उद्धव ठाकरे: 'तरी बरं प्रताप सरनाईकांना अजून नातू नाही, नाही तर त्यालाही चौकशीसाठी बोलवलं असतं'

फोटो स्रोत, Pratap sarnaik
प्रताप सरनाईक यांच्या ईडीच्या नोटीसचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळातही पडले. प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला होता.
कंगणा राणावत आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धीतून झाली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही सूडबुद्धीतून काहीही करत नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"तुम्ही म्हणता त्यांच्यावरील हक्कभंगाची कारवाई ही सूडबुद्धीने झाली मग प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली ईडीची कारवाई कशातून झाली," असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
"प्रताप सरनाईक, त्यांचा मुलगा सगळ्यांना ईडीने समन्स बजावले आहेत. त्यांना अजून नातू झाला नाही, नाही तर नातवाचा जन्म झाल्यावर थेट इकडेच चौकशीसाठी घेऊन," या असं अजून कुणी म्हटलं नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठवली होती. प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांनी ईडीच्या नोटिशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला होता. प्रताप सरनाईक यांच्यावर कोणतीही कारवाई करु नये, असे आदेश आज (ता. 9 डिसेंबरला) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
प्रताप सरनाईकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांना ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत, त्यांना तसे पत्राद्वारे उत्तरही पाठवले आहे. ईडी ज्या ज्या वेळी चौकशीला बोलवेल, तेव्हा तेव्हा मी जाईन, असंही सरनाईक यांनी म्हटलं होतं. पण त्याचवेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कुठलीही कारवाई न करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयावर एन्फोर्समेंट डिरेक्टरेट (ईडी)ने काही दिवसांवर छापे मारले. त्यानंतर त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याला ईडीनं ताब्यात घेत आणि चौकशी केली होती.
प्रताप सरनाईक यांची मुलं पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीने छापे मारले होते.
24 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता ईडीचे पथक सरनाईक यांच्या निवासास्थानी तसेच व्यावसायिक कामकाजाच्या ठिकाणी दाखल झाले. सरनाईक कुटुंबीय टॉप्स ग्रुपचे प्रमोटर्स आहेत. त्या कार्यालयांवरही छापे मारण्यात आले आहेत.
"ईडीची कारवाई कशासाठी हे मला माहीती नाही. तेच शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. मी कायदेशीर लढाई लढणार आहे," असं प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर थेट सामनाच्या ऑफीसमध्ये जाऊन सरनाईक यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांच्यात तासभर चर्चा झाल्याचं समजतंय.
"माझ्यावर कोणताही डाग नाही, मी स्वच्छ आहे, ज्यांच्याकडे माझ्याविरोधात पुरावे असतील त्यांनी ते पुरावे सक्तवसुली संचनलनालयाकडे खुशाल द्यावेत, मला कोणाचीही भीती नाही", असं सरनाईक म्हणाले होते.
"मी महाराष्ट्रातील एक जबाबदार आमदार आणि जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीला सामोरा जाईन. माझे विजय माल्ल्या किंवा नीरव मोदीसारखे नाही, मी स्वतःहून ईडीकडे जाईन. तसेच माझा मुलगा विहंग याचा कुठेही उल्लेख नाही. रिमांडमध्ये केवळ प्रताप सरनाईक या एकाच नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे मीडियाने विहंग यांचे नाव घेणे योग्य नाही. मी बाहेरगावी होतो त्यामुळे विहंग याला ईडीने नेले.
"महाराष्ट्र आणि दिल्लीच्या लढाईत प्रताप सरनाईक यांचा तानाजी मालुसरे झाला आहे. पण मी 21 व्या शतकातला तानाजी मालुसरे आहे, त्यामुळे मी प्रत्येक संकटातून बाहेर येईन, असे सांगताना हे कॉर्पोरेट वॉर असून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला", असं सरनाईक म्हणाले.
प्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजीव विहंग सरनाईक व पूर्वेश सरनाईक यांनी मंगळवारी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले होते.
काँग्रेसची टीका
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी छाप्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात कारवाई करण्याचा भाजपने ट्रेंड सुरू केला असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या सहा वर्षांत किती भाजप नेत्यांवर कारवाई करण्यात आली असे देखील त्यांनी विचारले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करायचं हा त्यांचा अजेंडा आहे, अशी टीका सावंत यांनी केली.
तर सीबीआय असो ईडी असो, आम्ही कोणाला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय. ते म्हणाले, "जर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल असं कोणाला वाटत असेल, तर ते मूर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत. सीबीआय असेल, ईडी असेल, काहीही असूद्यात. काही झालं तरी हे सरकार आणि आमचे आमदार, सगळे नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत."
"आम्ही लढत राहू. हे सरकार पुढली 4 वर्षं नाही तर त्याही पुढे कायम राहील. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू इच्छितात किंवा आमदारांचं मनोबल मोडू इच्छितात, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, हा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, दहशत निर्माण करा, ही काळया दगडावरची रेघ समजा की पुढली 25 वर्षं तुमचं सरकार येईल, हे स्वप्न विसरून जा," असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले, "ईडी असेल किंवा अन्य कोणी असतील, त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करू नये. ज्यांचे आदेश ते पाळत आहेत त्या पक्षाच्या 100 लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे आहेत? काय उद्योग आहेत?त्यांचं मनी लाँडरिंग कशा प्रकारे सुरू आहे? निवडणुकीत कुठून पैसे येतो? कसा वापरला जातो? कुठे ठेवला जातो? कसा वाटला जातो?कोणामार्फत येतो? बेनामी काय आहे नामी काय आहे? ही कल्पना ईडीला नसली तरी आमच्याकडे आहे.
"गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा अलीकडच्या सत्ताधाऱ्यांचे गुलाम, चाकर आणि नोकर असल्याप्रमाणे वागत असतील तर आम्ही पर्वा करत नाही. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, कितीही धाडी घाला, कितीही खोटी कागदपत्रं बनवा, तुम्ही खोटे पुरावे तयार करा, पण शेवटी या महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत विजय सत्याचा होईल," राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने टाकलेल्या छाप्यांबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ईडीने जर रेड टाकली असेल, तर त्यांच्याकडे काही ना काही तक्रारी असतील, किंवा त्यांच्याकडे काही मटेरियल असेल. त्याशिवाय ईडी रेड टाकत नाही. मला याची कुठलीही माहिती नाही कारण मी आता या दौऱ्यातच आहे. त्यामुळे मला यासंदर्भातले डीटेल्स माहिती नाहीत, त्यामुळे मी बोलणार नाही. पण एवढंच सांगतो, ज्यांनी चूक केली नाही, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल, तर कुठली एजन्सी असेल, ती कारवाई करेल."
आपल्याकडे 100 लोकांची यादी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी त्यांना आव्हान देतो, त्या 100 लोकांच्या यादीची तक्रार ईडीत करावी. एकाही तक्रारीत तथ्य असेल तर मी शब्द देतो, त्याच्यावर कारवाई होईल. त्यामुळे जिथे कारवाई होतेय, तिथे कांगावा करू नका."
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली होती.
प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे ठाण्यातल्या ओवळा - माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)








