You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे यांना धक्का, मनसेच्या शॅडो कॅबिनेटमधील नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. राज ठाकरेंना मोठा धक्का, 'या' नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत आदित्य शिरोडकर यांनी शिवबंधन हाती बांधलं. मनसेला यामुळे मोठा धक्का बसला आहे.
भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना आणि मनविसे असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये त्यांच्याकडे उच्च शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता संघटनात्मक बांधणीला सुरुवात केल्याचे दिसते.
तसंच मनसेने मतदारसंघनिहाय पथक तयार केलं आहे. मनसे नेता आणि सरचिटणीस असा समावेश त्यात करण्यात आला होता.
2. बोर्डाची वेबसाईट 'या' कारणामुळे क्रॅश झाली असावी - अजित पवार
राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल शुक्रवारी (16 जुलै) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार होता. परंतु बोर्डाची वेबसाईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना तब्बल सात तास निकालाची वाट पहावी लागली.
विद्यार्थ्यांचा निकाल विक्रमी लागल्यानेच वेबसाईट क्रॅश झाली, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
यंदा परीक्षा न झाल्याने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल जास्त असल्याने त्यांच्यात उत्सुकता होती. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी एकाच वेळी वेबसाईटला भेट दिल्याने लोड येऊ शकतो, असंही ते म्हणाले. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला. 83,262 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर 957 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत. 9 विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के लागला आहे.
3. राज्यपाल नियुक्त आमदारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा
राज्यातील 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय आता मुंबई उच्च न्यायालयात आहे. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारला विचारणा केली असून 19 जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल कार्यालयाकडे आमदारांची यादी मागितली होती. पण, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यादी देऊ शकत नाही असं उत्तर देण्यात आल्याचं गलगली सांगतात. यादी राज्यपालांकडे सुरक्षित असून निकाल आल्यानंतर राज्यपाल त्यावर निर्णय घेतील असंही सांगण्यात आल्याचं अनिल गलगली यांनी सांगितलं.
महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्याकडे काही महिन्यांपूर्वीच राज्यपाल नियुक्तीसाठी संभाव्य नावांची यादी पाठवली आहे. पण, अद्याप राज्यपालांकडून त्यांची नियुक्ती करण्यात न आल्याने पुन्हा एकदा ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल कार्यालय असा संघर्ष पहायला मिळतो आहे. आता केंद्र सरकार याप्रकरणी न्यायालयात काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
4. तीन कंपन्यांमध्ये 1 लाख फ्रेशर्सची भरती होणार
कोरोना आरोग्य संकटात लॉकडाऊन दरम्यान उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. पण चालू वित्तीय वर्षांत तीन बड्या कंपन्यांनी रोजगार देण्यासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे.
विप्रो, इन्फोसिस, टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस या टेक कंपन्यांनी वर्षभरात 1 लाख फ्रेशर्स भरती करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे.
टिसीएसने पहिल्या तिमाहीत 20 हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भर घातली, तर इन्फोसिसने 8,300 आणि विप्रोने 12,000 नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.
चालू वर्षात महाविद्यालयातून 40 हजार फ्रेशर्स भरती करू ,असं टिसीएसने म्हटलं आहे. तर जागतिक स्तरावर 35 हजार महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करण्याची इन्फोसिसची योजना आहे.
5. कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील 100 दिवस महत्त्वाचे - केंद्र सरकार
जागतिक आरोग्य संघटनेने जगात तिसरी लाट आल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतासाठीही पुढील 100 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत असं सांगत केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
देशभरातील विविध राज्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचा वेग मंदावला आहे. ही धोक्याची घंटा असून पुढील 100 दिवस महत्त्वाचे असल्याचं निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "कोरोना विषाणू अजूनही आहे. काही जिल्हे, राज्यांमध्ये त्याचा प्रभाव अधिक आहे. आपल्याला आता सावध झालं पाहिजे. रुग्णसंख्या कमी होण्याचा वेग मंदावला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी भविष्यात बिघडण्याची शक्यता आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)