You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नीरज चोपडा : अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक मिळण्यास 100 वर्षं का लागली?
- Author, प्रदीप कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी.
नीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती.
नीरज चोपडाने भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ऑलिम्पिक खेळांमध्ये अॅथलेटिक्स प्रकारात पदक आणणारा नीरज भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांचा इतिहास 125 वर्षांचा आहे. या सव्वाशे वर्षांमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला ट्रॅक अँड फिल्ड स्वरुपातील स्पर्धेत मेडल जिंकता आलं नव्हतं.
भारताने 1920 साली झालेल्या अँटवर्प ऑलिम्पिक स्पर्धेपासून आपल्या खेळाडूंना पाठवणं सुरू केलं.
त्यामुळे नीरजने भारताचा शंभर वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला असं म्हणायला हरकत नाही.
नीरजने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवलेल्या यशाबाबत बोलताना भारतीय अॅथलेटिक्स संघाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष कुमार सांगतात, "नीरजने मिळवलेलं यश ऐतिहासिक आहे. त्यांच्या यशात त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक यांचं मोठं योगदान आहे. पण त्यासोबतच अॅथलेटिक्स फेडरेशनही त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवत होता."
मनीषकुमार सध्या अॅथलेटिक्स फेडरेशनमध्ये कार्यरत नाहीत. पण ते सांगतात, "ललित भनोत यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षांपूर्वी फेडरेशनने भालाफेक खेळप्रकारात नवे खेळाडू तयार करण्याची मोहीम सुरू केली होती. त्याचा परिणाम आता आपल्या समोर आहे."
नीरजने स्वतःला असं घडवलं
मनीष कुमार यांनी नीरज चोप्राच्या प्रवासाबाबत माहिती दिली.
ते सांगतात, "2016 साली नीरज ज्युनियर गटातून चॅम्पियन बनला होता. त्यावेळी फेडरेशनने गॅरी कालवर्ट यांना संघाच्या प्रशिक्षपदी नियुक्त केलं. कालवर्ट यांनी फक्त दोन वर्षांत नीरजला असं काही घडवलं की, त्याला प्रत्येक आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यशाची चव चाखायला मिळाली. त्यांनी नीरजला एक परिपूर्ण भालाफेकपटू बनवलं."
नंतर कालवर्ट यांनी एप्रिल 2018 मध्ये आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होती. त्यानंतर काही दिवसांतच म्हणजे जुलै महिन्यात त्यांचं निधन झालं. मात्र नीरजने त्यांच्याकडून घेतलेल्या कानमंत्रानुसार सराव केला. त्याच बळावर त्याने स्वतःला घडवलं."
नीरज चोपडाचे काका भीम चोपडा सांगतात, "नीरजने इतकी वर्षे घेतलेल्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं आहे. तो आपल्या कुटुंबाला विसरून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सराव करत होता. अखेर त्याने यश मिळवून दाखवलं. आतापर्यंत कुणीही करू शकलं नाही, अशी कामगिरी नीरजने केली आहे. संपूर्ण देशाला त्याच्यावर गर्व आहे."
नीरज चोपडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य सांगताना मनीष कुमार म्हणाले, "भालाफेक खेळादरम्यान खेळाडूंच्या खांद्याला दुखापत होते. पण नीरजने बिकट परिस्थितीतही स्वतःला फिट ठेवलं. हेच त्याच्या यशाचं गमक आहे."
नीरजच्याही आधी भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासात दोनवेळा भारतीय खेळाडू पदक मिळवण्याच्या जवळ पोहोचले होते. पण एका सेकंदाच्या शंभराव्या भागापेक्षाही कमी फरकाने त्यांना पदकाने हुलकावणी दिली होती.
सुरुवातीपासून नीरज अव्वल स्थानी
नीरज ऑलिम्पिक स्पर्धेत सुरुवातीपासूनच अव्वल स्थानी राहिला. स्पर्धेचा समारोपही त्याने पहिल्या क्रमांकावरच केला.
ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज पहिल्यांदाच सहभागी झाला होता. पण नवोदित असल्याचं दडपण त्याच्यावर दिसून आलं नाही. आपल्या नावे सुवर्णपदकाची नोंद करून त्याने इतिहास घडवला आहे.
आपल्या या यशामुळे अनेक खेळाडूंचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, याची कल्पना नीरजला आधीपासूनच होती. त्यामुळेच आपलं पदक त्याने किरकोळ फरकाने पदक हुकलेल्या खेळाडूंना समर्पित केलं आहे.
नीरज चोप्राने आपलं पदक भारताच्या दिग्गज खेळाडूंना समर्पित केलं.
भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचा मुलगा जीव मिल्खा सिंह याने ट्वीट करून म्हटलं, "माझ्या वडिलांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती, ती पूर्ण झाली आहे."
भारतात जन्मलेल्या ब्रिटिश खेळाडूने पटकावले होते दोन रौप्य पदक
खरं तर ऑलिम्पिक समितीच्या नोंदवहीत डोकावलं तर नीरज चोपडापूर्वी भारताला फिल्ड अँड ट्रॅक इव्हेंटमध्ये ऑलिम्पिक पदक मिळाल्याचं दिसून येतं. हे पदक 1900 साली झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नॉर्मन प्रिचर्डने मिळवलं होतं.
नॉर्मन प्रिचर्ड हे भारतात जन्मलेले ब्रिटिश होते. पण त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत पाच स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. त्यामध्ये 200 मीटर धावणे आणि 200 मीटर अडथळ्यांची शर्यत या खेळप्रकारात त्यांना रौप्यपदक मिळालं.
ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर प्रिचर्ड दोन वर्ष भारतीय फुटबॉल संघाचे सरचिटणीस होते. त्यानंतर 1905 साली ते ब्रिटनला निघून गेले. तिथंही ते जास्त काळ टिकले नाहीत. नंतर अमेरिकेला जाऊन त्यांनी अभिनयात हात आजमावला. नॉर्मन प्रिचर्ड हे हॉलिवूड चित्रपटात काम करणारे पहिले ऑलिम्पिक खेळाडू ठरले.
जागतिक अॅथलेटिक्स फेडरेशनच्या आकडेवारीनुसार, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत प्रिचर्ड यांनी ग्रेट ब्रिटनकडून सहभाग नोंदवला होता. शिवाय ते भारतीय नव्हते. त्यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघाची सुरुवात 1920 साली झाली, असं मानलं जातं.
या 100 वर्षांत फक्त दोनवेळा भारत ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात पदकाजवळ पोहोचला.
मिल्खा सिंग यांचं पदक हुकलं
1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारत पदक जिंकण्याच्या अत्यंत जवळ पोहोचला होता. त्यावेळी फ्लाईंग सीख नावाने ओळखले जाणारे मिल्खा सिंग हे पदक जिंकण्याची शक्यता होती. 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांना पदकाचं दावेदार मानलं जात होतं. पण सेकंदाच्या दहाव्या भागापेक्षा कमी फरकाने त्यांचं पदक हुकलं.
मिल्खा सिंग यांनी तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला पण पदक जिंकण्याच्या जवळ ते रोम ऑलिम्पिकमध्येच पोहोचले होते.
या स्पर्धेत मिल्खा सिंग यांनी जिवाची बाजी लावली. शेवटच्या फेरीत पहिले 200 मीटर ते पुढे होते. पण 250 मीटरनंतर त्यांनी स्वतःचा वेग थोडा कमी केला. त्याचा फोयदा प्रतिस्पर्धी धावपटूने घेतला.
या गोष्टीचं शल्य त्यांना आयुष्यभर होतं. भारताच्या प्रसिद्ध ऑलिम्पिक खेळाडूंच्या कारकिर्दीवर आधारित 'माय ऑलिम्पिक जर्नी' या पुस्तकात मिल्खा सिंग लिहितात, "मी मागे वळून पाहतो, तेव्हा वाटतं की मी सुवर्णपदक हरलो आहे."
या स्पर्धेत अमेरिकेच्या ओटीस डेव्हीस यांनी सुवर्णपदक जिंकलं होतं. जर्मनीच्या कार्ल कॉफमन यांनी रौप्यपदकावर शिक्कामोर्तब केलं. या दोन्ही खेळाडूंनी जागतिक विक्रमाची नोंद केली होती. मिल्खा सिंग दक्षिण आफ्रिकेच्या माल्कम स्पेंसविरुद्ध फोटो फिनिशमध्ये मागे पडले. त्यांनी 45.6 सेकंदांची वेळ घेतली होती. हा पराक्रम 44 वर्ष नॅशनल रेकॉर्ड म्हणून कायम राहिला.
पी. टी. उषाने किरकोळ फरकाने पदक गमावलं
1984 च्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिक स्पर्धेत पी. टी. उषा यांचंही पदक थोडक्यात हुकलं होतं.
यापूर्वी 1964 मध्ये गुरुबचन सिंह रंधावा 110 मीटर हर्डलमध्ये अंतिम फेरीत पोहोचून पाचव्या स्थानावर राहिले होते.
पण, यानंतर भारतीय खेळाडूंची कामगिरी म्हणावी तितकी प्रभावी राहिली नाही.
1976 साली श्रीराम सिंह मिडल डिस्टन्स रनर म्हणून मॉन्ट्रियल ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले होते. पण त्यांनी 800 मीटर शर्यतीत अंतिम फेरीत घेतलेली वेळ 1994 पर्यंत आशियाई विक्रम म्हणून अबाधित होती. पण श्रीराम सिंह त्या शर्यतीत सातव्या स्थानी राहिले होते.
1984 साली लॉस एंजिलिस ऑलिम्पिक स्पर्धेत 'भारताची उडनपरी' म्हणून ओळखली जाणारी पी. टी. उषा 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सहभागी झाली होती. 400 मीटर हर्डल स्पर्धेत त्यांनी फक्त एका वर्षापासून सराव सुरू केला होता. पण तरीही त्या इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या होत्या.
पी. टी. उषा यांनी पाचव्या लेनमधून शर्यत सुरू केली. त्यांना पदक मिळणार असं वाटतच होतं. पण ऑस्ट्रेलियाच्या डेबी फ्लिंटॉफ यांनी आधी टेक ऑफ केल्यामुळे ही शर्यत पुन्हा आयोजित करण्यात आली. त्यामुळे उषा यांचं लक्ष विचलित झालं.
पहिला अडथळा पूर्ण करायला त्यांना 6.9 सेकंद लागले. साधारणपणे त्या हे अंतर 6.2 सेकंदात पूर्ण करायच्या. तरीही धीर खचू न देता पी. टी. उषा पुढे निघाल्या. पण अखेरीस फोटो फिनिश करता-करता काही सेकंदाच्या अंतरांनी त्यांचं पदक हुकलं.
याचं शल्य पी. टी. उषा यांना अनेक वर्षे बोचत राहिलं. याची जाणीव त्यांनी नीरज चोपडाच्या अभिनंदनासाठी केलेलं ट्वीट पाहून निश्चितपणे होते.
नीरजने स्वप्न पूर्ण केलं
पी. टी. उषा आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, "तू माझं 37 वर्षांपासून अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं, खूप खूप धन्यवाद माझ्या मुला."
अंजू बॉबी जॉर्ज यांनीही 2004 साली ऑलिम्पिक पदकाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यांनी लाँग जंप स्पर्धेत 6.83 मीटर उडी मारून नॅशनल रेकॉर्ड जरूर बनवला. पण ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी ही कामगिरी पुरेशी ठरली नाही. त्या पाचव्या स्थानी राहिल्या.
पण, या खेळाडूंच्या संघर्षाने नीरज चोपडासाठी एक व्यासपीठ तयार केलं. याच माध्यमातून 100 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताला सुवर्णपदक मिळालं आहे.
नीरज सुवर्णपदक पटकावणारा भारताचा फक्त दुसरा खेळाडू आहे. यावरूनच त्याच्या पदकाचं महत्त्व अधोरेखित होतं.
नीरजपूर्वी अभिनव बिंद्राने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. या दोन्ही पदकांव्यतिरिक्त भारतीय हॉकी संघाकडे 8 सुवर्णपदक आहेत. एकूण 10 सुवर्णपदकांसह भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत 9 रौप्य पदक, 16 कांस्यपदक पटकावले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)