हायरल क्लिप सर्वांनी पाहिली आहे."

ते पुढे म्हणाले, "पोलिसांच्या आणि गुंडांच्या बळावर हे सरकार चाललंय."

हे कायदा हातात घेण्याचं काम सुरू आहे. अरेरावी आणि दादागिरी सुरू आहे, असा आरोप भाजप नेत्यांनी केला.

शिवसेनेची प्रतिक्रिया काय?

अनिल परब यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपबाबत शिवसेना नेते प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत.

शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणाल्या, "याबाबत सध्या कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नाही. काल एका मंत्र्याची क्लिप आहे अशी चर्चा ऐकली होती. पण ती क्लिप पाहिलेली नाही."

राणेंच्या अटकेचा घोळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य केल्यानंतर नारायण राणेंविरोधात महाड, नाशिक आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

नाशिक पोलिसांची एक टीम राणेंना ताब्यात घेण्यासाठी मंगळवारी (24 ऑगस्ट) सकाळीच कोकणाकडे निघाली होती.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी रत्नागिरी पोलिसांना राणेंना ताब्यात घेण्याबाबत सांगण्यात आल्याची माहिती दिली.

दुपारच्या सुमारास, रत्नागिरी पोलिसांची टीम संगमेश्वरला पोहोचली. नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा संगमेश्वरमध्ये होती.

रत्नागिरी पोलिसांनी राणेंना ताब्यात घेऊन संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आणलं. संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये राणेंना दोन तास ठेवण्यात आलं. पण, पोलिसांनी त्यांना अटक दाखवली नाही.

"नारायण राणेंना अटक करण्यात आलेल्या पोलिसांकडे वॉरंट नाही," अशी माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.

ते पुढे म्हणाले, "आम्हाला वॉरंट दाखवा. राणे पोलिसांच्या गाडीत बसून अटक व्हायला तयार आहेत."

"पण पोलिस सांगत होते की, आम्हाला दोन मिनिटात अटक करायला सांगितली आहे," असा जठार यांनी आरोप केला होता.

राणेंच्या अटकेचा घोळ सुरू असतानाच रायगड पोलिसांची टीम संगमेश्वरमध्ये पोहोचली. महाडच्या प्रकरणी राणेंना अटक करून, त्यांना महाडला नेण्यात आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)