देवेंद्र फडणवीस : 'कोणी कितीही रणनीती आखली तरी 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच येणार' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. 'कोणी कितीही रणनीती आखली तरी 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच येणार' - देवेंद्र फडणवीस
'कोणी कितीही रणनीती आखली तरी आजही नरेंद्र मोदीच आहेत आणि 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच येणार,' असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. ही भेट 2024 मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाली असल्याची चर्चा सुरू आहे. या भेटीवर फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातच भाजप पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, "कोणी कोणाची भेट घ्यावी यावर बंधन नाही. प्रत्येक जण आपली रणनीती आखत असतं. पण कोणी कितीही रणनीती आखली तरी 2024 च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदीच येणार."
झी 24 तासने हे वृत्त दिलं आहे.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिली नसल्याचा खुलासा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं, "प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या जवळपास तीन तास चर्चा झाली. प्रशांत किशोर यांचा राजकीय रणनीतीकार म्हणून वेगळा अभ्यास आहे. त्यांचा वेगळा दृष्टीकोन आहे. याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली."
2. '...अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील'- तुषार भोसले यांचे अजित पवारांना आव्हान
आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नसून हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील, असा इशारा भाजप प्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला आहे.
मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत यंदा पायी वारीला परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने वारी करण्यास परवानगी दिलेली नाही.
सकाळने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe
हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे, अशी टीकाही तुषार भोसले यांनी केलीय. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकारने आपली भूमिका मागे घेतली नाही तर असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील आणि यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास याला उमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील असं आव्हान तुषार भोसले यांनी दिलं आहे.
राज्यातील मानाच्या दहा पालख्यांसाठी बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी 20 बसेस दिल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
3. 'जयंत पाटील यांचा 2024 च्या निवडणुकीत पराभव करू' - चंद्रकांत पाटील
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याने 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू असा दावा केला आहे. टीव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "कार्यकर्ते सोबत असतील तर 2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव करू. सर्वांनी एकजुटीने काम केले तर हे सुद्धा शक्य आहे."
इस्लमापूर येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलाच्या कार्यक्रमानिमित्त चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावरही निशाणा साधला.
यापूर्वी संभाजीराजे यांनी आपण भाजपचे खासदार नसून राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्याला प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील म्हणाले, की संभाजीराजे मान्य करत नसले तरी ते ऑनपेपर भाजपचे खासदार आहेत.
4. अदर पूनावाला यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा का दाखल करण्यात आला?
कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतरही अँटीबॉडीज तयार न झाल्याचा दावा करत लखनौ येथील मानवाधिकार कार्यकर्ते प्रताप चंद यांनी 156-3 अंतर्गत सिरम इन्स्टिट्यूटचे मालक अदर पूनावाला, ड्रग कंट्रोलर डायरेक्टर आयसीएमआर, आरोग्य सचिव आणि WHO यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

30 मे रोजी प्रताप चंद यांनी आशियाना पोलीस ठाण्यात तक्रार केली पण गुन्हा नोंदवण्यात आला नाही. यामुळे त्यांनी लखनौचे पोलीस आयुक्त आणि महासंचालक यांनाही पत्र पाठवले. पण अखेर त्यांनी न्यायालयात दाद मागितली.
प्रताप चंद यांच्यानुसार, "8 एप्रिल 2021 रोजी त्यांनी कोव्हिशिल्ड लस घेतली. 28 दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येईल असं सांगण्यात आलं पण नंतर सहा आठवड्यांनी लस मिळेल असं सांगितलं. त्यानंतर सरकारने सहा नाही बारा आठवड्यांनंतर लस देण्यात येईल असं जाहीर केलं.
21 मे 2021 रोजी आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पाहत असताना आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरिरात अँटीबॉडीज तयार होतात अशी माहिती दिली. हे तपासण्यासाठी मी सरकारमान्य लॅबमधून अँटीबॉडीज टेस्ट केली. पण माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तसंच प्लेटलेट्स तीन लाखांवरून दीड लाखांपर्यंत कमी झाल्या."
यामुळे आपल्यासोबत फसवणूक झाली असून आपल्या जीवालाही धोका निर्माण झाल्याची तक्रार प्रताप चंद यांनी केली आहे.
5. महाराष्ट्रातील चार तरुणींना अहमदाबादमध्ये 214 बिअर टीनसह अटक
अहमदाबादमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या महाराष्ट्रातील चार तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 214 बियर टीनसह ट्रेनमधून प्रवास करत असताना चौघींना पकडण्यात आलं. या मुलींच्या बॅगेत बिअरच्या टीन सापडल्या असून चारही मुली रेल्वेच्या वेगवेगळ्या डब्यातून प्रवास करत असल्याची माहिती कृष्णा नगर पोलिसांनी दिली आहे.
न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
अहमदाबाद येथील कृष्णा नगर पोलीस ठाण्याला नरोदा भागातून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची तस्करी होत असल्याची सूचना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत असताना पोलिसांना रेल्वेत प्रवासादरम्यान या चौघींच्या बॅगेत मोठ्या संख्येने बिअरच्या बाटल्या मिळाल्या.
या प्रकरणी महाराष्ट्रातील विविध भागात राहणाऱ्या लक्ष्मी माचरे, पूर्णिमा भट, पूजा तमोचीकर, सुनिता तिडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कृष्णा नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चौहान यांनी सांगितलं, "या तरुणी शॉर्टकटमध्ये पैसे कमवण्यासाठी दारुच्या बाटल्यांची तस्करी करत होत्या. बियरच्या टीन वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरलेल्या होत्या. रेल्वे प्रवासादरम्यान या चौघी एकमेकींशी बोलत नव्हत्या पण अहमदाबादमध्ये उतरल्यानंतर रिक्षातून एकत्र प्रवास करत होत्या."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








