कोरोना व्हायरस: महाराष्ट्रात 'रेमडेसिवीर' चा तुटवडा का जाणवतो आहे?

पुण्यात रेमडेसिव्हिसाठी लागलेली रांग

फोटो स्रोत, Getty Images / Hindustan Times

फोटो कॅप्शन, पुण्यात रेमडेसिवीरसाठी लागलेली रांग
    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं. कोरोना रुग्णांची संख्या ही शेकडोंवरून हजारांवर आणि आता लाखांमध्ये पोहचली आहे.

पुन्हा रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड, व्हेंटिलेटरर्स, ऑक्सिजनची कमतरता जाणवते आहे. या कमतरतेबरोबरचं 'रेमडेसिवीर' या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवतोय.

राज्य सरकारच्या अंदाजानुसार सध्या राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे साधारण रोज 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरू आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर एप्रिलअखेर दिवसाला दीड लाख इंजेक्शन्सची आवश्यकता भासू शकते.

त्या अनुषंगाने या इंजेक्शनचं उत्पादन कमी पडत असल्याचं चित्र आहे. हे इंजेक्शन का दिलं जातं? याचं उत्पादन का कमी पडतंय? रेमडेसिवीरचा काळा बाजार कसा केला जातोय? या इंजेक्शनअभावी लोकांची स्थिती काय होत आहेत? याचा हा रिपोर्ट..

काय आहे रेमडेसिवीर?

रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर प्रभावी मानलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोव्हिड-19 रुग्णांवरचा प्रभावी उपाय असल्याचं म्हणत याची शिफारस केली होती.

30 जून 2020 पासून हे इंजेक्शन महाराष्ट्रात वापरायला परवानगी देण्यात आली. सिप्ला (मुंबई), हेट्रो हेल्थकेअर (हैद्राबाद), ज्युबीलियंट लाईफसायंन्सेस (दिल्ली), इलिया लेबोरेटरीज (अर्जेंटीना), डॉ. रेड्डीज (हैद्राबाद), झायडस् कॅडिला (अहमदाबाद) या सहा कंपन्यांची रेमडेसिवीर इंजेक्शन्स महाराष्ट्रात वापरली जात आहेत.

कोरोना रुग्णांवर याचा प्रभावीपण परिणाम होत असल्याने अधिक गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णाला हे इंजेक्शन दिलं जातं.

जे. जे. हॉस्पिटलचे औषधवैद्यक शास्त्राचे पथक प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड सांगतात, "कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसाला होतो. HRCT ही चाचणी करून हा संसर्ग किती वाढला आहे हे तपासलं जातं. त्याचा स्कोअर असतो. 25 पैकी 5 पर्यंतचा स्कोअर हा गंभीर मानला जात नाही. पण 6 च्या पुढचा स्कोअर आला म्हणजे संसर्ग जास्त आहे. अधिक संसर्ग असणाऱ्या या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जातं. यामध्ये वयाची अट नाही. ज्यांना संसर्ग अधिक त्यांना हे इंजेक्शन दिलं जातं. गरोदर महिला आणि बाळाला अंगावरचं दूध पाजणाऱ्या मातांना मात्र हे दिलं जात नाही."

तुटवड्याची कारणं कोणती?

सध्या 6 कंपन्यांकडून 'रेमडेसिवीर' इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. त्यात अधिकचा पुरवठा करणाऱ्या 4 कंपन्या आहेत.

या इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल आयात करावा लागतो. तो भारतात उपलब्ध नाही. त्यामुळे कच्च्या मालाच्या आयातीपासून ते उत्पादनाची प्रक्रिया मोठी आहे.

महाराष्ट्र नोंदणीकृत औषध विक्रेते संघटनेचे ('एमआरपीएस') जिल्हा संघटक सुशील माळी सांगतात, "गेल्या अनेक दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांकडून पुरवठा होत नाहीये. मला सरकारने रायगड जिल्ह्यासाठी कमी किमतीत रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी नियुक्त केलंय. पण माझ्याकडे इंजेक्शनचा पुरवठाच होत नाहीये. जिथे 500 इंजेक्शनची मागणी आहे तिथे दोन दिवसाला 60-70 इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. काही कंपन्या या खासगी रुग्णालयांना पुरवठा करत नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांकडून या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यामुळे काळा बाजार होतोय."

ते पुढे सांगतात, "हे इंजेक्शन 6 महिने साठवून ठेवता येतं. आता याची मर्यादा 12 महिन्यांपर्यंत वाढवली आहे. पण याआधी 6 महिन्यांची मर्यादा असल्यााने त्याचा साठा करता आला नाही."

कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या व्यक्तीला हे इंजेक्शन दिलं जातं. पण काही रुग्णालयात लक्षणं नसलेल्या किंवा गरज नसलेल्या रुग्णांनाही रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जात असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं आहे.

रेमडेसिवीर

फोटो स्रोत, Getty Images / ULRICH PERREY

यासंदर्भात राज्य सरकार काय करतंय? हे सांगताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतात, "हे इंजेक्शन तयार करणााऱ्या कंपन्यांनी वाढीव उत्पादन करायला सुरुवात केली आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन वाढीव उत्पादन यायला किमान 20 दिवस लागतील. त्यानंतर राज्यात रेमडेसिवीर' चा तुटवडा जाणवणार नाही. सध्या राज्यातली तुटवड्याची परिस्थिती लक्षात घेऊन कंपन्यांनी निर्यात साठा महाराष्ट्राला देण्याचं मान्य केलय. त्याचबरोबर कंपन्याच्या उत्पादनापैकी 70% पुरवठा हा महाराष्ट्राला केला जात आहे."

'40 हजारांची रेमडेसिवीर इंजेक्शन घेतली'

"माझ्या 74 वर्षांच्या आईला कोरोना संसर्ग झाला. फुफ्फुसाचा संसर्ग खूप जास्त होता. डॉक्टरांनी लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला..." नवी मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीने बीबीसी मराठीला सांगितलं.

पुढे ते सांगतात, "मी आईला डोंबिवलीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तेव्हा डॉक्टरांनी रेमडेसिवीर इंजेक्शन सुरू केलं. पहिल्या दिवशी इंजेक्शन मिळालं पण दुसर्‍या दिवशी हॉस्पिटलने आम्हालाच इंजेक्शन आणण्यास सांगितलं. तेव्हा मी अनेक ठिकाणी फिरलो. आईची तब्येत नाजूक होती. मला एका ठिकाणी 8 हजाराला एक रेमडेसिवीर मिळेल असं कळलं. काळा बाजार असला तरी आईची तब्येत मला महत्त्वाची होती, म्हणून मी 8 हजाराला एक अशी पाच रेमडेसिवीर इंजेक्शन 40 हजारांना विकत घेतली आणि आईवरचे उपचार पूर्ण केले."

पुण्यात राहणाऱ्या गृहस्थांची कहाणीही अशीच होती. त्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर त्यांच्या भावाची परिस्थिती सांगितली.

त्यांच्या 42 वर्षांच्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 'HRCT' चाचणीचा स्कोअर 25 पैकी 12 होता. डॉक्टरांनी त्यांना रेमडेसिवीरची 6 इंजेक्शनं देण्याची गरज असल्याचं सांगितलं.

"मी पुण्यातली सर्व नामांकित हॉस्पिटल्स पालथी घातली. मला कुठेच रेमडेसिवीर मिळालं नाही. पूना हॉस्पिटलमध्ये मी इंजेक्शनसाठी गेलो. तिथे माझ्यासारख्याच 150-200 लोकांची रांग लागली होती. एकीकडे आरोग्य मंत्री राजेश टोपे सांगतात 1400 रुपयांच्यावर हे इंजेक्शन विकायचं नाही. मला पूना हॉस्पिटलमध्ये 1,865 रूपयांना दोन इंजेक्शनस् मिळाली. त्यानंतर मी 2200 आणि 3000 या भावात एका केमिस्टकडून इंजेक्शनस विकत घेतली."

काळा बाजार रोखण्यासाठी प्रयत्न?

राज्याच्या आरोग्य विभागाकडून रेमडेसिवीर इंजेक्शन हे 1100 ते 1400 रुपयांपर्यंत विकलं जावं असं सांगण्यात येतंय. पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही.

एक इंजेक्शन काळ्या बाजारात 4000 ते 8000 पर्यंत मिळतंय. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला काळा बाजार थांबवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने धाड सत्रं सुरू केलं आहे. रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोणाही रुग्णास मिळत नसल्यास किंवा काळा बाजार होत असल्यास संबंधित जिल्हा प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे.

काळा बाजार करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)