पंकजा मुंडे दिल्लीकडे रवाना, राजकीय चर्चांना उधाण

फोटो स्रोत, @PankajaGopinathMunde
भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. त्या मुंबईहून निघाल्या आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पक्षाच्या राष्ट्रीय सचिवांची आज (11 जुलै) दुपारी 3 वाजता बैठक घेणार आहेत.
भाजप पक्ष कार्यालयात ही बैठक होणार असून पंकजा मुंडे या बैठकीसाठी हजर राहणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मोदी सरकारने नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यात राज्यातील चार भाजप खासदारांना स्थान मिळालं. पण, प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने परळीसह बीड जिल्ह्यातील मुंडे भगिनींच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यातून पंकजा यांच्या समर्थकांपैकी आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यातच आता पंकजा मुंडे दिल्लीत येत असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, "प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही. पंकजा आणि प्रीतम यांनी मंत्रिपदाची कधीच मागणी केली नव्हती," असं पंकजा मुंडे यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं.
पण आता पंकजा यांच्या समर्थकांच्या राजीनामा सत्रानंतर पंकजा मुंडे दिल्लीला येत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं मी नाराज नाहीये'
डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी नियुक्ती हा पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेनं मुखपत्र सामनामध्ये केला होता.
यावर स्पष्टीकरण देताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, "प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं मी नाराज नाहीये. भाजप मला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं मला वाटत नाही. सामनात काय लिहिलंय ते मी वाचलं नाही. पंतप्रधान मला संपवण्याचा प्रयत्न करतील, इतकी मी मोठी आहे, असं मला वाटत नाही."
"पक्षानं मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे. पंकजा आणि प्रीतम यांनी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही," असंही पंकजा यांनी यावेळी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, PRITAM MUNDE/FACEBOOK
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'कोणी सांगितलं पंकजा मुंडे नाराज आहेत? अफवा पसरवून त्यांना बदनाम करू नका,' अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.
मंत्रिमंडळात विस्तारात स्थान मिळालेले मराठी नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेते नारायण राणे यांची वर्णी लागली आहे. त्यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खाते देण्यात आलं आहे.
भिवंडी मतदारसंघाचे भाजप खासदार कपिल पाटील यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यांना केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री पद मिळालं आहे.
तर दिंडोरी मतदारसंघाच्या भाजप खासदार डॉ. भारती पवार यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पद मिळालं आहे.
याशिवाय भाजप नेते डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतला आहे.
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








