कोव्हिडमुळे विधवा झालेल्या 32 वर्षांच्या रेणूची कहाणी, 'मलाही गोव्यात जाऊन पतीबरोबर फोटो काढायचा होता,'

- Author, चिंकी सिन्हा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. कित्येक महिलांनी आयुष्यभराचा जोडीदार गमावला. त्यातील अनेक महिला या तिशी-चाळीशीतील आहेत. त्या यापूर्वी कधीही कामासाठी घराबाहेर पडलेल्या नाहीत.
बहुतांश तर गृहिणी आहेत. या सर्वांसमोर आता आर्थिक संकट उभं आहे. सोबतच अनिश्चिततांनी भरलेलं असं भवितव्यही.
कोव्हिडमुळं पती गमावलेल्या या सर्व स्त्रिया, प्रत्येक कामासाठी पतीवर अवलंबून असणाऱ्या सामाजिक रचनेचा एक भाग आहेत. त्यांच्याकडं कोणतीही डीग्री नाही किंवा कधी बाहेर जाऊन काम केल्याचा अनुभवही नाही. अनेक महिलांसाठी तर दुसऱ्या लग्नाचा पर्यायदेखील जवळपास अशक्य आहे.
कोव्हिडमुळं पतीचा मृत्यू झालेल्या अशाच 32 वर्षीय महिला, रेणू यांच्याकडून बीबीसी न्यूजने नुकतीच परिस्थिती जाणून घेतली. कोव्हिडमुळं 25 एप्रिल रोजी रेणू यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ज्या परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागतोय, त्याबद्दल त्यांनी मोकळेपणानं सांगितलं.
"मला ज्यादिवशी त्यांची आठवण येते, त्यादिवशी मी त्यांचा पांढरा टी-शर्ट परिधान करते. हा टी-शर्ट कायम माझ्याजवळ राहणार नाही, हेही मला माहिती आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा अंत कधी-तरी ठरलेलाच आहे. लग्न ही आयुष्यभराची साथ असते, पण या प्रवासामध्ये ते मला एकटं सोडून निघून गेले.
त्यांच्याशिवाय अंथरुणावर जाणंही विचित्र वाटतं. झोपेतून उठल्यानंतरही त्याच विचित्रपणाचा अनुभव असतो. मग मी रडण्यासाठी घराचा कोपरा शोधू लागते. पण माझी नऊ वर्षांची मुलगी, मी झोपेपर्यंत जागीच असते. तिचं वय अवघं नऊ वर्षं आहे. मात्र घरातली मृत्यूची घटना तुम्हाला लवकर मोठं करते, असं मला वाटू लागलं आहे.
एक दिवस मला ती पायऱ्यावर रडत बसलेली दिसली. वडिलांचा फोटो छातीला धरून ती हमसून हमसून रडत होती. मी तिच्याजवळ जाऊन तिला म्हटलं, तू रडलीस तर मी कशी शांत राहणार, मी सगळ्यांना कशी सांभाळणार? त्यावर ती म्हणाली, मी आता कधीही रडणार नाही. माझ्याकडूनही तिनं तसं वचन घेतलं, आणि आता आम्ही दोघीही ते पाळण्याचा प्रयत्न करत आहोत.
मला चार वर्षांचा एक मुलगाही आहे. त्याला वाटतं की त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये गेले आहेत आणि लवकरच परतही येतील. ते गेले तो दिवस मला चांगलाच आठवतो. त्यांची फुफ्फुसं पूर्ण खराब झाली होती. त्यांना कोव्हिड झाला असेल असं कधी वाटलंच नाही. पण श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासून कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं.
रुग्णालायत ऑक्सिजनच्या सिलिंडरची संख्या कमी होती, म्हणून डॉक्टरांनी सासू सासऱ्यांना त्यांना (पतीला) घरी नेण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांच्या मित्रांच्या मदतीनं घरीच काही सिलिंडरची व्यवस्था केली.
क्षणार्धात उध्वस्त होतं आयुष्य
त्यादिवशी दुपारी ते झोपले होते. 25 एप्रिल तारीख होती. त्यांचे काही मित्र भेटायला आले होते. मी सासू-सासरे आणि मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवलं होतं. केवळ मी त्यांच्याबरोबर होते. सायंकाळी त्यांनी मुलांना जवळ बोलावलं.

त्यांनी मला इशाऱ्यानंच, मुलांना लांब उभं करायला सांगितलं. त्यानंतर दोन्ही मुलांकडं पाहून ते हसले होते. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला काहीही होणार नाही. त्यावर त्यांनी म्हटलं, तू सोबत आहेस तर यातूनही सुटका होईल.
रात्री साडेदहाच्या दरम्यान, आम्ही त्यांचं ऑक्सिजन सिलिंडर बदलत होतो. त्याचवेळी आमच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या मित्रानं ऑक्सिमीटरचं रिडींग पाहिलं. ऑक्सिजन लेव्हल शून्यावर गेली होती, नाडी तपासली तर तीदेखील थांबलेली होती.
त्यांचा मित्र संदीप वैद्यकीय कर्मचारी आहे. त्यांनी सीपीआर केलं. त्यानंतर रुग्णालयात डॉक्टरांशी बोलले, एक इंजेक्शनही दिलं पण माझ्या पतीचं हृदय थांबलेलं होतं. माझे पती दुसऱ्या जगामध्ये निघून गेले होते. केवळ 37 वर्षांचे होते. असेच आम्हाला सोडून निघून गेले.
आयुष्य क्षणार्धात उध्वस्त होतं, हे खरंच आहे.
मला त्यांचं किचनमध्ये काम करणं आठवतं. लॉकडाऊनच्या काळात आम्ही सोबत किचनमध्ये काही तरी बनवत असायचो. ते गूगलवर एखादी रेसिपी शोधायचे. मी भाज्या कापायचे आणि ते रेसिपीनुसार पदार्थ बनवायचे. पण आता मला हे बनवून दे, ते बनवून दे असं कोण सांगेल."
अरेंज्ड मॅरेजची कहाणी
"मला सर्वाधिक चिंता आमच्या भवितव्याबाबत आहे. मुलांचा विचार करून मला भीती वाटते. उरलेलं आयुष्य साथीदाराच्या साथीविना कसं घालवायचं याचीही भीती वाटते. मला सुरुवातीपासून एक प्रोफेशनल मेक-अप आर्टिस्ट बनायचं होतं. दहावीनंतर मी शिक्षण सोडलं होतं.

मी जास्त शिकले नव्हते. जुनी दिल्ली भागात मी लहानाची मोठी झाले. आई गृहिणी होती आणि वडील रेल्वेत नोकरी करायचे. माझा आणि माझ्या जुळ्या भावाचा जन्म एका जुन्या घरात झाला होता. भावंडांमध्ये मी सर्वांत मोठी होते. नंतर माझ्या आईला आणखी दोन अपत्यं झाली. मला सुरुवातीपासून नटण्या-मुरडण्याची आवड होती. मेकअपसाठी तर जणू मला वेडच लागायचं.
सहाव्या वर्गात असताना मी काकीची लिपस्टिक वापरायला सुरुवात केली. त्या मला रागवायच्या, पण मला त्याचा फारसा फरक पडत नव्हता. माझ्या आत्याचं लक्ष्मीनगरमध्ये एक पार्लर होतं. मी नेहमी तिथं जायचे आणि त्यांना काम करताना निरीक्षण करायचे.
मी तरुण होते, पण स्वतःसाठी मुलगा शोधू शकले नव्हते. पतीला भेटले तेव्हा माझं वय 20 वर्षं होतं. तो 2009 चा काळ होता. आमचं अरेंज्ड मॅरेज होतं. त्यामुळं ते जेव्हा आई-वडिलांबरोबर मला भेटण्यासाठी माझ्या घरी आले, त्याचवेळी मी त्यांना पहिल्यांदा भेटले होते.
माझ्या वडिलांची प्रकृती ठिक नसायची. त्यामुळं लवकरात लवकर माझं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा होती. अगदी चित्रपटांमध्ये दाखवतात तसाच आमचा दाखवण्याचा कार्यक्रम झाला. मी नाश्ता आणि चहाचा ट्रे घेऊन आले तेव्हाच त्यांना प्रथम पाहिलं. त्यानंतर आम्हाला एकमेकांशी बोलून लग्नाचा निर्णय घेण्यासाठी वेगळ्या खोलीमध्ये पाठवण्यात आलं.
मी त्यांना सांगितलं की, मला नटायला, मेकअप लावायला आवडतं. त्यावर त्यांच्या कुटुंबाला याबाबत काही हरकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. ते हसत होते. मला आधीच पसंत केलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर सगळे बसले होते तिथं आम्ही गेलो आणि मी, मुलगा पसंत आहे असं सांगितलं. मला चांगलं आठवतं, मला त्याचं हसू भावलं होतं. लग्नाचा निर्णय घेण्यात त्यांचं ते हसू महत्त्वाचं ठरलं होतं. एका वर्षाने म्हणजे 19 नोव्हेंबर 2010 रोजी आमचं लग्न झालं."
'मी आता एकटी पडलीये'
"काही महिन्यांनी मी गर्भवती राहिले. मला त्यावेळी आई बनायचं नव्हतं. कारण सर्व फार लवकर घडलं होतं. पण पतीनं म्हटलं की, आपण बाळ जन्माला घालायला हवं. मी मुलीला जन्म दिला, तिच्यावर पतीचा प्रचंड जीव होता.
मी 2013 मध्ये मेकअपचा कोर्स केला. मला जवळपास नोकरीही मिळालीच होती. पण मुलगी लहान असल्यानं घरी राहण्याचा निर्णय घेतला. पण घरी राहूनही मी कामं घ्यायला सुरुवात केली. महिन्याकाठी मी त्यातून 20 ते 25 हजार रुपये कमावत होते. त्यानंतर 2016 मध्ये मुलाचा जन्म झाला.

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात माझ्याकडे ब्राईडल मेकअप (नवरीचा मेकअप) च्या 20 बुकिंग होत्या. चांगला पैसा कमावण्याची संधी होती. पण त्याचवेळी लॉकडाऊन लागलं. वर्षभर काम मिळालं नाही. मिळालेले पैसे खर्च केले होते. दागिने, भेटवस्तू आणि शूज, गाऊन अशी खरेदी केली होती.
हे सर्व पाहून अनेकदा माझ्या पतीचा संताप व्हायचा. आयुष्याचं (जीवन-मृत्यू) काही खरं नाही, असं ते म्हणायचे. पण जेव्हा तुम्ही तरुण असता आणि तुमच्याकडे पैसा असतो, तेव्हा तुम्ही मृत्यूचा विचारच करत नाही."
अखेरची भेटवस्तू
"फेब्रुवारी महिन्यात आम्ही राजौरी गार्डनमधील एका मॉलमध्ये गेलो होतो. कुटुंबातील एका विवाह सोहळ्याच्या खरेदीसाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी मला एक एक गुलाबी रंगाचा गाऊन दिसला. डिस्पले विंडोमध्ये पाहूनच मला तो आवडला होता. माझ्याकडे तेव्हा 4000 रुपये होते, तेवढीच त्याची किंमत असेल असं मला वाटलं. पण दुकानात जाऊन किंमत विचारली तर 8000 रुपये होती.

मी पतीला म्हटलं की, हा गाऊन खरेदी करणं म्हणजे पैशांची उधळपट्टी आहे. कारण रोज काही मी तो परिधान करणार नाही. त्यानंतर मी मुलांसाठी सामान खरेदी केलं आणि आम्ही परत आलो. दुसऱ्या दिवशी सायंकाळी पती घरी आले त्यावेळी त्यांच्या हातात एक पाकिट होतं.
त्यांनी मला ते पाकिट उघडायला सांगितलं. त्यात तोच गाऊन होता. त्यानंतर मी त्यांना एक वॉलेट (खिशातलं पाकिट) घेऊन दिलं. त्यावर हा विनाकारणचा खर्च असल्याचं म्हणत ते चिडले होते. मग मी त्यांना मला दिलेल्या गाऊनची आठवण करून दिली. तो गाऊन त्यांनी मला दिलेली अखेरची भेट ठरला आणि ते वॉलेट मी त्यांना दिलेली अखेरची भेट ठरलं.
काही दिवसांनंतर मी पतीच्या सर्व वस्तू दान करेन. तशी प्रथा आहे. पण या वॉलेट सारख्या काही वस्तू मी माझ्याकडेच ठेवणार आहे. मी गोव्याला जाण्यासाठी पैसे जमवले होते. ते असते तर कदाचित आम्ही एप्रिल महिन्यात गोव्याला गेलो असतो. मला समुद्र पाहण्याची आतोनात इच्छा होती. हे मी त्यांना सांगयला हवं होतं. गोव्याला जाऊन इतर जोडपी जसे फोटो काढतात, तसे आम्हालाही काढायचे होते. माझ्या जीवनप्रवासातील ते सहप्रवासी होते. आता मला त्यांची प्रचंड आठवण येते.
या ठिकाणांवर आता मला कोण घेऊन जाईल, मी एकटी पडली आहे.
नोकरीचा शोध
पतीच्या निधनाला आता महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. माझ्या सासऱ्यांना थोडी-फार पेन्शन मिळते. कदाचित अंदाजे 4 हजार रुपये. माझी मुलगी खासगी शाळेत आहे. तिची फी महिन्याला 2100 रुपये एवढी आहे. बचत संपली आहे. त्यामुळं आता उदरनिर्वाह करणं कठीण झालंय. माझे दीर एका खासगी कंपनीत काम करतात. पण संपूर्ण कुटुंबाला पुरेल एवढी त्यांचीही कमाई नाही.
मी सध्या नोकरी शोधत आहे. काहीठिकाणी मी अर्ज केले होते. 'चाईल्ड सर्व्हायवल इंडिया' मधून मला प्रतिसादही मिळाला. ते नोकरी शोधण्यासाठी मला मदत करणार आहेत. कोव्हिडमुळं मेकअपचं कामही चालत नाही. त्यामुळं मला मुलांबाबत भीती वाटू लागली आहे. मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, करिअर करावं असं मला वाटतं. मी माझं आयुष्य कसंही जगेल, पण आता त्यातही प्रचंड एकटेपणा असेल.
घटना घडून गेल्यानंतर काही दिवसांत सगळे विसरून जातात. आता सगळे आपापल्या जीवनात व्यग्र आहेत. पण मी एकटी या खोलीत बसलेली आहे. असं वाटतं की आजुबाजुला केवळ अनिश्चिततांचं दाट धुकं दाटलं आहे. आता, आयुष्याच्या या वळणावरून पुढं कसं जावं? असा प्रश्न समोर उभा राहतो.
मी एकटी असले की, पतीबाबत विचार करते. फोनवर त्यांचे व्हीडिओ पाहते. माझ्या आसपास त्यांच्या अनेक वस्तू असतात. अनेकदा असं वाटतं की, काही वेळातच ते घरी येणार आहेत. पण काही क्षणातच अस्तित्वाची जाणीव होते. एखाद्या वाईट स्वप्नासारखा हा अनुभव असतो.
ते वॉलेटमध्ये माझा, मुलांचा आणि आई-वडिलांचा फोटो ठेवायचे. मी त्यांना भेट दिलेल्या वॉलेटमध्येच. आम्ही सोबत जगलेल्या आयुष्याच्या त्याच आठवणी होत्या, तसंच आमची काही स्वप्नंही होती. पण आता मी एकटी आहे, तरीही मी दिलेली काही वचनं मला पूर्ण करायची आहेत. आता या आठवणीच आयुष्यभर माझ्यासोबत आहेत.
त्यांचं नाव अमित होतं. मला ते छोटं आणि सुंदर नाव खूप आवडत होतं.
दुसऱ्या लग्नाबाबत द्विधा मनस्थिती
अनेकजण मला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला देत आहेत. पण मला मुलांची काळजी आहे. लग्नानंतर मुलांनी नवीन पित्याचा स्वीकार केला नाही तर काय होईल? माझ्या मुलीचं वडिलांवर प्रचंड प्रेम होतं. ते लवकरच उठायचे आणि मुलीला घेऊन फिरायला निघायचे. मी मुलीला रागावलं तर त्यांना वाईट वाटायचं. त्यांचा मुलीवर प्रचंड जीव होता. त्यांना तिला पायलट बनवायचं होतं.
आताच लग्नाचा विषय हा घाईचा ठरेल. मी लग्नाचा निर्णय घेतला तर माझे सासू सासरे त्याला पाठिंबाही देतील. पण मी लग्न करून निघून गेले, तर त्यांची काळजी कोण घेईल?
मी पतीला वचन दिलं होतं की, मी त्यांच्या आई-वडिलांबरोबर राहीन. माझ्या एका मित्रानं मला फोन करून, लग्नासाठी मागणीही घातली. पण मी अद्याप यासाठी तयार नसल्याचं त्याला सांगितलं. मी वर्षभरापासून त्याला ओळखते. माझे पतीही त्याला ओळखत होते.
त्यांचे आई वडील, दोन मुलं असलेली विधवा सून स्वीकारतील का? हेही मला माहिती नाही. माझ्या मित्राचे आई-वडिल पुरोगामी विचारांचे आहेत, असं त्याचं म्हणणं आहे. पण, जर लग्नानंतर त्यानं माझ्या मुलांना आनंदी ठेवलं नाही, तर काय होईल?
मी नकार दिल्यानंतर आता तो माझ्याशी फार बोलत नाही. आणि मीही सर्वकाही देवाच्या भरवशावर सोडलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








