IPL 2021 : ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी, अशी आहे 5 महिन्यांची किमयागार सफर

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात, 23 वर्षीय ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार असणार आहे.
श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाला. दुखापत गंभीर असल्याने तो संपूर्ण हंगामात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघव्यवस्थापनाने ऋषभची निवड केली आहे.
गेल्या पाच महिन्यात ऋषभने बॅटिंग आणि कीपिंग अशा दोन्ही आघाड्या गाजवल्या आहेत. श्रेयस कर्णधार असताना ऋषभ उपकर्णधार होता. याआधी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ऋषभने दिल्लीचं कर्णधारपद भूषवलं आहे.
ऋषभ दिल्ली कॅपिटल्स संघाचा तेरावा कर्णधार असणार आहे. याआधी वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, जेम्स होप्स, महेला जयवर्धने, रॉस टेलर, डेव्हिड वॉर्नर, केव्हिन पीटरसन, जेपी ड्युमिनी, झहीर खान, करुण नायर, श्रेयस अय्यर यांनी दिल्लीचं कर्णधारपद भूषवलं आहे. आता 23व्या वर्षी ऋषभकडे नेतृत्वाची धुरा असणार आहे.
कर्णधारपदासाठी रवीचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, स्टीव्हन स्मिथ, शिखर धवन यांची नावं चर्चेत होती. अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. रवीचंद्रन अश्विनने दोन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचं कर्णधारपद भूषवलं होतं.

फोटो स्रोत, Robert Cianflone
शिखर धवनने सनरायझर्स हैदराबाद संघाचं कर्णधारपद सांभाळलं होतं. स्टीव्हन स्मिथ राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. त्याने ऑस्ट्रेलियाचंही कर्णधारपद भूषवलं आहे. मात्र वय आणि भविष्यकालीन योजनांचा विचार करून दिल्ली संघव्यवस्थापनाने ऋषभच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाला आतापर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने फायनलपर्यंत धडक मारली होती.
किमयागार हंगामाची सुरुवात
दुबईत झालेला आयपीएलचा तेरावा हंगाम 10 नोव्हेंबर रोजी संपला. ऋषभ पंतच्या बॅटिंगमध्ये सातत्य नाही, तो विकेट फेकतो, आश्वासक आहे पण मॅच जिंकून देत नाही, कीपिंगमध्ये चुका करतो अशी टीका होत होती.
आयपीएलचा चौदावा हंगाम 9 एप्रिलला सुरू होतो आहे. पाच महिन्यात ऋषभ पंतने आपल्या फिटनेसवर, बॅटिंगवर, कीपिंगवर प्रचंड मेहनत घेतली. कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघव्यवस्थापनाने दिलेला खेळाप्रती गंभीर होण्याचा सल्ला प्रमाण मानत ऋषभने या पाच महिन्यात आपल्या बॅटची जादू समस्त क्रिकेटविश्वाला दाखवली.
ऑस्ट्रेलियात भारतीय संघाच्या ऐतिहासिक मालिका विजयात ऋषभच्या दोन खेळींचं आणि उत्तम विकेटकीपिंगचं योगदान मोलाचं होतं.

फोटो स्रोत, Mark Brake
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट, ट्वेन्टी-20आणि वनडे मालिकेत ऋषभची बॅट सातत्याने तळपली. फिरकीला अनुकूल खेळपट्यांवर चोख विकेटकीपिंग करत ऋषभने या भूमिकेसाठी पुरेपूर तय्यार असल्याचं सिद्ध केलं.
आयपीएल २०२० स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत त्याचं नाव २२व्या स्थानी होतं. त्याने 14 मॅचमध्ये 343 रन्स केल्या. ऋषभला संपूर्ण स्पर्धेत फक्त एक अर्धशतक झळकावता आलं होतं.
महेंद्रसिंग धोनी निवृत्त झाल्यानंतर देशातला पहिल्या क्रमांकाचा विकेटकीपर बॅट्समन म्हणून ऋषभकडे पाहिलं जात होतं. कोरोना बाधित आयपीएलमध्ये ऋषभने रन्स केल्या मात्र मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आलं.
त्याच्या कीपिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. कॅच आणि स्टंपिंग या दोन्ही गोष्टीत त्याला सुधारणा करणं आवश्यक आहे हे स्पष्ट झालं.
महिनाभर राखीव खेळाडू
कोरोना नियमावलीमुळे भारतीय संघ दुबईतूनच ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला. कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली नाही. भारतीय संघव्यवस्थापनाने लोकेश राहुलकडे ओपनिंग आणि विकेटकीपिंगची जबाबदारी सोपवली. पर्याय म्हणून संजू सॅमसनला संघात घेण्यात आलं. त्याला अंतिम अकरातही खेळवण्यात आलं.
ऑस्ट्रेलियात झालेल्या तीन ट्वेन्टी-२० आणि तीन वनडेत ऋषभला खेळवण्यात आलं नाही. कोरोना नियमावली लक्षात घेऊन भारतीय संघव्यवस्थापनाने मोठ्या संघाची निवड केली होती. त्यामुळे ऋषभ तिथेच होता. मात्र त्याला वनडे आणि ट्वेन्टी-२० मिळून सहापैकी एकाही मॅचमध्ये खेळवण्यात आलं नाही. सव्वा महिना एवढ्या काळासाठी तो राखीव खेळाडू राहिला.

फोटो स्रोत, Ryan Pierse
ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली टेस्ट डे-नाईट होती. भारतीय संघाने 244 रन्स केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाचा डाव 191रन्समध्येच आटोपला आणि भारतीय संघाला आघाडी मिळाली. या आघाडीच्या बळावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियासमोर मोठं लक्ष्य ठेवणार अशी चिन्हं होती. मात्र दुसऱ्या डावात भलतंच घडलं.
ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज निष्प्रभ ठरले. भारतीय संघाचा दुसरा डाव 36 रन्समध्ये आटोपला आणि नामुष्की ओढवली. भारतीय संघासाठी ही नीचांकी धावसंख्या आहे. यामुळे संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. या टेस्टसाठी भारतीय संघाने अनुभवी विकेटकीपर बॅट्समन वृद्धिमान साहाला पसंती दिली होती.
या टेस्टमध्ये मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला. विराट कोहली पॅटर्निटी लिव्हसाठी मायदेशी परतणार होता. पहिल्याच टेस्टमध्ये धुव्वा उडल्याने मालिकेत काय होणार? याची चिंता होती. नियमित कर्णधार नाही, प्रमुख बॉलर दुखापतग्रस्त अशी स्थिती होती.
अखेर संधी, छोटी पण आत्मविश्वासपूर्ण खेळी
मेलबर्न कसोटीत भारतीय संघाने चार बदल केले. यानुसार साहाऐवजी ऋषभला संधी मिळाली. या टेस्टमध्ये ऋषभने पहिल्या डावात 29 रन्सची छोटेखानी खेळी केली. मात्र ऋषभच्या आक्रमक पवित्र्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणेला खेळपट्टीवर स्थिरावायला मदत झाली. ऋषभ बाद झाला तोपर्यंत अजिंक्यने सूत्रं आपल्या हाती घेतली होती.

फोटो स्रोत, Daniel Pockett - CA
दुसऱ्या डावात ऋषभला बॅटिंगला यावंच लागलं नाही. या टेस्टमध्ये ऋषभने 4 कॅचही टिपले. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स, नॅथन लॉयन या जगातल्या सर्वोत्तम मध्ये गणना होणाऱ्या आक्रमणासमोर केलेल्या 29 रन्सच्या खेळीने ऋषभला आत्मविश्वास मिळवून दिला.
गड आला पण...
सिडनी टेस्टमध्ये पहिल्या डावात ऋषभने परिस्थितीला साजेशी अशी 67 बॉलमध्ये 36 रन्सची संयमी खेळी केली. मात्र खरी कमाल दुसऱ्या डावात घडली. भारतीय संघाला चौथ्या डावात जिंकण्यासाठी 407 रन्सचं लक्ष्य मिळालं. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणासमोर भारतीय बॅट्समन टिकाव धरतील का अशी परिस्थिती होती.

फोटो स्रोत, Matt King - CA
भारताच्या सगळ्या बॅट्समननी शानदार खेळी करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. चौथ्या दिवशी आव्हानात्मक लक्ष, जिवंत खेळपट्टी असं असताना ऋषभने 97 रन्सची वादळी खेळी केली. त्याने या डावात 12 चौकार आणि 3 षटकार लगावले. ऋषभच्या आक्रमणासमोर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू निरुत्तर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अवघ्या तीन रन्सने त्याचं शतक हुकलं. तो बाद झाल्यानंतर जिंकण्यापेक्षा कसोटी वाचवणं हेच प्राधान्य झालं. हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन यांनी दुखापतींनी खचून न जाता चिवटपणे झुंज देत टेस्ट अनिर्णित राखली.
ऐतिहासिक जिगरबाज खेळी
सिडनीत संघाला जिंकून देण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या ऋषभने ब्रिस्बेन टेस्टमध्ये नाबाद 89 रन्सची खेळी साकारत भारतीय संघाला थरारक आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला. चौथ्या डावात भारतीय संघाला जिंकण्यासाठी 328रन्सचं लक्ष्य मिळालं होतं. शुभमन गिल (91) चेतेश्वर पुजारा (56) यांनी रचलेल्या पायावर ऋषभने कळस चढवला.

फोटो स्रोत, Chris Hyde - CA
ऋषभने 9 चौकार आणि 1षटकारासह अद्भुत खेळी साकारली. अशक्यप्राय वाटणारा विजय ऋषभने प्रत्यक्षात आणला. ऋषभला या जिगरबाज खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. दुखापतींमुळे बहुतांश प्रमुख खेळाडू या मॅचमध्ये खेळू शकले नाहीत. ऋषभने भागीदारी करताना चौकार-षटकार आणि एकेरी-दुहेरी रन्सची सुरेख सांगड घातली. टेस्ट क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी साकारलेल्या सर्वोत्तम खेळींमध्ये या खेळीची गणना केली गेली.
चेन्नईत सुपर किंग
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून मायदेशी परतलेल्या ऋषभने इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई इथे झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये 88 बॉलमध्ये 9चौकार आणि 5षटकारांसह 91 रन्सची तडाखेबंद खेळी केली. भारतीय संघाला या मॅचमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु ऋषभने केलेलं आक्रमण इंग्लंड संघातील अनेकांना अवाक करणारं होतं. घरच्या मैदानावर रवीचंद्रन अश्विन, शाहबाझ नदीम, वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूंसमोर विकेटकीपिंग करणं आव्हानात्मक होतं. ऋषभने या टेस्टमध्ये दोन कॅचसह एक स्टंपिंग केलं.

फोटो स्रोत, Stu Forster
चेन्नईत झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्येही ऋषभने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवत नाबाद 58 रन्सची खेळी केली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळू शकली नाही. या टेस्टमध्येही ऋषभने शानदार विकेटकीपिंगचं प्रदर्शन करताना दोन कॅच आणि दोन स्टंपिंग केली.
नव्या स्टेडियमवर वादळी शतक
अहमदाबाद इथे झालेली तिसरी टेस्ट झटपट संपली. या टेस्टमध्ये सगळ्याच भारतीय बॅट्समनना रन्ससाठी संघर्ष करावा लागला. या टेस्टमध्ये बॅटिंगमध्ये कमाल दाखवता आली नसली तरी ऋषभने दोन कॅच आणि शिस्तबद्ध कीपिंग करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

फोटो स्रोत, Surjeet Yadav
चौथ्या आणि मालिकेतल्या शेवटच्या कसोटीत ऋषभने कळसाध्याय गाठला. या मॅचमध्ये त्याने 118 बॉलमध्ये 13चौकार आणि 2 षटकारांसह 101 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. ऋषभच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने आघाडी मिळवली जी विजयात निर्णायक ठरली. या मॅचमध्ये ऋषभने दोन स्टंपिंग आणि दोन कॅच टिपत स्पिनर्सच्या विकेट्समध्ये मोलाचं योगदान दिलं.
जेम्स अँडरसनला रिव्हर्स सिक्स
कसोटी मालिकेत सगळ्यात चर्चित क्षण राहिला तो म्हणजे ऋषभने जेम्स अँडरनसला मारलेला रिव्हर्स सिक्स. नव्या कोऱ्या लाल बॉलवर, जेम्स अँडरसन सारख्या अनुभवी बॉलरला रिव्हर्स स्कूप षटकार मारण्याचा पराक्रम ऋषभने केला. या हल्ल्याने अँडरसन हतबल झाल्याचं दिसून आलं.
ट्वेन्टी-20चा तडका आणि आर्चरला अफलातून सिक्स
अहमदाबाद इथे झालेल्या पाच मॅचच्या मालिकेसाठी ऋषभला संधी देण्यात आली. पहिल्या सामन्यात 23 बॉल 21, दुसऱ्या मॅचमध्ये 13 मॅचमध्ये 26, तिसऱ्या मॅचमध्ये 20बॉलमध्ये 25, चौथ्या मॅचमध्ये 23 बॉलमध्ये 30 अशा उपयुक्त खेळी साकारल्या.

फोटो स्रोत, Surjeet Yadav
या मालिकेदरम्यान ऋषभने जोफ्रा आर्चरने लगावलेल्या षटकाराची सगळीकडे प्रचंड चर्चा झाली. .. ट्वेन्टी-20 लढतीत, भारतीय संघाची अवस्था 8/2 अशी होती. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋषभने लेगस्टंपच्या बाहेरुन रिव्हर्स स्कूप करत विकेटकीपरच्या डोक्यावरून षटकार लगावला. प्रचंड वेगाने अचूकतेसह बॉलिंग करणं ही आर्चरची ओळख आहे. ऋषभच्या फटक्याने आर्चरही चक्रावून गेल्याचं पाहायला मिळालं.
वनडेतही दणका
पुण्यातल्या गहुंजे इथे झालेल्या पहिल्या वनडेत लोकेश राहुलनेच कीपिंगची जबाबदारी सांभाळली. दुसऱ्या मॅचमध्ये ऋषभला संधी मिळाली. या मॅचमध्ये ऋषभने 40बॉलमध्ये 77 रन्सची धुवाधार खेळी केली. या खेळीदरम्यान 3 चौकार आणि तब्बल 7 षटकारांची लयलूट केली.
तिसऱ्या वनडेतही ऋषभने फॉर्म कायम राखताना 62बॉलमध्ये 78 रन्सची अफलातून खेळी केली. या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








