संजय राऊत: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दरी वाढत चालली आहे का?

शरद पवार-उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images / ANI

'अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले.' असा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर अनिल देशमुख यांनी कारण नसताना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पंगा घेतला असंही राऊत यांनी लिहिलं. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दरी वाढत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तील 'रोखठोक' या आपल्या सदरात 'डॅमेज कंट्रोलचा फज्जा' हा लेख लिहिला. यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे.

तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'कोणीही या सरकारमध्ये मिठाचा खडा टाकू नये,' अशी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.

अँटिलिया स्फोटक प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अटक आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप या सर्व घडामोडींमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांवर खापर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

या परिस्थितीत संजय राऊत यांनी आता जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर टीका केल्याने या दोन्ही पक्षातला तणाव चव्हाट्यावर आल्याचे दिसून येते. त्यामुळे दोन पक्षातला तणाव वाढतोय का? याचा परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होईल का? संजय राऊत यांनी आताच अशी जाहीरपणे टीका करण्यामागे काय कारण आहे? या सगळ्यापासून काँग्रेस अलिप्त का आहे? अशा सर्व प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.

संजय राऊत यांनी काय लिहिलं?

सामनातील 'डॅमेज कंट्रोलचा फज्जा' या रोखठोक सदरात संजय राऊत म्हणतात, "जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्याने अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. या पदाचा एक रुबाब आणि दहशत आहे. आर आर पाटील यांच्या कार्यपद्धतीची तुलना आजही केले जाते."

संजय राऊत

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, शिवसेना खासदार संजय राऊत

संशयाच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील व्यक्तीस काम करता येत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी थेट अनिल देशमुख यांच्या पदावर राहण्याबाबत प्रश्न उपस्थित केला.

'पोलीस खातं आधीच बदनाम आणि अशा गोष्टींमुळे संशय वाढतो,' असंही ते पुढे म्हणाले.

"अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्यांनी कमीत कमी बोलावे. सतत कॅमेऱ्यासमोर जाऊन चौकशीचे आदेश देणे बरे नाही. 'सौ सोनार की एक लोहार की' असं वर्तन गृहमंत्र्याचे असायला हवे." अशी कडवी टीका संजय राऊत यांनी केली.

'पोलीस खात्याचे सॅल्यूट केवळ घेण्यासाठी नसते तर कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून येतो हे विसरून कसे चालेल?' असा प्रश्नही राऊत यांनी केला.

'मिठाचा खडा टाकू नये'

संजय राऊत यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे रविवारी दिवसभर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा नव्हे तर संजय राऊत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा 'सामना' रंगला.

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter

सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, "महाविकास आघाडीत तीन पक्षांचे सरकार काम करत आहे. यात कोणाला मंत्री पदाची संधी द्यायची हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. पक्षाच्या नेत्यांचा अधिकार आहे. सरकार व्यवस्थित चालू असताना इतरांनी विशेषत: पक्षातील नेत्यांनी मिठाचा खडा टाकू नये."

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनिल देशमुख अपघाताने गृहमंत्री झाल्याचा दावा खोडून काढला.

ते म्हणाले, "अनिल देशमुख 25 वर्षांपासून म्हणजेच पाच टर्म आमदार आहेत. अठरा वर्ष मंत्री म्हणून कामाचा त्यांना अनुभव आहे. तेव्हा ते अपघाताने मंत्री झाले हे आम्ही मान्य करत नाही."

"पत्रकार टीका करत असतात. त्यातून सकारात्मक गोष्टी घेतल्या पाहिजेत. टीका होत राहिली तर चुका कमी होतात," असं म्हणत नवाब मलिक यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव असल्याच्या प्रश्नांना बगल दिली.

जितेंद्र आव्हाड

फोटो स्रोत, Getty Images

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांची टीका म्हणजे एका पत्रकाराचे स्वातंत्र्य आहे असं म्हटलंय.

"याचा अर्थ त्यांचा प्रत्येक शब्द खरा आहे असं नाही. आपल्याला जेवढं घ्यायचं आहे तेवढेच घ्यावे. अनेकदा माधव गडकरी, गोविंद तळवळकर अशा पत्रकारांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. याचा अर्थ ते त्यांचे शत्रू आहेत असा होत नाही. संपादक टीका करत असतात."

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांकडे बोट दाखवत आहेत का?

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर सुरुवातीला जेव्हा विरोधकांकडून आरोप करण्यात आले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली. उद्धव ठाकरे म्हणाले, "सचिन वाझे ओसामा बिन लादेन असल्याप्रमाणे विरोधक टीका करत आहेत."

या प्रतिक्रियेनंतर काही दिवसांतच सचिन वाझे यांना अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आली. यामुळे शिवसेनेवर प्रचंड टीका झाली.

अनिल देशमुख

फोटो स्रोत, Facebook/Anil Deshmukh

फोटो कॅप्शन, अनिल देशमुख

यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला आणि हे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांकडे वळलं.

यानंतरची महत्त्वाची घडामोड म्हणजे पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला.

पण या संपूर्ण प्रकरणात महाविकास आघाडीवर मोठे आरोप झाले आणि सरकारच्या प्रतिमेलाही धोका निर्माण झाला. तेव्हा हा दोष कोणाचा? सचिन वाझे हे एकेकाळी शिवसेनेत होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली म्हणून शिवसेनेचा की गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा?

या घडामोडींचे वृत्तांकन करत असताना बीबीसी मराठीच्या पत्रकारांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खाजगीत एकमेकांविषयी नाराजी व्यक्त करत असल्याचं दिसून आलं. हे प्रकरण शिवसेनेला सक्षमपणे हाताळता आले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नाराजी व्यक्त करत होते तर गृहखात्यावर अनिल देशमुख यांची पकड नाही म्हणून शिवसेना नाराज असल्याचं नेत्यांनी सांगितलं.

संजय राऊत

फोटो स्रोत, facebook

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहिलेला लेख हा सुद्धा याचेच एक उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण यात त्यांनी गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख कशापद्धतीने अकार्यक्षम ठरले हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "माझा पक्ष,माझी जबाबदारी असं धोरण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं आहे. म्हणजे सत्तेत एकत्र असले तरी केवळ आपल्या पक्षाची बाजू लावून धरायची असं चित्र कायम दिसून येते. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या चुकांना गृहमंत्री कसे जबाबदार आहे हे सांगण्याचा प्रयत्न या लेखातून झालेला दिसतो."

"याचा अर्थ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस केवळ आपआपल्या पक्षाच्या प्रतिमेचाच विचार करते हे दिसून येते पण म्हणून दोन्ही पक्षात यामुळे टोकाचा वाद आहे असंही नाही. संजय राऊत हे पत्रकार सुद्धा आहेत. यापूर्वीही त्यांनी उघडपणे अनेक नेत्यांवर टीका केली आहे. त्यामुळे यावरून महाविकास आघाडी सरकारला धोका आहे असं मला वाटत नाही," असंही अभय देशपांडे सांगतात.

पण संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत आणि सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे हे सुद्धा वास्तव आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी मांडलेली भूमिका ही शिवसेनेची आहे की लेखकाचे वैयक्तिक मत आहे? असा प्रश्न कायम राहतो.

परमबीर सिंह

ज्येष्ठ पत्रकार श्रुती गणपत्ये यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सरकार जेव्हा तीन पक्षांचे असते तेव्हा थोड्याफार कुरबुरी सतत सुरू असतात. पण यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव आहे असं सध्यातरी दिसत नाही. कारण तसे असते तर सचिन वाझे, परमबीर सिंह या अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये ते प्रकर्षाने दिसून आले असते. त्याचे पडसाद सरकारच्या भूमिकेवरही पडले असते. पण तसं काही झालं नाही."

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षात लोकशाही आहे त्यामुळे संजय राऊत यांच्यासारखा नेता जाहीरपणे सरकारमधील चुकांवर बोट ठेऊ शकतो असंही श्रुती गणपत्ये यांना वाटते.

शरद पवारांची खेळी?

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या खंडणीच्या आरोपांनंतर त्यांनी हे आरोप फेटाळले. पण याप्रकरणी अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली.

यावेळी शरद पवार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले. असं असलं तरी अनिल देशमुख यांनी गृहखातं सक्षमरित्या हाताळलं नाही अशी टीका होते.

अनिल देशमुख

अनिल देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाअंतर्गतही नाराजी असल्याचे कळते. नवाब मलिक यांनी संजय राऊत यांच्या या लेखावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "काही चुका झाल्या आहेत. भविष्यात त्या होणार नाहीत याची काळजी घेता येईल."

शरद पवार यांनी विरोधकांच्या मागणीनंतर अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला नसला तरी अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई कायमस्वरुपी टळली आहे असं आजही म्हणता येणार नाही.

संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका करणारा लेख आजच का प्रसिद्ध केला? ही वेळ महत्त्वाची का आहे?

या विषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे सांगतात, "संजय राऊत यांच्या लेखाचा मूळ गाभा हा अनिल देशमुख कसे अपयशी ठरले हा आहे. सरकारला पुरेसं डॅमेज कंट्रोल करता आलं नाही असंही ते म्हटले असले तरी अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी थेट आणि स्पष्ट टीका केली आहे. हे आपण समजून घ्यायला हवे."

ते पुढे सांगतात, "ही शरद पवार यांची स्टाईल आहे. विरोधक जेव्हा कारवाईची मागणी करतात तेव्हा आपल्या मंत्र्यावर कारवाई ते करत नाहीत. कारण यामुळे चूक मान्य केल्याचा संदेश जातो आणि विरोधकांच्या दबावाला बळी पडलो असाही अर्थ निघतो. त्यामुळे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कारवाई केली जाते. तेव्हा संजय राऊत यांच्या लेखाचा हा एक अर्थ असू शकतो."

काँग्रेस अलिप्त आहे का?

याप्रकरणात काँग्रेसने सुरुवातीपासूनच अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत वगळता इतर कोणत्याही नेत्याने किंवा मंत्र्याने या आरोपांमध्ये सरकारची बाजू सातत्याने मांडली नाही असंही जाणकार सांगतात.

नाना पटोले

फोटो स्रोत, Nana Patole/facebook

फोटो कॅप्शन, नाना पटोले

याउलट याप्रकरणी चौकशी व्हावी असं स्वतंत्र निवेदन काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं. त्यामुळे सरकारवर होणाऱ्या आरोपांचे शितोंडे आपल्यापर्यंत पोहचणार नाहीत आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाची बदनामी होणार नाही याची काळजी काँग्रेस नेत्यांनी घेतल्याचे दिसते.

राजकीय विश्लेषत अभय देशपांडे सांगतात, "तिन्ही पक्ष एकत्र सरकारमध्ये असले तरी ज्या पक्षाच्या मंत्र्यावर आरोप होतात तोच पक्ष समोर येऊन स्पष्टीकरण देताना दिसतो. माझा पक्ष माझी जबाबदारी हेच धोरण आतापर्यंत दिसले आहे. त्यामुळे याप्रकरणात काँग्रेसच्या कोणत्याही मंत्र्याचे नाव समोर आलेले नाही. त्यामुळे सचिन सावंत वगळता काँग्रेसचा कोणीही मोठा नेता याविषयी भूमिका मांडताना दिसला नाही."

त्यात संजय राऊत यांनी नुकतीच युपीएच्या अध्यक्ष पदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवलं आणि यावरून काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "आमचे आम्ही बघून घेऊ असं, बाहेरच्यांनी बोलू नये" असा टोलाही राऊतांना लगावला.

शरद पवार-अमित शहा भेट?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त बैठक झाल्याची बातमी दैनिक दिव्य भास्करने प्रकाशित केली होती.

'सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगण्यासाठी नसतात असं सूचक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं.' अमित शहा यांनी भेट झाल्याचं नाकारलं नाही त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले.

अमित शहा, शरद पवार, भाजप, राष्ट्रवादी

फोटो स्रोत, NurPhoto

फोटो कॅप्शन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अशी भेट झाल्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे. प्रवक्ते नवाब मलिक यांनी अशी कोणतीही भेट झाली नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघााडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांना साथीला घेत सरकार स्थापन केले होतं. मात्र अपेक्षित संख्याबळ सिद्ध करता न आल्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं होतं.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात भेट झालेली आहे. पवारांनी मोदी यांना बारामती इथे कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. दिल्लीत या दोघांची भेट झाली आहे. मात्र शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाल्याचं पहिल्यांदाच चर्चेत येतं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)