संभाजीराजेः मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रिपदावर बसवा #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Facebook
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रिपदावर बसवा- संभाजीराजे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यमंत्रिपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे.
बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तेथे प्रवेश केला.
संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी केली आहे.
त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला.
तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजीराजे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
2. मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो की पतंगबाजी होते-देवेंद्र फडणवीस
हल्ली मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर त्याची पतंगबाजी होते असं वक्तव्य विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ही पतंगबाजी पाहून माझं मनोरंजन झालं असंही ते म्हणाले.
फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Mint
"मी दिल्लीत गेलो होतो. नागपूरचं एक शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. धर्मेंद्र प्रधान यांची भेट घ्यायची होती. त्यांच्या भेटीला उशिर होता म्हणून अमित शहा यांना फोन केला. तर त्यांनी 15 मिनिटं आहेत, भेटायला येऊ शकतो म्हणून सांगितलं. त्यामुळे त्यांची भेट घेतली", असं फडणवीस म्हणाले.
"राज्य सरकारने केवळ दोनच दिवसांचं अधिवेशन ठेवल्याबद्दलही त्यांनी टीका केली. या अधिवेशनात लक्ष्यवेधी असणार नाहीत. तारांकित प्रश्न असणार नाहीत. कोणतंही आयुध वापरता येणार नाही. विधानसभेत आयुधच वापरायचं नाही हा ठराव होत असेल तर विधिमंडळाचं कामकाज फासावर लटकवण्यासारखच आहे. लोकशाहीला पायदळी तुडवण्याचा हा प्रकार आहे", असं ते म्हणाले. .
3. ईडी लावा नाहीतर रणगाडे आणा, सरकार पडणार नाही- संजय राऊत
'सरकार अस्थिर करण्यासाठी ED, CBI आणि इनकम टँक्स चा वापर होताना स्पष्टंपणे दिसतोय. ED आणि CBI चे प्रयत्नं संपले की मग महाराष्ट्रात सैन्य आणा... राज्य सरकार पाडायला. तोफा मारा आमच्यावर..., जेवढे तुम्ही आमच्यावर हल्ले कराल तेवढे आम्ही तीनही पक्ष मजबूत होऊ घट्ट... आणि झालेलो आहोत असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. 'न्यूज 18 लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

फोटो स्रोत, Getty Images
राज्यपालांना जेव्हढी कळकळ विधानसभा अध्यक्षपदासाठी आहे तेवढी कळकळ विधान परिषदेच्या 12 जागांसाठी असती तर आम्हाला आनंद झाला असता. पण तसं दिसत नाही असंही ते म्हणाले.
4. मी गायब होणारा नेता नाही- प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर हा गायब होणार नेता किंवा कार्यकर्ता नाही, अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँक घोटाळ्यासंदर्भात विरोधकांकडून दरेकर यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. 'लोकमत'ने याबाबत बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, TWITTER/@IPRAVINDAREKAR
या पत्रकार परिषेदला मुंबै बँकेचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते. "एक वर्तमानपत्र आणि एकाच वृत्तवाहिनीवरुन मुंबै बॅंकेबद्दल वारंवार बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र, कोण काय लिहतंय किंवा बातम्या दाखवतंय यापेक्षा बँकेचे सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे आज खरी बाजू मांडण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतली आहे", असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
"लोकमतने यासंदर्भात बातमी दिली आहे. मुळात मुंबै बँकेत 123 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बातमी कुठून आली ते कळू द्या. फक्त राजकीय सुडपोटी माझ्यावर आरोप केले जात आहेत. प्रकाश सोळंकी यांनी जाणीवपूर्वक चौकशी लावून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकाश सुर्वेही राजकीय सुडापोटी आरोप करून काही हाती लागतंय का, हे बघत आहेत. पण यामधून काहीच साध्य झाले नाही", असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. जी चौकशी होईल त्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
5. दिनो मोरिया, अहमद पटेल यांचे जावई, संजय खान, डीजे अकील यांच्यावर ईडीची कारवाई
गुजरातच्या संदेसरा ग्रुपमधील मनीलाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मोठी कारवाई केली. आठ स्थावर मालमत्ता, तीन गाड्या, अनेक बँक खाती, शेअर्स, म्युच्युअल फंड अशा 8.79 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने जप्ती आणली. 'आपलं महानगर'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
जप्त करण्यात आलेली मालमत्ता संजय खान (3 कोटी रुपये), दिनो मोरिया (1.40 कोटी रुपये), अकिल अब्दुलखलिल बच्चूअली (1.98 कोटी रुपये) आणि इरफान अहमद सिद्दीकी (2.41 कोटी रुपये) यांच्या आहेत. यापैकी दिनो मोरिया हे हिंदी चित्रपटातील अभिनेते असून इरफान अहमद सिद्दीकी हे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई आहेत.
पीएमएलए कायद्याअंतर्गत चार लोकांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. 16 हजार कोटी रूपयांचे विविध सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवल्याचा आरोप गुजरातमधील संदेसरा ग्रुपवर आहे.
याप्रकरणात संजय खान, दिनो मोरिया, अकिल बच्चू अली आणि इरफान सिद्दीकी यांच्या मालमत्तेवर जप्ती आणत ईडीने आतापर्यंत याप्रकरणी स्थावर आणि जंगम अशा एकूण 14 हजार 531.80 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्त आणली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








