पश्चिम बंगाल निवडणूक : नंदिग्राममध्ये ममता-शुभेंदू संग्राम, मतदानादरम्यान हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, नंदीग्रामहून

नंदिग्राममध्ये सकाळी-सकाळी साडेसात वाजता 19 वर्षांची रणिता अगस्ती बूथ नंबर 76 वर मतदान करण्यासाठी पोहोचली. रणिता दुसऱ्यांदाच मतदान करत आहे. मतदान केल्यानंतर रणिता म्हणाली, नंदिग्राममध्ये दादा जिंकतील. दादा म्हणजे शुभेंदू अधिकारी. रणिताच्या मते ममता बॅनर्जी या मुस्लीम तुष्टीकरण करतात.

नंदिग्रामच्या निवडणुकीत सध्या धार्मिक ध्रुवीकरण होताना दिसत आहे. शुभेंदू अधिकारी संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांचा उल्लेख बेगम ममता असाच करत होते. याला प्रत्युत्तर म्हणून ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू यांना मीर जाफर संबोधलं. मीर जाफर म्हणजेच धोकेबाज.

दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांना पाहताच जय श्रीरामची घोषणा देणं हासुद्धा भाजपच्या राजकारणाचा भाग होता. या लढाईत दोन पक्ष मात्र गायब होते. ते म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस. त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांतच थेट लढत दिसून आली.

ममता बेगम, मीर जाफर आणि जय श्रीराम या घोषणांच्या अवतीभोवती केवळ नंदीग्रामच नव्हे तर संपूर्ण पश्चिम बंगालची निवडणूक होताना दिसत आहे. नंदिग्राममध्ये तर धार्मिक ध्रुवीकरण स्पष्टपणे दिसून येतं.

ममता बॅनर्जी यांना बेगम संबोधणं योग्य आहे का, असा प्रश्न रणिताला विचारला गेला. तेव्हा तिने म्हटलं, "यात चुकीचं काय आहे? ममता नमाज पढतात. अल्पसंख्याकांच्या मतांचं राजकारण ममता बॅनर्जींनीच सुरू केलं."

रणिता यांच्या बाजूला उभ्या असलेल्या प्रतिमा जाना सांगतात, "ममता यांना बेगमच म्हटलं पाहिजे. ममता बॅनर्जी हिंदूंचा विचार करत नाहीत. त्या फक्त मुस्लिमांना साथ देतात, हे मी टीव्हीवर पाहिलं आहे."

ममतांचे समर्थक

मुस्लिमबहुल परिसरात मात्र ममता बॅनर्जी यांच्याबद्दल एकजुट दिसून आली. शम्साबाद परिसरात बूथ क्रमांक 107 मध्ये मतदान करून परतणाऱ्या रबिया खातून यांनी म्हटलं, "दीदी आहेत. त्यांनी खूप काम केलं आहे. त्या खूप चांगल्या आहेत. आम्हाला घर, अन्न, रोजगार सगळं दिलं. शुभेंदू यांनीच दीदींना धोका दिला."

त्यांच्यासोबतच उभ्या असलेल्या शरीफा खातून यांना आम्ही एक प्रश्न विचारला. दीदींना बेगम म्हणतात, हे योग्य की अयोग्य. याचं उत्तर देताना खातून म्हणाल्या, "आम्ही तर मुस्लीम आहोत. आम्हाला का वाईट वाटेल? आम्हाला चांगलंच वाटतं. बेगम म्हणण्यात काय चुकीचं आहे?"

नंदिग्रामच्या बाजारपेठेत एका चहा-समोशाच्या दुकानात एका तरुणाचा गाण्याचा आवाज आला. दुकानात काही तरूण बसले होते. त्यातले शब्यसाची मित्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना - 'नमस्ते सदा वत्सले' गात होते. हे गाणं म्हणण्याचं खास कारण विचारल्यानंतर ते म्हणाले, "ही प्रार्थना कधीही म्हणू शकतो. परिवर्तन होणार आहे, त्यामुळे प्रार्थना आणखी दुमदुमणार आहे." मित्रा यांनीही ममता यांना बेगम म्हणण्याची पाठराखण केली.

हिंदू-मुस्लिम विभाजन

नंदिग्राममध्ये दोन मजबूत उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. या दोन्ही उमेदवारांना आव्हान देणाऱ्या माकपच्या मीनाक्षी मुखर्जी यांच्याशी बीबीसीने बातचीत केली.

इथल्या मतदारांचं धर्माच्या नावे विभाजन झाल्याचं मुखर्जी यांनी सांगितलं. त्या म्हणतात, "मतं मिळवण्यासाठी धर्माचा वापर करण्यात आला आहे. लोकांमध्ये दोन गट पडले आहेत. याचा फायदा भाजपला झाला तरी नंदिग्रामच्या जनतेला होणार नाही. दहा वर्षांत पहिल्यांदा नंदिग्रामच्या जनतेने मनापासून मतदान केलं. आधी लोक भीतीमुळे मतदान करूही शकत नव्हते.

मीनाक्षी यांच्या मते, "ममता बॅनर्जी या चिडलेल्या आहेत. त्या सोनिया गांधी यांना पत्र लिहितात. मतदान केंद्रावर राग व्यक्त करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सगळं काही आलबेल नाही, हे कळून येतं."

ममता बॅनर्जी अडचणीत?

नंदिग्राममध्ये धार्मिक मुद्द्यावर मतदारांचं विभाजन झाल्याची बाब प्रियंकर डे हेसुद्धा मान्य करतात. प्रियंकर हे पश्चिम बंगाल निवडणूक प्रचारावर संशोधन करत असलेल्या कोलकाता रिसर्च ग्रूपचे सदस्य आहेत.

ते सांगतात, "मुस्लिमांचं मत एकतर्फी ममता बॅनर्जी यांनाच मिळालं. हिंदू मतांचं कितपत ध्रुवीकरण झालं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 70 टक्के हिंदूंची मतं भाजपला मिळाली तर ममता बॅनर्जी यांचा पराभव टाळता येणार नाही."

प्रियंकर यांच्या मते, "इंडियन सेक्युलर फ्रंटच्या अब्बास सिद्दीकी यांच्यामुळे ममता बॅनर्जी यांचं नुकसान होऊ शकतं. मुस्लिम नागरिक भाजपला रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांना मतदान करताना दिसले. पण नेमकी परिस्थिती निकालाच्या वेळीच कळू शकेल.

बसुमती या नंदिग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्या घरासमोर गेल्या आठ वर्षांपासून चहाची टपरी चालवतात. "भाजपची हवा असली तर दीदी कमी नाहीत, माझ्यासाठी तर दीदी याच चांगल्या आहेत," असं बसुमती सांगतात.

मोदी विरुद्ध ममता

गुरुवारी मतदानादरम्यान ममता बॅनर्जी एका मतदान केंद्रावर सुमारे दोन तास ठाण मांडून होत्या. याच बूथच्या बाहेर जय श्रीरामची घोषणा दिली जात होती.

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात ममता बॅनर्जी येथून बाहेर पडल्या. निघताना बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शाह आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आपण फक्त नंदिग्राम नव्हे तर लोकशाहीसाठी चिंताग्रस्त झाल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांच्या या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रतिक्रिया दिली.

दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात एका प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, "नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी पराभूत होणार हे तिथं काय झालं, ते पाहून समजू शकतं. ममता बॅनर्जी यांना जय श्रीराम घोषणेबद्दल समस्या आहे. ही गोष्ट सगळ्या बंगालला माहीत आहे. दीदींना माँ दुर्गाच्या विसर्जनाबद्दल समस्या आहे. आता त्यांना भगव्या पोशाखाबद्दलही समस्या आहे. घुसखोर लोक दीदींच्या जवळचे आहेत, हे मला माहीत आहे.

भाजप नेते आणि तारकेश्वर येथून विधानसभेचे उमेदवार असलेले स्वपन दासगुप्ता यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही पाहिलं जातं.

ममता बॅनर्जी यांना हिंदू-मुस्लीम राजकारणात अडकवून पराभूत करण्याचा भाजपचा विचार आहे का, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला.

याचं उत्तर देताना दासगुप्ता म्हणाले, "ममता बॅनर्जी यांनी हिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवलं. त्यांनी जय श्रीरामला विरोध प्रदर्शनाची घोषणा बनवलं आहे. पश्चिम बंगालमधील जय श्रीराम हे उत्तर प्रदेशाहून वेगळं आहे. इथं हा निषेधाचा नारा बनला आहे.

29 वर्षीय शकील हुसैन गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभेत आले होते. ही सभा कोलकात्याजवळ जयनगरमध्ये होती. रॅलीमध्ये लोकांशी चर्चा करताना शकील फक्त ऐकत होते. यावेळी उपस्थितांनी भाजपला पाठिंबा दर्शवला. तसंच केंद्र सरकार विकासासाठी जो निधी पाठवतं, ते तृणमूल काँग्रेसचे गुंडे हडप करतात, असं लोक सांगत होते.

ही चर्चा ऐकल्यानंतर शकील त्या गर्दीला उद्देशून म्हणाले, इथं कितीही गर्दी असली तरी दीदीच विजय मिळवणार. शकीलचं म्हणणं अर्धवट तोडत सनातन मंडल म्हणाले, दोन मेला कळेलच.

विजय कुणाचा?

ही चर्चा ऐकून आम्ही शकील हुसैन यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या हातात त्यांचा दोन वर्षांचा मुलगाही होता. इतकी गर्दी असूनही ममता बॅनर्जी जिंकतील, असं म्हणण्याचं कारण आम्ही त्यांना विचारलं.

शकील म्हणाले, "निवडणुकीला हिंदू-मुस्लीम करून टाकलं आहे. आम्ही मुस्लीम मोकळ्या मनाने मोदींच्या सभेत येतो. पण इथं जय श्रीरामची घोषणा दिली जाते.

शकील यांना जय श्रीराम घोषणेबद्दल काय समस्या आहे, हेसुद्धा आम्ही त्यांना विचारलं.

ते म्हणतात. मला काहीच समस्या नाही. पण ही घोषणा ऐकल्यानंतर ही सभा फक्त हिंदूंसाठी आहे, असं आम्हाला वाटतं. पंतप्रधान मोदी फक्त त्यांच्यासाठी आले आहेत. त्यामुळे मुस्लिमांना वेगळं पडल्यासारखं वाटू लागतं. दीदी चांगल्या आहेत. पण त्यांचे नेते चांगले नाहीत. भ्रष्टाचारही आहे. त्यांचे लोक गुंडगिरी करतात. पण तरीसुद्धा भाजप आम्हाला योग्य वाटत नाही."

कोलकाता युनिव्हर्सिटीमध्ये राज्यशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक हिमाद्री चॅटर्जी म्हणतात, "तृणमूल काँग्रेस नंदिग्राम आणि सिंगूर आंदोलनानंतर सत्तेत आला होता. पण त्यांचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. धर्माच्या नावावर ध्रुवीकरण होण्याचं कारण बेरोजगारी आहे. औद्योगिक धोरणांबाबत ममता बॅनर्जींनी जी भूमिका घेतली होती, ती आताच्या काळात लागू होत नाही. तृणमूल काँग्रेस आता कराराने शेती करायला देतो. इथं फक्त धर्म हा मुद्दा नाही. तर बेरोजगारीचीही समस्या आहे."

त्या पुढे सांगतात, "तृणमूल काँग्रेस ही निवडणूक इलेक्टोरल थिंक टँक (प्रशांत किशोर) यांच्या माध्यमातून लढवत आहे. त्यांचा जनतेशी असलेला संपर्क तुटला आहे. इलेक्टोरल थिंक टँक लोकशाहीची व्याख्या बदलतात. लोकप्रिय मतांना मॅनेज केलं जातं. हीच पद्धत भाजपने वापरली होती. पण ते ममता बॅनर्जींना करायचं असेल तर त्यांना त्याची पातळी उंचावावी लागेल.

ममता बॅनर्जी यांच्या एका महत्त्वाच्या रणनितीकाराने म्हटलं, आधी मुस्लीम ज्यांना मतदान करायचे, ते सत्तेत यायचे. पण आता हिंदू ज्यांना मतदान करतात, ते सत्तेत येतात. हे ममता बॅनर्जींनी ओळखलं पाहिजे. त्यांनी 30 टक्क्यांचं राजकारण करण्यापेक्षा 70 टक्क्यांच्या अवतीभोवती राजकारण करावं, असं ते म्हणाले, हे विशेष.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)