कोरोना : 'मुंबई मॉडेल' आहे तरी काय, ज्याचं सुप्रीम कोर्टानंही केलं कौतुक?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोव्हिड-19 च्या त्सुनामीत ऑक्सिजन व्यवस्थापनात चांगलं काम केल्याने सुप्रीम कोर्टाने मुंबई महापालिकेच्या 'मुंबई मॉडेल'ची भरभरून स्तुती केली आहे.
एवढंच नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने 'दिल्ली आणि केंद्र सरकारला मुंबईने काय केलं हे पाहा' अशी सूचनाही केली होती.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशभर अगदी हाहा:कार उडाला आहे. पण मुंबईत परिस्थिती हाताबाहेर गेलेली पहायला मिळाली नाही.
देशभर कौतुक होत असलेलं हे मुंबई महापालिकेचं 'मुंबई मॉडेल' काय आहे? कोरोना व्यवस्थापन कसं करण्यात आलं? आपण जाणून घेऊया...
ऑक्सिजनचं 'मुंबई मॉडेल'
'मुंबई मॉडेल' समजून घेण्यासाठी आपल्याला 2020 मध्ये जावं लागेल. गेल्यावर्षी मे-जूनमध्ये कोरोनासंसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला. रुग्णालयात ऑक्सिजनची मागणी अचानक वाढली.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू यांच्या खांद्यावर ऑक्सिजन व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली. ते म्हणतात, "रुग्णालयात ऑक्सिजन प्रणाली सामान्य ICU ला लागणारी होती. पण कोव्हिडमध्ये ऑक्सिजनची मागणी दुपटीने वाढल्याचं लक्षात आलं."

पालिकेने शहरातील पालिका आणि जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 13 हजार लीटर ऑक्सिजन साठवण्याची क्षमता असलेले प्लांट उभारले.
पी वेलारसू सांगतात, "21 ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आले. यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यात अडचण आली नाही. ऑक्सिजन टॅंकर येण्यास उशीर झाला तरी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळाला."
2021 च्या मार्चमध्ये मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येसोबत ऑक्सिजनची मागणी वाढली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 200 ते 210 मेट्रिक टन असलेली ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेत 280 मेट्रीक टनापर्यंत पोहोचली. ऑक्सिजन टॅंकचा शहरातील रुग्णालयांना खूप फायदा झाला.
मुंबईची ऑक्सिजन टीम
पहिल्या लाटेच्या अनुभवातून मुंबई महापालिका शिकली होती. ऑक्सिजन खूप महत्त्वाचा होता. ऑक्सिजनची मागणी, गरज, वाहतूक, ऑक्सिजन वेळेत पोहोचेल याचं व्यवस्थापन करण्यासाठी 'ऑक्सिजन टीम' बनवण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त पुढे सांगतात, "ऑक्सिजनच्या योग्य व्यवस्थापनासाठी टीम बनवली. अन्न व औषध विभाग, वॉर्ड अधिकारी आणि प्राणवायू उत्पादकांसोबत समन्वयासाठी सहा अधिकारी नियुक्त केले. रुग्णालयात ऑक्सिजनवर लक्ष ठेवण्यासाठी एक व्यक्ती नेमला. वॉर्डमध्ये दोन अधिकाऱ्यांवर ऑक्सिजन व्यवस्थापनाचं काम सोपवलं."

फोटो स्रोत, Getty Images
बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या ऑक्सिजन टॅंकरची क्षणाक्षणाची माहिती घेतली. टॅंकर किती वाजता येणार, कुठे जाणार, कोणत्या रुग्णालयात यावर लक्ष ठेवलं.
"एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णालयांकडून ऑक्सिजनसाठी आपात्कालीन संदेश मिळत होते. पुरवठा योग्य आणि वेळेत होणं गरजेचं होतं. टॅंकर उशिरा येणं आम्हाला परवडणारं नव्हतं," असं पी वेलारसू सांगतात.
168 कोरोना रुग्णांना इतर रुग्णालयात हलवलं
पालिकेच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. दिवस होता 17 एप्रिल. सहा रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा कमी होत चालला होता. मोठ्या मागणीमुळे ऑक्सिजन मिळत नव्हता. पालिकेने 168 कोरोनारुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या जम्बो सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला.
"रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा पुरेसा झाला नाही. याचं कारण, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्यांना प्राणवायू मिळाला नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली होती. पण, दोन दिवसात ही अडचण दूर करण्यात आली," असं पी. वेलारसू म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
पालिका अधिकारी माहिती देतात, ऑक्सिजन नर्सच्या माध्यमातून रुग्णालयातील ऑक्सिजनवर लक्ष ठेवलं. टास्क फोर्सच्या सूचनांनुसार, ऑक्सिजनचा फ्लो 93 ते 95 मध्ये ठेवला.
मुंबईत सहा ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन गाड्या उभ्या केल्या
ऑक्सिजनची मागणी अचानक वाढल्याने लहान रुग्णालयांमध्ये तुटवडा जाणवू लागला होता. मुंबई महापालिकेने शहरात सहा ठिकाणी 200 ऑक्सिजन सिलेंडर सिलेंडर घेऊन गाड्या उभ्या केल्या. रुग्णालयाकडून ऑक्सिजनची मागणी आली की, तात्काळ गाडी त्या रुग्णालयात रवाना केली जायची.
पी. वेलारसू सांगतात, "आधी आम्ही दिवसातून एकदा ऑक्सिजन पुरवठा करत होतो. आता, 13-14 तासांनी पुरवठा करावा लागतोय. दिवसात दोन वेळा पुरवठा करावा लागतोय."
ऑक्सिजनच्या वापराबाबत डॉक्टरांना ट्रेनिंग देण्यात आलं. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर मर्यादेत राहिला आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासला नाही, असं पालिका अधिकारी सांगतात.
'ऑक्सिजन प्लांट उभारणार'
मुंबईत ऑक्सिजन तयार करणारा प्लांट नाहीये. त्यामुळे मुंबईला अजूनही बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतोय. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयार असलेल्या मुंबई महापालिकेने ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचा निर्णय घेतलाय.
अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू म्हणतात, "मुंबईतील रुग्णालयांमध्ये आणि जंबो कोव्हिड रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारले जाणार आहेत. येत्या दोन महिन्यात याचं काम पूर्ण होईल."

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतील 12 रुग्णालयांमध्ये 16 ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट पालिका उभे करणार आहे. याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता 45 मेट्रिक टन असणार आहे.
'बेड्सची उपलब्धता वाढवली'
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आणि ICU बेड्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. 13 एप्रिलला शहरात फक्त 15 व्हेंटिलेटर आणि 51 आयसीयू बेड्स शिल्लक होते.
अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सांगतात, "मार्चच्या शेवटी आयसीयूची संख्या कमी होती. फक्त 1200 आयसीयू बेड्स होते. आती ही संख्या 3000 झालीय."
100 व्हेंटिलेटर घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालीये. अजून 100 घेण्याची तयारी असल्याची माहिती पालिका अधिकारी देतात.
सोशल मीडियाद्वारे लोक बेड्ससाठी मदत मागत होते. पालिकेचा कोव्हिड डॅशबोर्ड सतत अपडेट होत होता. लोकांना माहिती मिळत होती. मुंबईच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे कोव्हिड डॅशबोर्डची जबाबदारी आहे.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सांगतात, "डिसेंबरमध्ये रुग्णसंख्या कमी झाली तरी, बेड्सची संख्या सतत वाढवण्यात आली. जम्बो सेंटरचे बेड्स सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे एप्रिलमध्ये पिक आल्यानंतरही बेड्स पुरेसे होते."
सद्यस्थितीत मुंबईत 30 हजारपेक्षा जास्त बेड्स आहेत. यातील 12 हजार बेड्स ऑक्सिजन पुरवठा असलेले आहेत.
बेड्स देण्यासाठी तयार केली वॉररूम
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना बेड्स देण्यासाठी एकच कंट्रोलरूम होती. त्यामुळे खूप गोंधळ निर्माण झाला होता. कंट्रोलला फोन लागत नाही अशा तक्रारी सोशल मीडियावर पहायला मिळत होत्या.
दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. एक केंद्र पुरेस नव्हतं. त्यामुळे प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी वॉररूम तयार करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
"प्रत्येक वॉररूममध्ये दिवसाला 500 पेक्षा जास्त फोन येतात. लोक बेड्सची माहिती विचारतात, मदत मागतात. याचा फायदा असा झाला की रुग्णांना त्या-त्या भागात बेड्स मिळाले," असं काकणी पुढे म्हणतात.
प्रत्येक वॉर्डमध्ये कंट्रोलरूम तयार झाल्याने लोकांना फायदा झाला. लोकांना त्यांच्या परिसरातूनच मदत मिळू लागली होती. बेड मिळण्यासाठी उशीर लागत होता. पण बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली नाही.
औषधांचं व्यवस्थापन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिव्हिर, टोसिलोझुमॅब औषधांची मागणी अचानक वाढली. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिरसाठी नातेवाईकांची पायपीट सुरू झाली. राज्यभरात खूप गोंधळ उडालेला पहायला मिळाला.
रेमडेसिव्हिरच्या नियोजनाबाबत बोलताना सुरेश काकाणी पुढे सांगतात, "2 लाख रॅमडेसिव्हिरचं टेंडर नक्की करण्यात आलं. दर आठवड्याला किमान 50 हजार मिळतील असं नियोजन होतं. तेव्हा मागणी फक्त 15 ते 20 हजार होती. पण, अचानक अडचण भासू नये म्हणून आधीच घेऊन ठेवण्यात आलं."
धारावी मॉडेल
मुंबई महापालिकेच्या धारावी मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतूक केलं होतं. आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत पालिकेने कोरोना नियंत्रणात आणला होता.
होम आयसोलेशन शक्य नसल्याने पालिकेने संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलं.
आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेविकांच्या मदतीने धारावीतील 10 लाख लोकांचं डोअर-टू-डोअर सर्व्हेक्षण केलं. हे सर्व अजूनही सुरूच आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








