चंद्रकांत पाटील - संभाजीराजे त्यांना भाजपने दिलेल्या सन्मानाबाबत का बोलत नाहीत?

फोटो स्रोत, Social Media
एकीकडे संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी राज्याचा दौरा संपवून नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र संभाजीराजेंवर टीकेची झोड उठवली आहे.
संभाजीराजे यांचा भाजपने किती सन्मान केला याबाबत ते का सांगत नाहीत, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना विचारला आहे.
"छत्रपतींना पार्टी कार्यालयात यावं लागू नये म्हणून त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदार केलं. संभाजीराजे यांना भाजपने किती सन्मान दिला हे ते सांगत नाहीत," असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. तसंच मोदी संभाजीराजेंना याआधी खूपवेळा भेटल्याचा दावासुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने आणि कोरोनाची स्थिती गंभीर असल्यानेच पंतप्रधानांनी भेट नाकारल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
"मराठा आरक्षणाच्या प्रश्नी पंतप्रधानांकडे चार वेळा वेळ मागितली, ती मिळाली नाही," असं सांगत नाशिक इथं पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
मराठा आरक्षणाबाबत आग्रही असलेल्या खासदार संभाजीराजेंनी वारंवार पत्र व्यवहार करूनही त्यांना मोदींना भेटता आलेलं नाही. याबाबत संभाजीराजे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता या मुद्यावर राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय. 27 ऑक्टोबर 2020 रोजी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीतही नरेंद्र मोदी भेटीसाठी वेळ देत नसल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत राज्यभर दौरे केल्यानंतर गुरुवारी (27 मे) मुंबईत काही नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यात शरद पवार आणि राज ठाकरे यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Twitter
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीसुद्धा संभाजीराजे भेट घेणार आहेत.
त्यांच्या या भेटीवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी टीका केली आहे. शरद पवारांनी फक्त 10 मिनिटांच्या भेटीत संभाजीराजेंना गृहीत धरलं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, "श्रीमंत मराठा समाजाला माझ्यासकट एक टक्काही आरक्षण नको, पण 30 टक्के गरीब मराठा समाजाला मदत करा," ही आमची भूमिका आहे असं खासदार संभाजीराजे यांनी आधी म्हटलंय. तसंच यासंदर्भात 28 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ते सविस्तर भूमिका मांडणार आहे.
' रस्त्यावर उतरण्याची वेळ'
मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचंही सांगितलंय.
"मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरुन संघर्ष नाही केला, तर वेळ निघून जाईल. त्यामुळे कोणताही झेडा, बॅच न घेऊन भाजपा आंदोलनात सहभागी होणार आहे," असं ते म्हणाले.
दुसरीकडे रस्त्यावर उतरून आंदोलन करू नका अशी भूमिता संभाजीराजे वारंवार मांडत आहेत.
"अलाहाबादच्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राजेंचा सत्कार केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या सर्व केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय नेत्यांनी उभं राहून त्यांचं अभिनंदन केलं. केंद्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याकडे गेले असता संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मानच केला जातो."
भाजपाच्या राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड विकास परिषदेची स्थापना केली आणि त्या कामासाठी मोठा निधी दिला. अशी उदाहरणं देत भाजपने संभाजी राजे यांचा सन्मान कसा केला हे त्यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








