काश्मीर : 'निर्दोष सुटलो हे चांगलंच, पण तुरुंगात घालवलेली 11 वर्षे कोण परत देईल?'

फोटो स्रोत, RIYAZ MASROOR
- Author, रियाज मसरूर
- Role, बीबीसी उर्दू, श्रीनगर
"सुरुवातीला मला एका छोट्या खोलीत ठेवण्यात आलं होतं. माझं शरीर तर तिथं होतं, पण मन घरात होतं. काही वर्षांनी एका रात्री मी स्वप्नात पाहिलं की, लोक माझ्या वडिलांना अंघोळ घालत आहेत. मी घाबरून उठलो. मला वेदना झाल्या. नंतर सर्वकाही सामान्य होतं. मात्र, दोन महिन्यांनी माझ्या वकिलांनी मला सांगितलं की, माझे वडील राहिले नाहीत. जेव्हा मी तारीख विचारली, तर ज्या दिवशी मला स्वप्न पडलं होतं, त्याच्या दोन दिवसांनंतर त्यांचं निधन झालं होतं."
श्रीनगरच्या रैनवारी भागात राहणाऱ्या बशीर अहमद बाबा यांना 2010 साली गुजरातच्या दहशतवादीविरोधी पथकाने अहमदाबादमधून अटक केली होती.
43 वर्षीय बशीर बाबा हे विज्ञान विषयात पदवी मिळवल्यानंतर श्रीनगरमध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्युट चालवत होते.
बशीर अहमद बाबा हे गुजरातस्थित 'माया फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेनं आयोजित केलेल्या एका वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते.
'क्लेफ्ट लिप अँड पॅलेट' नामक आजारानं ग्रस्त असलेल्या मुलांच्या आई-वडिलांना मदत करण्याचं काम ही माया फाऊंडेशन संस्था करते.
दहशतवादी कारवायांची योजना बनवल्याचा आरोप
बशीर अहमद बाबा सांगतात, "मी अनेक गावांमध्ये एनजीओच्या तज्ज्ञ डॉक्टरांसोबत काम केलं होतं. त्यामुळे मला पुढील प्रशिक्षणासाठी गुजरातला बोलावलं गेलं. गुजरातमध्ये मी हॉस्टेलमध्ये थांबलो होतो. त्याचवेळी गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकानं मला आणि इतर कार्यकर्त्यांना अटक केली. इतरांना नंतर सोडून दिलं, मात्र मला गुजरातच्या बडोदा पोलिसांनी तुरुंगात डांबून ठेवलं."
बशीर यांच्यावर स्फोटकं साठवण्याचा आणि भारतात दहशतवादी कारवायांची योजना बनवण्याचा आरोप लावण्यात आला होता.

फोटो स्रोत, RIYAZ MASROOR
मात्र, गेल्या आठवड्यात गुजरातमधीलच एका कोर्टानं बशीर यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आणि त्यांना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला.
'सुटकेनं समाधानी, पण तुरुंगातल्या 11 वर्षांचं काय?'
बशीर मोठ्या कालावधीनंतर घरी परतले आहेत. मात्र, त्यांच्या घरात बऱ्याच गोष्टी बदलल्याचे ते सांगतात.
"मला आता कळलं की, आमच्याकडे थोडीशी जमीन होती, जिथं माझी कॉम्प्युटर इन्स्टिट्युट होती, तीही विकली गेलीय. खरंतर घरची आर्थिक स्थितीच बिकट झाली होती. मी सर्वात मोठा मुलगा होतो आणि तुरुंगात होतो. वडील आणि भावाला माझ्याशी बोलण्यासाठी गुजरातला यावं लागायचं. प्रवास आणि वकील या गोष्टींवर बराच खर्च झाला," असं बशीर सांगतात.
बहिणींचं लग्न आणि त्यांच्या मुलांचे जन्म या बातम्याही बशीर यांच्यापर्यंत पोहोचायला वर्ष उलटत असे. पत्रांद्वारे कळवलं जाई. मात्र, पत्र फार उशिरा बशीर यांच्या हातात पडत असे. कारण एखादं पत्र तुरुंगात आल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर कैद्यापर्यंत पोहोचवलं जाई.

फोटो स्रोत, RIYAZ MASROOR
न्यायालय मला न्याय देईल आणि आरोपांतून मुक्त करेल, असा मला विश्वास होता, असं बशीर सांगतात.
"मी समाधानी आहे की, न्यायालयानं मला निर्दोष मुक्त केलं. मात्र, माझ्या आयुष्यातील 11 वर्षे कोण परत करेल?" असा प्रश्न बशीर विचारतात.
तुरुंगात असतानाच केला अभ्यास
तुरुंगात असताना बशीर केवळ चित्रकला शिकले नाहीत, तर राजकारण, प्रशासन, इंटेलक्चुअल प्रॉपर्टी आणि इतर तीन विषयांवर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. किंबहुना, या परीक्षांमध्ये बशीर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

फोटो स्रोत, RIYAZ MASROOR
"अभ्यासक्रमाची पुस्तकं तुरुंगात पोहोचत असत. त्यामुळे मी अभ्यासात व्यग्र असायचो. कमीत कमी शिक्षण पूर्ण केल्याचा तरी आनंद मला आहे," असं बशीर सांगतात.
बशीर यांना तुरुंगाच्या अधिकाऱ्यांबाबत काहीच तक्रार नाही. किंबहुना, तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या स्वभावाबाबत ते सकारात्मकच आहेत. मात्र, वारंवार ते एकच प्रश्न विचारतात की, माझा वेळ मला कोण परत देईल?
बशीर यांच्या अटकेवेळी तत्कालीन गृहसचिव जी के पिल्लई यांनी या अटकेला म्हटलं होतं की, "दहशतवादी कटांना पराभूत करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची गोष्ट आहे."

फोटो स्रोत, RIYAZ MASROOR
मात्र, बशीर यांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केल्यानंतर जी के पिल्लई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "दहशतवादी कारवायांची योजना बनवणारा कुणी एकटाच नसतो, कधी कधी काही लोक नकळतपणे कुणाची मदत करतात. सुरक्षा यंत्रणा अशा लोकांना दोन भागात विभागतात. कटात थेट सहभागी असलेल्यांना वेगळं ठेवलं जातं आणि नकळतपणे मदत करणाऱ्यांना वेगळं ठेवलं जातं. जेणेकरून नकळपणे मदत करणाऱ्यांना वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडून राहावं लागू नये."
मात्र, पिल्लई यांचं विधान इतक्या उशिरा आलंय की, बशीर बाबाच्या प्रश्नांचं हे उत्तर असू शकत नाही.
'मला विश्वास होता, माझा मुलगा निर्दोष सुटेल'
बशीर यांची आई मुख्ता बीबी सांगतात, "मी तर रडायलाच लागले. माझ्या मुलाची तुरुंगात काय अवस्था झाली होती, हे मी पाहिलं होतं. पण मला खात्री होती की, त्याला निर्दोष सोडतील. मोहल्ल्यातील सर्व मशिदींमध्ये दर शुक्रवारी त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना करत असे."
30 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये सशस्त्र बंडानंतर अशा अनेक काश्मिरी तरुणांना दहशतवादी कारवायांच्या नावाखाली अटक करण्यात आलं होतं आणि दहा-पंधरा वर्षे तुरुंगात ठेवल्यानंतर 'निर्दोष' सोडण्यात आलं.

फोटो स्रोत, RIYAZ MASROOR
असे लोक जेव्हा तुरुंगाबाहेर येतात, तेव्हा बदललेल्या स्थितीत जगणं त्यांना अवघड होऊन जातं. काही असेही कैदी आहेत, ज्यांना तंत्रज्ञान, इंटरनेट आणि परिवहनाच्या नव्या साधनांची तोंडओळख सुद्धा नाही.
बशीर बाबा यांनी मात्र कॉम्प्युटरमध्ये डिप्लोमा केला होता. त्यामुळे इतर कैद्यांप्रमाणे तुरुंगाबाहेर आल्यानंतर ते अगदीच हतबल झाले नाहीत.
"माझा लहान भाऊ नजीर बाबाने खूप कष्ट केलेत. बहिणींची लग्न लावली, वडिलांवरील उपचाराचा खर्च उचलला आणि वडिलांच्या निधनांचं दु:खंही झेललं. न्यायालयात माझ्या खटल्याच्या सुनावण्या, वारंवार गुजरातला येणं आणि त्याचवेळी घरची जबाबदारी या सुद्धा त्यानेच सांभाळल्या. त्यानं अजून लग्न केलं नाहीय. त्यानं मला पत्रात म्हटलं होतं की, तुझ्या सुटकेनंतरच मी लग्न करेन," असं बशीर त्यांच्या लहान भावाबद्दल सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








