You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणेंच्या भेटीनंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. नारायण राणेंच्या भेटीनंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल (गुरुवार, 19 ऑगस्ट) मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं. मात्र, राणे निघून गेल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी स्मृतिस्थळाचं गोमूत्र आणि दुधानं शुद्धीकरण केल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकारामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पक्षाने या गोष्टीचा निषेध केला आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांनी आपण गुरुवारी बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर जाणार आहे, असं जाहीर केल्यानंतर सुरुवातीला शिवसेनेकडून विरोध झाला होता.
राणे यांना ठाकरे स्मृतिस्थळावर जाण्यापासून रोखणार अशी भूमिका शिवसेनेच्या काही नेत्यांनी घेतली होती. पण नंतर आपली काहीही हरकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पण राणे येऊन गेल्यानंतर या ठिकाणी वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. स्मृतिस्थळाचे केअरटेकर आप्पा पाटील यांनी तिथं दुग्धाभिषेक, गोमूत्राने शिंपडून आपण शुद्धीकरण करत असल्याचं म्हटलं. आप्पा पाटील यांच्यासोबत काही शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते त्यावेळी हजर होते.
"आज ही वास्तू अपवित्र झाली. तिथे दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलं. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केला, असं पाटील म्हणाले.
भाजपने याचा निषेध केला असून कोत्या मनाने शुद्धीकरण होत नसतं, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.
तर ही शिवसेनेची नौटंकी असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
2. आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपला विस्ताराची संधी
"भाजपच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्याने त्यांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे. तर, दुसरीकडे भाजपला राज्यभर मोकळा श्वास घेत काम करून पक्ष विस्तार करण्याची संधी आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच स्वबळावर सत्तेत येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना नेत्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी गुरुवारी (19 ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
राज्यात तीन पक्षांचं आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपकडे पक्षविस्ताराची सुवर्णसंधी चालून आली आहे.
युतीत असताना भाजपला अशी संधी मिळत नव्हती. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोकळ्या श्वासाने काम करू आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्तेत आणू, असं फडणवीस म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली.
3. सोनिया गांधींनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक, उद्धव ठाकरेही सहभागी होणार
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आणि संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित केली आहे.
ही बैठक शुक्रवारी (20 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजता होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक ऑनलाईन स्वरुपातच घेण्यात येणार आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच त्यांच्यासह 4 राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ही बातमी झी 24 तासने दिली.
4. राज्यातील शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय येत्या 4 दिवसांत - राजेश टोपे
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय येत्या 4 ते 5 दिवसांत होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
शालेय शिक्षण विभाग आणि उच्च, तंत्र शिक्षण विभागांचा अहवाल टास्क फोर्सला प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भात एक बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
"कॉलेज आणि शाळांच्या बाबतीत दोन्ही विभागांनीच त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे.
उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या दोघांशी माझी चर्चा झाली. टास्क फोर्सचं म्हणणं महत्त्वाचं आहे, अशी दोघांचीही भूमिका आहे.
येत्या चार-पाच दिवसात टास्क फोर्सचे अहवाल येतील. संबंधित विभाग चर्चा करतील आणि निर्णय घेतील," असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
राज्य सरकारनं शाळा सुरु करण्यासंदर्भात यापूर्वीच निर्णय घेतला होता. पण मुलांचं लसीकरण न झाल्यानं टास्क फोर्सच्या विरोधानंतर हा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात आला.
त्यामुळे आता काय निर्णय होतो, याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागून आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. पुण्याचं येरवडा कारागृह तुडुंब भरलं, क्षमतेपेक्षा अडीचपट जास्त कैदी
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह सध्या तुडुंब भरल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी सध्या क्षमतेपेक्षा अडीच पट जास्त कैद्यांना ठेवण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कैद्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यातल्या जवळपास सर्व कारागृहांमध्ये कैद्यांना ठेवण्यासाठी जागा नसल्याचं समोर आलंय.
विशेष म्हणजे कोरोनाच्या कारणामुळे कित्येक कैदी पॅरोलवर बाहेर आहेत. तरीही कारागृहांमध्ये जागा अपुरी पडत आहे.
येरवडा कारागृहाची क्षमता 2 हजार 449 कैद्यांची आहे. पण याठिकाणी 5 हजार 782 कैद्यांना ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रशासनासमोरील अडचणी वाढल्याचं दिसून येतं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)