Tokyo Olympic : पी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव

पी. व्ही. सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये चायनीज तैपेईच्या ताई जू यिंग हिने भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभूत केलं.

18-21, 12-21 अशा फरकानं जू यिंगने सिंधूला पराभूत केलं.

सिंधू फायनलमध्ये जाणार नसली, तर पदकाच्या आशा अजून संपलेल्या नाहीत. उद्या (1 ऑगस्ट) होणाऱ्या मॅचमध्ये सिंधूला कांस्य पदकासाठी लढत द्यावी लागेल.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दरम्यान, ताई जू यिंग सध्या जगातली क्रमांक एकची खेळाडू आहे. तिच्या नावावर आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक, तीनदा ऑल इंग्लंड किताब आणि पाचदा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची वर्ल्ड सुपर सीरिज जिंकल्याचा विक्रम आहे.

सिंधूनं आतापर्यंत तिच्याबरोबर 19 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 5 वेळा तिला विजय मिळवता आला.

उपांत्य फेरीत प्रवेश

पी. व्ही. सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. सिंधूनं दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवला होता. यासोबतच तिनं अंतिम चारमध्ये स्थान पक्कं केलं होतं.

रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं रौप्य पदकाची कमाई केली होती. अंतिम सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला होता.

तसं पहायला गेलं तर पी. व्ही. सिंधूच्या नावावर आधीपासूनच अनेक रेकॉर्ड्स आहेत. आता बॅडमिंटनमध्ये दोनदा ऑलिम्पिक मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरू शकते. यापूर्वी कोणत्याही महिला वा पुरुष भारतीय बॅडमिंटनपटूने असा विक्रम केलेला नाही.

"गेल्यावेळी मी जेव्हा रिओ ऑलिम्पिकला गेले होते, तेव्हा सगळ्यांना वाटलं - ठीक हे सिंधू गेलीय. पण यावेळी टोकियोला जाण्याआधीपासूनच लोकांना माझ्याकडून मेडलची अपेक्षा आहे. खूप अपेक्षा आहेत माझयाकडून पण हा दबाव बाजूला सारत मला खेळावर लक्ष केंद्रित करून मेडल जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे," टोकियोला जाण्यापूर्वी सिंधूने सांगितलं होतं. 

रिओ ऑलिम्पिक आणि टोकियो ऑलिम्पिकच्या दरम्यान 5 वर्षांचा काळ गेलाय आणि दरम्यानच्या काळात सिंधू आणि कोच गोपीचंद यांची यशस्वी जोडीही फुटली आहे. 

5 जुलै 1995ला हैदराबादमध्ये जन्मलेल्या जवळपास 6 फूट उंच सिंधूच्या यशाची कहाणी ही एखाद्या खेळाडूच्या सातत्य, चिकाटी, मेहनत, एकाग्रता आणि खेळावरच्या प्राविण्याची कहाणी आहे. 

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

रँकिंग

हैदराबादमध्ये तिला तासन् तास कोर्टवर खेळताना पाहिलेलं आहे. कोर्टवर चार तास प्रॅक्टिस करताना सिंधूचं लक्ष एकदाही विचलित झालं नाही. फक्त आणि फक्त प्रॅक्टिस.

वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सिंधुची कहाणी हे एका यशस्वी खेळाडूचे आदर्श उदाहरण आहे. पण हे यश रातोरात मिळालेलं नाही. 

8 वर्षांची असताना सिंधूने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. आईवडील व्हॉलीबॉल खेळाडू असल्याने घरात खेळाचं वातावरण होतंय. 

सिंधूचे वडील रेल्वे ग्राऊंडवर व्हॉलीबॉल खेळायला जात तेव्हा सिंधू शेजारच्याच बॅडमिंटन कोर्टवर खेळत राही. तिथूनच तिच्या या प्रवासाला सुरुवात झाली. तिचे पहिले कोच होते महबूब अली. 10 वर्षांची असताना सिंधू गोपीचंद अॅकॅडमीमध्ये आली आणि पहिल्या ऑलिम्पिकपर्यंतचा तिचा प्रवास गोपीचंद यांच्या सोबतीनेच झाला. 

पी. व्ही. सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

पी. व्ही. सिंधूला चाईल्ड प्रॉडिजी म्हटलं जातं. 2009मध्ये ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या या मुलीने नंतर मागे वळून पाहिलं नाही. 18 वर्षांची असताना सिंधूने वर्ल्ड चॅम्पियनशिपचं कांस्य पदक जिंकलेलं होतं आणि असं करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू होती. आतापर्यंत तिने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. पण रिओ ऑलिम्पिकमधलं पदक तिच्यासाठी सर्वात जवळचं आहे. 

ती म्हणते, "रिओ ऑलिम्पिक माझ्यासाठी नेहमीच खास राहणार आहे. ऑलिम्पिकपूर्वी मला दुखापत झाली होती. सहा महिने कोर्टच्या बाहेर होते. काय करावं, कळत नव्हतं. मात्र, माझे प्रशिक्षक आणि पालकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्या मनात फक्त एकच विचार होता की ही माझी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा आहे आणि मला माझा सर्वोत्तम खेळ करायचा आहे. मग एकापाठोपाठ एक सामने जिंकत गेले."

"फायनलमध्येही मी 100 टक्के दिलं. मात्र, तो दिवस कुणाचाही असू शकला असता. मी सिल्वर मेडल जिंकलं. मात्र, तेही कमी नाही. मी भारतात परतले तेव्हा गल्ली-बोळात माझं स्वागत करण्यात आलं. विचार करून आजही अंगावर रोमांच उभा राहतो."

कायमच पॉझिटिव्ह राहणाऱ्या सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपैकी सिंधू एक आहे.

पी. व्ही. सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

रिओमध्ये फायनलला जाऊन हरल्याचं दुःख अजूनही आहे का विचारल्यावर ती सांगते, "मी हरले तेव्हा वाईट वाटलं होतं. पण तुम्हाला नेहमीच दुसरी संधी मिळते. मी ज्या मेडलचा विचारही केला नव्हता ते मिळवल्याचा मला आनंद होता."

पण हे करणं सोपं नव्हतं. गोपीचंद यांच्याकडून सिंधूने प्रशिक्षण घेतलं तेव्हा 21 वर्षांच्या सिंधूचा फोन तिच्याकडून अनेक महिन्यांसाठी काढून घेण्यात आला होता. अगदी आईस्क्रीम खाण्यासारख्या लहान लहान आनंदांपासूनही तिला दूर रहावं लागलं. ऑलिंपिक मेडल जिंकल्यानंतर आईस्क्रीम खाणाऱ्या सिंधूचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

सिंधू भारतातील सर्वाधिक यशस्वी महिला खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, सोबतच सर्वांत जास्त कमावणाऱ्या महिला खेळांडूंपैकीही ती एक आहे.

फोर्ब्सच्या यादीत समावेश

फोर्ब्सने 2018 साली सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये सिंधुच्या नावाचा समावेश केला होता. सिंधू आज स्वतः एक ब्रँड आहे आणि अनेक ब्रँड्सचा चेहराही आहे.

2018 साली कोर्टवर खेळून तिने 5 लाख डॉलर कमावले होते. तर जाहिरातींमधून तिला 80 लाख डॉलर्स मिळाले. म्हणजेच दर आठवड्याला कमीत कमी 1 लाख 63 हजार डॉलर्स. ही रक्कम अनेक क्रिकेट खेळाडूंच्या कमाईपेक्षाही जास्त आहे.

सिंधू एक यशस्वी खेळाडू तर आहेच. पण एक व्यक्ती म्हणूनही तिला तिच्या पात्रतेवर पूर्ण विश्वास आहे. तिच्या खांद्यावर असलेल्या अपेक्षांच्या ओझ्याची तिला पूर्ण कल्पना आहे. मात्र, असं असूनदेखील ती तिच्या खेळाचा पूर्ण आनंद उपभोगते.

पी. व्ही. सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

सरावाचं शेड्यूल, जगभरात खेळण्यासाठी जाणं-येणं, बिजनेस, जाहिराती.... एका 24 वर्षांच्या मुलीसाठी हे ओझं तर नाही?

मात्र, गेमप्रमाणेच तिच्या विचारातही स्पष्टता आहे. ती म्हणते, "मी हे सगळं खूप एन्जॉय करते. लोकं विचारतात की तुझं पर्सनल लाईफ तर उरतच नसेल. पण माझ्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. मी याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. कारण तुम्ही कायमच लाईमलाईटमध्ये असाल, असं गरजेचं नाही. मी आयुष्यात काही मिस करतेय, असं मला कधीच वाटलं नाही. बॅडमिंटन माझी पॅशन आहे."

तर अशा आनंद आणि उत्साहाने ओतप्रोत सिंधुच्या यशाचा मंत्र काय? ती सांगते, "काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवा. हीच माझी ताकद आहे. कारण तुम्ही इतर कुणासाठी नाही तर स्वतःसाठी खेळत असता. स्वतःला सांगा की मी काहीही करू शकतो."

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा...

Please wait...

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)