चंद्रकांत पाटील : 'उद्या निवडणुका घेतल्या तर मोदी 400पेक्षा जास्त जागा जिंकतील' #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, CHANDRAKANT PATIL/FACEBOOK
आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1. 'उद्या निवडणुका घेतल्या तर मोदी 400पेक्षा जास्त जागा जिंकतील' - चंद्रकांत पाटील
'पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचं षड्यंत्र रचण्यात येत असून उद्या निवडणुका घेतल्या तर मोदींना 400 पेक्षा जागा मिळतील,' असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय.
देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मंगळवारी (18 मे) भाजपची मराठा आरक्षणविषयक बैठक झाली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांना काँग्रेसचं 'कथित' टूल किट आणि राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यावर करत असलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आलाय. त्यावेळी त्यांनी मोदी यांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.
पाटील यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं.
राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, मराठा समाज रस्त्यावर उतरेल म्हणून लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याचं पाटील यांनी म्हटलंय.
TV9 मराठीने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
2. ग्रामीण भागातली बेरोजगारी दुप्पटीने वाढली- CMIE चा अहवाल
लॉकडाऊन आणि ग्रामीण भागात वाढलेला कोरोना संसर्ग याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला दिसतोय.
9 मेच्या आठवड्यामध्ये ग्रामीण भागातल्या बेरोजगारीचा दर 7.29 टक्के होता. 16मेच्या आठवड्यामध्ये बेरोजगारीचा हा दर वाढून 14.34 टक्के झाल्याचं सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)च्या पाहणीत आढळल्याचं वृत्त मिंटने दिलंय.

फोटो स्रोत, ANI
गेल्या 50 आठवड्यांतला हा सर्वात चढा बेरोजगारीचा दर आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात ग्रामीण बेरोजगारीचा दर इतका मोठा होता.
यासोबतच शहरी बेरोजगारीतही गेल्या आठवड्याच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढ झाली असून शहरी बेरोजगारीचा दर 14.71 टक्के झाला असल्याचं या पाहणीत आढळलंय.
3. पंतप्रधान मोदी करणार गुजरातची हवाई पाहणी
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (19 मे) गुजरातचा दौरा करणार आहेत.
या हवाई दौऱ्यामध्ये ते गुजरात आणि दीवमध्ये वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करतील.

फोटो स्रोत, Twitter
या हवाई पाहणीसाठी पंतप्रधान सकाळी साडेनऊ वाजता दिल्लीहून निघणार असल्याचं वृत्त झी 24 तासने दिलंय.
तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रात मोठं नुकसान झालंय. महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकलं. गुजरातच्या किनारपट्टी भागात ताशी 185 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
गुजरातमध्ये या चक्रीवादळाने 13 लोकांचा मृत्यू झालाय.
4. चक्रीवादळाचा फटका आंबा बागायतीला
तौक्ते चक्रीवादळाचा फटका आंबा बागायतीला बसलाय. चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमधल्या आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय.

फोटो स्रोत, Getty Images
पहिल्या हंगामात फारसं उत्पादन नसल्याने दुसऱ्या हंगामाकडून आंबा बागायतदारांना उत्पन्नाची अपेक्षा होती. पण वादळामुळे दुसऱ्या हंगामाच्या फळाचं नुकसान झालंय.
आंबा बागायतदारांचं जवळपास 100 कोटींचं नुकसान झाल्याचं वृत्त लोकसत्ताने दिलंय.
गेल्या वर्षी मोहोर लागण्याच्या काळात परतीच्या पावसामुळे मोहोर गळून पडला होता.
5. उजनीच्या पाण्यासंदर्भातला आदेश रद्द, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची घोषणा
उजनी जलाशयाच्या बिगरसिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारं सांडपाणी उजनीतून उचलून शेटफळगढे या नवीन प्रकल्पात टाकण्याचा निर्णय जलसंपदा खात्याने घेतला होता. इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचाही निर्णय झाला होता.

पण हा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलीय.
मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करुन काढण्यात आलेला आदेश रद्द करण्यात येत असल्याचा खुलासा खुद्द राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलाय.
महाराष्ट्र टाईम्सने याविषयीची बातमी दिलीय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








