You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमित शहा: आसाममध्ये 'लँड जिहाद' रोखण्यासाठी कायदा करणार
लव्ह जिहाद वरून राजकीय वातावरण अनेकदा तापतं. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममध्ये प्रचारादरम्यान 'लँड जिहाद' असा नवा शब्दप्रयोग वापरला.
शुक्रवारी एका रॅलीमध्ये बोलताना शहा यांनी लँड जिहादचा उल्लेख केला. मोरीगावमध्ये ते बोलत होते.
काँग्रेस आणि एआययूडीएफवर त्यांनी जोरदार टीका केली. एआययूडीएफ प्रमुख बदरुद्दीन अजमल यांना आसामची ओळख बनू देणार नाही असं शहा म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "राहुल गांधी म्हणतात की बदरुद्दीन अजमल आसामची ओळख आहेत. बदरुद्दीन अजमल काँग्रेसची ओळख असू शकतात परंतु, आसामचे नाही. आसामची ओळख ही श्रीमन शंकर देव, श्रीमन माधवदेव जी असू शकतील' असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे".
"चुकूनही आसाममध्ये काँग्रेस आणि बदरुद्दीन सरकार आलं तर प्रदेशात घुसखोरी वाढीस लागेल. तुम्हाला आसाममध्ये घुसखोरी हवीय का? घुसखोरीमुक्त आसाम नकोय का? काँग्रेस पक्ष घुसखोरमुक्त आसाम देऊ शकत नाही", असं शहा म्हणाले.
"काझीरंगाच्या जंगलावर घुसखोरांनी ताबा मिळवला होता. लँड जिहादच्या माध्यमातून आसामची ओळख बदलण्याचं काम बदरुद्दीन अजमल यांनी केलं. काँग्रेस आज त्याच बदरुद्दीन अजमलसोबत आहे. तर भाजपनं आसामला आंदोलन मुक्त, दहशतवाद मुक्त बनवलंय. आसाममध्ये भाजपची सत्ता आली तर लव्ह अॅन्ड लँड जिहादचा धोका नियंत्रित करण्यासाठी कायदा आणण्यात येईल, असं शहा यांनी म्हटलं आहे.
आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. 2 मे रोजी निकाल जाहीर होतील.
उत्तर प्रदेश आणि हरियाणात आंतरधर्मीय विवाहासंदर्भात कायदा करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातही भाजप सरकारने यासंदर्भात कायदा लागू केला आहे. आंतरधर्मीय, विशेषतः मुसलमान मुलांनी हिंदू मुलींशी कथितपणे जबरदस्तीनं केलेल्या लग्नाला भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी 'लव्ह जिहाद' असं नाव दिलं आहे.
लव जिहादला कथित यासाठी म्हणावं लागेल कारण, मोदी सरकारने लव जिहादची व्याख्या कायद्यात नसल्याचं फेब्रुवारी महिन्यात संसदेत दिलेल्या उत्तरात मान्य केलं होतं. देशभरातील तपास यंत्रणांनी देखील 'लव जिहाद' बाबत अधिकृतरीत्या काही वक्तव्य केललं नाही.
गेल्या काही वर्षांपासून उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी "लव जिहाद" या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू केला होता. त्यांच्या माहितीनुसार, मुस्लीम मुलगा आणि हिंदू मुलीचा आंतरधर्मीय विवाह, ज्यात मुलीला जबरदस्ती धर्मांतर करण्यास भाग पाडलं जातं म्हणजे "लव जिहाद".
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)