संजय राऊत: 'शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार'

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रित निवडणुका लढवण्याबाबत संकेत दिले जात असताना शिवसेनेने मात्र त्यापासून फारकत घेतल्याचं दिसून येत आहे.
आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली.
नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.
"नाना पटोले स्वबळ म्हणत आहेत, तर शिवसेनाही 'बळावरच' लढेल," असं म्हणत संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
राऊत पुढे म्हणाले, "प्रत्येक पक्षाची स्वतंत्र विचारसरणी असते. राज्यात 3 स्वतंत्र विचारसरणीच्या पक्षांची आघाडी आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणं गैर नाही. काँग्रेस पक्षातच नव्हे तर इतर अनेक पक्षात त्यासाठीचे दावेदार असू शकतात, पण सद्यस्थितीत राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्षं राहील. यात कोणाचाही वाटा नसेल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं."
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन साजरा झाला. त्यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितच लढवेल, असं वक्तव्य केलं होतं.

पण त्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगळी भूमिका मांडत काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारीच करत असल्याचं सांगितलं होतं. तसंच अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रित निवडणूक लढवण्याबाबत प्रस्ताव आला नसल्याचं पटोले म्हणाले होते.
आता शिवसेनेकडून संजय राऊत यांनीही अशाच प्रकारे स्वबळाशी भाषा वापरली आहे. त्यामुळे यावरुन राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
2024 ला मोदी पंतप्रधान, आम्ही कुठे नाही म्हटलं?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याला आम्ही कुठे नाही म्हटलं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली.

फोटो स्रोत, Pmo india
प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांच्याही अनेक भेटी झाल्या. त्यांच्या यंत्रणेचा फायदा सर्वच राजकीय पक्ष घेतात. प्रत्येक पक्षाला अशा यंत्रणेची गरज असते. मात्र लोकसभा निवडणुकीचे आडाखे आता मांडता येणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं.
राजकारण हे अत्यंत चंचल असतं. पुढे काय होईल, याचा अंदाज लावता येऊ शकत नाही. इंदिरा गांधी यांनाही तो लावता आला नव्हता.
देवेंद्र फडणवीस फक्त त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत, असं राऊत म्हणाले.
शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी दौरे
शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी हा उत्तर महाराष्ट्र दौरा आपण केला. कोव्हिडच्या काळात बाहेर कुठे जाता आलं नाही, बंधनं पाळणं गरजेचं आहे, पण तरीही राजकारण थांबत नाही. त्यामुळे पक्षसंघटनेला गती देणं गरजेचं आहे, पक्षाची बांधणी करणं हे नेत्यांचं कर्तव्यच आहे, असं राऊत म्हणाले.
सध्या थोडी गोंधळाची स्थिती दिसते. विशेषतः प्रसारमाध्यमांमुळे ती परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पक्षकार्यकर्त्यांपर्यंत पक्षप्रमुखांचा संदेश घेऊन मी आलो होतो.
पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले होतील, अशी बातमी मी वाचली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, काँग्रेस पक्षात एकापेक्षा सरस नेते आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये असे नेते असतात. तिन भिन्न पक्षांचं हे सरकार आहे. प्रत्येकाचं अस्तित्व स्वतंत्र आहे. सरकार बनवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. प्रत्येकाला आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असं राऊत यांनी म्हटलं.
दिल्लीत मोर्चा काढावा
मराठा आरक्षणावर बोलताना केंद्र सरकारच ठाम भूमिका घेऊ शकते. संभाजीराजे यांनी दिल्लीत मोर्चा काढावा. दिल्लीत एक मराठा लाख मराठा ताकद दाखवावी असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.
नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्यावं
नवी मुंबई येथे होत असलेल्या नव्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात यावं असा ठराव कॅबिनेटमध्ये कडून केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असं राऊत म्हणाले.
दि. बा. पाटील हे त्या भागातील श्रमिकांचे नेते होते. त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी अखेरच्या काळात शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आज ते असते तर विमानतळाला बाळासाहेबांचंच नाव द्यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली असती, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








