पंढरपूर निवडणूक: भारत भालकेंचा जीव घेणाऱ्या कोरोनाचा प्रचारात विसर का पडतोय?

पंढरपूर पोटनिवडणूक
    • Author, गणेश पोळ
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी एका मतदार संघात सध्या पोटनिवडणूक होतेय आणि त्याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ती म्हणजे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके तर भाजपचे समाधान आवताडे यांच्यात ही मुख्य लढत होतेय.

पण राज्यात सगळीकडं जमावबंदी आणि संचारबंदी आहे. एवढंच नव्हे तर कडक लॉकडाऊनचा पर्याय सुद्धा शोधला जातोय. पण राष्ट्रवादी आणि भाजपकडून याठिकाणी दिवसरात्र प्रचार केला जातोय. नक्की काय दडलंय या पोटनिवडणुकीत? पाहुयात...

प्रचारात कोरोनाची भीती नाही का?

राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पंढरपूर आणि मंगळवेढ्यात दोन दिवस ठाण मांडून बसले होते. त्यावेळी त्यांच्या समक्ष अनेक स्थानिक राजकीय नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. किंबहुना त्यासाठीच अजित पवार दोन दिवस मतदारसंघात थांबले होते, असं सांगितलं जातं.

पण संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे कडक निर्बंध लागू असताना पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व नियम धाब्यावर बसवले गेले.

पंढरपूर पोटनिवडणूक

फोटो स्रोत, Bhagirath Bhalke

फोटो कॅप्शन, पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी प्रचार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार

8 आणि 9 एप्रिलला अजित पवारांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्यात मोठ्या सभा घेतल्या. एकीकडे राज्यात कोरोनामुळे राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमांसाठी गर्दी जमली होती.

आदल्या दिवशी अजित पवारांनी (8 एप्रिल) याबाबत दिलगिरीही व्यक्त केली होती. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तीच परिस्थिती बघायला मिळाली.

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सरकारी नियमांना केराची टोपली दाखवली.

हीच परिस्थिती भाजपच्या समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेतही आढळली आहे. भाजपच्या प्रचारसभेत सहभागी झालेले रणजितसिंह मोहीते पाटील यांना तर कोरोनाची लागणही झालीये.

या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने बंद सभागृहात 50 तर खुल्या ठिकाणी 200 लोकांची परवानगी दिलीये. पण इथल्या प्रचारसभांना मोठी गर्दी होतेय, लोक मास्क घालत नाहीयेत, सॅनिटायझरची व्यवस्था नाहीये. सर्व पक्षांच्या प्रचारसभांत हेच चित्र आहे.

पंढरपूर पोटनिवडणूक

फोटो स्रोत, Ranjitsinh Mohite Patil

फोटो कॅप्शन, 7 एप्रिल राजी रणजितसिहं मोहिते पाटील यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्याआधी ते आवताडे यांचा प्रचार करत होते.

तर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पंढरपूर आणि मंगळवेढ्याचा दौरा करत आहेत.

कोरोनामुळे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. त्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येतेय, पण सध्या कोरोनाविषयीच्या नियमांचे याठिकाणी सर्रास उल्लंघन होतंय. राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असताना मग सरकारी नियम हे फक्त सामान्य माणासांच लागू होतात का? हा प्रश्न उभा राहतो.

आतापर्यंत पंढरपूरमध्ये प्रचारसभेत कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं 5 गुन्हे दाखल केल्याचं, निवडणूक अधिकारी भरत वाघमारे यांनी सांगितलंय.

"निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं आयोजकांनी पालन करणं आवश्यक आहे. ते पाळले गेले नाही तर निवडणूक आयोगाचे स्थानिक अधिकारी संबंधीत आयोजकांवर गुन्हे दाखल करत आहेत," असं वाघमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

भगीरथ भालके

फोटो स्रोत, Bhagirath Bhalke

फोटो कॅप्शन, निवडणुकीचा प्रचार करताना भगीरथ भालके.

आतापर्यंत प्रचारसभेत सामील झालेल्या 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्थानिक वृत्तपत्रांनी सांगितलं आहे.

या गोष्टीची दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी देखील घेतली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीचे निवडणूक अधिकारी रवीकिरण घोडके यांनी म्हटले आहे की "लोकशाहीत सर्व पक्षांना लोकांपर्यंत पोहोचण्याचा हक्क आहे. पण सध्याची कोरोना साथीची परिस्थिती पाहता कोरोना नियमांचं पालन करून प्रचार करणं अपेक्षित आहे."

अटीतटीची लढत

सध्याची महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती पाहता ही निवडणूक ठाकरे सरकार आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेचीही झाली आहे.

दुसरीकडे भाजपसाठी राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याची आणखी एक संधी असणार आहे. संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर शहर आणि याच तालुक्यातली 22 गावे मिळून हा मतदारसंघ बनतो.

तर पंढरपुरातली उरलेली गावे ही माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडली आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या राजकीय घडामोडींचा सरळ प्रभाव हा या तालुक्यांवर पडतो, असं समजलं जातं.

या पोटनिवडणुकीत अनेक उमेदवार उभे आहेत. पण मुख्य लढत ही आवताडे आणि भालके यांच्या होतेय. पण या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी चांगली कंबर कसल्याचं दिसतंय.

पंढरपूर पोटनिवडणूक

फोटो स्रोत, Samadhan Autade

सध्या महाविकास आघाडी सरकारवर चहूबाजूंनी आरोप-प्रत्यारोप होत आहेत. वाझे प्रकरणामुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. या पोटनिवडणुकीत पराभव झाला तर प्रतिमेला आणखी धक्का बसू शकतो, असं स्थानिक पत्रकारांचं निरीक्षण आहे.

"पंढरपूर हे महाराष्ट्रालं मोठं तीर्थक्षेत्र आहे. नमामी गंगेच्या धर्तीवर इथं चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेचं कामाचा मोठा प्रकल्प आहे. इथं मोठी बाजारपेठ आहे. अशा ठिकणी आपला आपला आमदार असावा असं प्रत्येक पक्षाला वाटतं. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे," असं पंढरपूरस्थित दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक संजय पाठक सांगतात.

"महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र आल्यापासून भाजपचा राज्यात कुठंही विजय झाला नाही," असं म्हणत जयंत पाटील ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर केवळ ग्रामपंचायतीच्या निवडणुका मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायती जिकंल्याचा असा दावा केला आहे.

तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडीला टार्गेट केलं आहे. "महाराष्ट्रात राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय. हे महाविकास आघाडी सरकार नसून ते महावसुली सरकार आहे," असा आरोप पाटील यांनी पंढरपूरच्या सभेत केला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)