प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे उद्धव ठाकरे सरकार अस्थिर होईल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलंय. या पत्रात सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शिवसेनेने पुन्हा जुळवून घ्यावे असं मत व्यक्त केलं आहे.
या पत्रात प्रताप सरनाईक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर काही आरोपही केले आहेत. सरनाईक त्यांच्या पत्रात म्हणतात, "कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांची कामं होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आपला पक्ष जर कोणी कमकुवत करत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे असे माझे वैयक्तिक मत आहे. यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिला जाणारा नाहक त्रास थांबेल."
प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात एकीकडे भाजपशी जुळवून घेण्याची सूचना केली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेला कमकुवत करत असल्याचाही आरोप केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये एकीकडे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्यावरून टोलेबाजी सुरू आहे, तर दुसरीकडे आता सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पक्ष फोडत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच सरनाईक यांच्या या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरनाईक यांच्या पत्रामुळे उद्धव ठाकरे सरकार अस्थिर होईल का, अशीही चर्चा सुरू आहे.
प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
ठाण्याच्या ओवाळा-माजीवाडा मतदारसंघाचे आमदार असलेल्या प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहिलं.
ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचं पहिल्या पानावर कौतुक केल्यानंतर दुसऱ्या पानावर सरनाईक म्हणतात, "सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतेलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे," असंही पुढे प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.
या पत्राच्या शेवटी प्रताप सरनाईक म्हणतात, "पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल."
"याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल, असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनातल्या भावना आपल्याला कळवल्या आहेत," असं शेवटी सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना 9 जून रोजी हे पत्र लिहिलं. हे पत्र 10 जून रोजी मुख्यमंत्री कार्यालयात पोहोच केल्याचा शिक्का त्यावर आहे. पण 10 दिवसांनंतर आता त्याची पोहोच सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याच्या टायमिंगबाबतही अनेक चर्चा सुरू आहेत.
'तपास यंत्रणांचा ससेमिरा थांबवण्यासाठीच पत्र'
या सर्व गोष्टी पाहिल्यास सरनाईक यांच्या पत्राचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल, हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "या पत्राचा महाविकास आघाडी वर कोणताही परिणाम होईल असं वाटत नाही. एका आमदाराच्या मागणीमुळे सत्ता बदलाचा निर्णय होत नाही.

फोटो स्रोत, FACEBOOK/PRATAP SARNAIK
"प्रताप सरनाईक यांनी हे पत्र केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा थांबवण्यासाठी लिहिलंय असं दिसतंय. सत्ता बदलासाठी चारही बाजूंनी विचार करावा लागतो. तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील. पण या पत्रामुळे सरकारमध्ये फार फरक पडेल असं वाटत नाही," असं प्रधान म्हणतात.
'सरनाईक यांच्या पत्रामागे वैयक्तिक हेतू'
या पत्राचा लगेच महाविकास आघाडी सरकारवर परिणाम होईल असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनाही वाटत नाही.
ते म्हणतात, "कालच उद्धव ठाकरे यांनी भाषणात याचा उल्लेख केला आहे. काँग्रेसने स्वबळाची केलेली भाषाही शिवसेनेला चालत नाही, हे यातून दिसून आलं. याआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये कितीही मतभेद असले तरी त्याचा परिणाम थेट सरकारवर होत नसे."

फोटो स्रोत, FACEBOOK/PRATAP SARNAIK
"पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. 27 जिल्हा परिषदेच्या निवडणुका या तोंडावर आहेत. त्यामुळे याला मिनी विधानसभा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशावेळी निवडणुकीत जर काँग्रेसने शिवसेनेवर आरोप केले तर शिवसेना ते आरोप कसे सहन करणार? हे बघणंही महत्त्वाचं असेल. पण सरनाईकांचं हे पत्र व्यक्तिगत हेतूने लिहिले आहे असं वाटतं," असं देशपांडे म्हणाले.
हा शिवसेनेचा पक्षांतर्गत विषय - नाना पटोले
सरनाईक पत्रप्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांसमोर येऊन त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
"कोणत्याही पक्षाच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करणं, हे काँग्रेसचं काम कधीच नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न त्याचा आमच्याशी काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणावर दिली.
काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची भूमिका आम्ही यापूर्वीच घेतली आहे. सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, कांग्रेसने त्याची तयारी स्वबळावर सुरू केली आहे, असं पटोले म्हणाले.
यामागे भाजपचे खेळी?
दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणामागे भाजपचा हात असल्याचाही आरोप केला जात आहे. भाजपने ईडीच्या माध्यमातून सरनाईक यांच्यावर दबाव टाकल्याने त्यांनी हे पत्र लिहिलं, असा अंदाज काही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले.
"शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन नये, असं आपण त्यांना 18 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं. पण तरीही ते त्यांच्यासोबत गेले. त्याचे दुष्परिणाम आता दिसत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनन शिवसेनेला अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये भाजपकडून दबाव टाकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही," असं पाटील यांनी म्हटलं आहे.
मात्र राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते, यामागे भाजपची खेळी असण्याला अनेक कारणं आहेत.
ते सांगतात, "शिवसेना आमदार यांची ईडी चौकशी सुरू आहे. मग त्यांच्यावर दबाव असणारच. त्यांनी पत्रात वापरलेली भाषा पाहिल्यास त्यांना खूप त्रास होत असल्याचं दिसून येतं.
यामागे शिवसेनेचाही हात असण्याची शक्यता देसाई यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, "शिवसेनेच्या आमदारांचं मत जाणून घेण्यासाठी सरनाईक यांना हे पत्र लिहायला लावलेलं असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अनेक आमदार राष्ट्रवादी-काँग्रेससोबत अस्वस्थ आहेत. गेल्या काही दिवसांत भाजप-सेनेच्या पुन्हा युतीच्या चर्चा ऐकल्या तर आमदारांची काय भूमिका असू शकते, याची चाचपणी पक्ष करू शकतो."
"आता लगेच अचानक आघाडीतून बाहेर पडणं शक्य नसलं तरी पक्षातील आमदारांचं मत जाणून घेण्यासाठीही ही चर्चा घडवून आणली जाऊ शकते," असं ते म्हणाले.
'परिणाम तर होणार'
"एका आमदाराने जाहीरपणे पत्र पाठवून नाराजी व्यक्त करणं हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय आहे, त्यामुळे याचे परिणाम आघाडी सरकारवर नक्की होतील," असं ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे यांना वाटतं.
ते सांगतात, " सरनाईक पत्रप्रकरणामुळे सुरुवातीला शिवसेनेत पक्षांतर्गत परिणाम तर नक्कीच होतील. त्यानंतर महाविकास आघाडीपर्यंत हे प्रकरण येऊन ठेपेल. परिणाम होणार हे तर नक्की आहे. पण ते आता लगेच होईल, असंही नाही. ते कधी होईल, हेसुद्धा आता सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे सध्यातरी महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही."
"पण शिवसेनेत गोंधळ आहे, हे यामधून दिसून आलं. हा विषय भविष्यात नेहमी चर्चिला जाईल. त्याचा परिणाम सरकारवर कधी होईल, हे पाहण्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागू शकते," असं वैभव पुरंदरे यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
- प्रताप सरनाईक : वर्ध्यात जन्म, ठाण्यातून सलग तीनवेळा आमदार, असा आहे प्रवास
- उद्धव ठाकरेंना 5 वर्षं मुख्यमंत्रिपद देण्याची कॉंग्रेस आणि 'राष्ट्रवादी'ची कमिटमेंट होती का?
- कट्टर शिवसैनिक ते ठाकरेंशी 'शत्रुत्व', कसा आहे नारायण राणे यांचा राजकीय प्रवास?
- शिवसेना भवनाबद्दल तुम्हाला या 5 गोष्टी माहिती आहेत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








