कोरोना: होळीला रंग खेळताना दक्षता बाळगली नाही तर तुम्ही बनाल सुपरस्प्रेडर

    • Author, कमलेश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गेल्या वर्षी मार्च महिन्यातच भारतात कोरोना व्हायरसने वेग पकडला होता. तो कालावधी होळीच्या आसपासचाच होता.

गेल्या वर्षी होळीनंतरच शाळा-महाविद्यालयं बंद झाली. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती.

आता याच्या एका वर्षानंतर पुन्हा एकदा होळी येणार आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसारही पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे.

डिसेंबर-जानेवारीदरम्यान कोरोना व्हायरसचा प्रसार बराच कमी झाला होता. आता कोरोना संपेल की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. पण पुन्हा गेल्या महिन्यात कोरोनाने डोकं वर काढलं.

फेब्रुवारी-मार्चमध्ये पुन्हा आता कोरोना वाढू लागला आहे. ही भारतातील कोरोना व्हायरस साथीची दुसरी लाट असल्याचं सांगितलं जात आहे.

अनेक ठिकाणी लॉकडाऊन

26 मार्चला देशभरात कोरोना व्हायरसचे 59 हजार 118 रुग्ण आढळून आले. तर 257 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

आतापर्यंत भारतात 1 कोटी 18 लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. सध्या देशात कोरोनाचे 4 लाख 21 हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहे.

भारतात अनेक ठिकाणी सध्या लॉकडाऊन आहे. लसीकरण मोहीम वेग पकडत आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचं पालन करण्याची सूचना वारंवार करण्यात येत आहे.

दरम्यान, 29 मार्च रोजी होळी आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन सावध झाल्याचं पाहायला मिळतं. याआधीही सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं आकडेवारी सांगते.

कोरोना साथीची दुसरी लाट आणि कोव्हिड-19 च्या नवनव्या व्हेरियंट्सचा प्रसार या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास आपणही सतर्क असणं सध्याच्या स्थितीत महत्त्वाचं आहे.

या काळात आपण कोरोना प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष केल्यास आपल्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

डॉक्टरांच्या मते, आपण जुन्या अनुभवातून शिकायला हवं. लोकांमध्ये मिसळून आपण सुपरस्प्रेडर बनू शकतो. ही गोष्ट आपण टाळायला हवी.

होळीदरम्यान सुपरस्प्रेडर बनू शकतात लोक

आकाश हेल्थकेअरमध्ये इंटर्नल मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर राकेश पंडित यांच्या मते, "मोठे कार्यक्रम, सण उत्सव येताच कोरोनाच्या आकड्यांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. उत्तराखंडमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यात अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर येत आहे. विवाह-सोहळ्यांमध्ये पाहुणेच नव्हे तर वधू-वरांनाही कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा स्थितीत कोरोना व्हायरस प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झाल्यास कोरोना आणखीनच फोफावतो."

ते सांगतात, "कोरोना व्हायरसचे नवे व्हेरियंट समोर येत आहेत. नुकतेच एक डबल म्यूटेट व्हायरस भारतात आढळून आला. हे व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असतात. होळीदरम्यान लोक एकमेकांना भेटतात. कार्यक्रम आयोजित केले जातात. जेवणावळी होतात. रंग लावले जातात. अशा स्थितीत सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही. त्यामुळे कोरोना वाढण्यास मोकळीक मिळू शकते."

भारतात होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. काही ठिकाणी हा सण एकच दिवस साजरा होतो तर काही ठिकाणी कित्येक दिवसांपर्यंत ते चालू राहतं.

अनेक ठिकाणी होळीच्या जत्रा आयोजित करण्यात येतात. त्यामुळे मोठी गर्दी जमते.

कोव्हिड-19 साथीदरम्यान हरियाणात नोडल अधिकारी म्हणून काम करत असलेले डॉ. ध्रुव चौधरी सांगतात, "असे कार्यक्रम सुपरस्प्रेडर ठरू शकतात. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती गर्दीत मिसळल्यानंतर अनेकांना एकाचवेळी संसर्ग होऊ शकतो. तुम्ही मास्क घातला असेल तरी पाण्याने भिजून तो खराब झाल्यास त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे लोकांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जाणं टाळावं. घरी राहूनच होळी साजरी केल्यास उत्तम राहील."

राज्यांनुसार नियमावली

होळीदरम्यान कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता देशातील विविध राज्य सरकार सतर्क झाल्याचं पाहायला मिळतं. त्यांनी होळी साजरी करण्यासाठीची नियमावली जाहीर केली आहे.

  • मुंबईत सगळ्या खासगी आणि सार्वजनिक ठिकाणांवर होळी साजरी करण्यावर बंदी आहे. होलिका दहन आणि रंगपंचमी घरातच साजरी करावी लागेल.
  • हरयाणा सरकारने सार्वजनिक ठिकाणी सण साजरा करण्यावर तसंच पूजा करण्यासाठी गर्दी करण्यावर बंदी घातली आहे. या नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याची सूचना आहे.
  • दिल्लीत होळीदरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक समारंभ आयोजित करता येऊ शकणार नाहीत. एकत्रित येऊन होळी साजरी करण्याचीही परवानगी नाही. कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात असलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना चाचणी बंधनकारक आहे. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच दिल्लीत प्रवेश मिळेल.
  • चंदीगढ प्रशासनाने होळीदरम्यान होणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. क्लब, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्येही लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. ही ठिकाणी आपल्या निम्म्या क्षमतेनेच चालवण्याची अट आहे.
  • उत्तर प्रदेश सरकारने ज्येष्ठ नागरिकांना तसंच को-मॉर्बिडीटी असलेल्या लोकांना होळी खेळणं टाळण्यास सांगितलं आहे. विनापरवानगी कोणताही कार्यक्रम, मिरवणूक आदी काढता येणार नाही. कोरोनाचं प्रमाण जास्त असलेल्या राज्यांमधून येणाऱ्या लोकांची चाचणी बंधनकारक आहे.
  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकांना घरातूनच होळी साजरी करण्याच आवाहन केलं आहे. होळीदरम्यान कोणतीही जत्रा होणार नाही. कोणत्याही ठिकाणी 20 पेक्षा जास्त लोक जमा होऊ शकत नाहीत.
  • बिहार सरकारने होली-मिलन कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना चाचणी केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
  • गुजरात सरकारने होळी परंपरागत पद्धतीने मर्यादित स्वरुपात साजरी करण्याची सूचना केली आहे. होळीच्या दिवसांत सार्वजनिक आणि गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी नाही.

दुसरी लाट मोठी का?

कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांचा आकडा एका दिवसांत 50 हजारांपर्यंत पोहोचण्यास चार-पाच महिने लागले होते.

पण दुसऱ्या लाटेत एका महिन्यातच भारतात आकडे 9 हजारांवरून 50 हजारांवर पोहोचले आहेत.

डॉ. ध्रुव सांगतात, "पहिल्या लाटेदरम्यान लॉकडाऊन होतं. तसंच संसर्गाचं प्रमाणही त्यावेळी कमी होतं. मात्र आता कोणतंही लॉकडाऊन नाही. लोक एकमेकांना भेटत आहेत. नवनवे व्हेरियंट समोर येत आहेत. पंजाबमध्ये सापडलेला नवा व्हेरियंट 50 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळेच कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे."

एप्रिल-मेदरम्यान आपल्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल. दुसऱ्या लाटेच्या पीकसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दुसरी लाट येईल.

लसीकरण की लॉकडाऊन?

ICMR च्या महासंचालकांनी दुसऱ्या लाटेबाबत गेल्या आठवड्यात माहिती दिली होती. दुसरी लाट अपेक्षित वेळेपेक्षा आधीच आल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाविरुद्धच्या लढाईची वर्षपूर्ती होत असताना आपलं लक्ष चाचणी, मास्क वापर आणि लसीकरण यांच्यावरही आहे.

एकीकडे लसीकरण सुरू असताना दुसरीकडे कोरोनाचा प्रसार संथ करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येत आहे.

या गोष्टी पाहता कोरोना रोखण्यासाठी कोणता उपाय सर्वाधिक उपयोगी ठरू शकतो?

डॉ. राकेश सांगतात, "लॉकडाऊन हा अत्यंत टोकाचा पर्याय आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे जास्त वेळा हा पर्याय वापरणं व्यवहार्य नाही. पण लसीकरण वाढवणं हा सर्वाधिक चांगला उपाय ठरू शकतो. पण यासोबतच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यांच्यासारख्या सवयी सोडता कामा नये."

सध्या तरी केंद्र सरकारचं लक्ष कोरोनाचा प्रसार सर्वाधिक झालेल्या राज्यांकडे आहे.

यामध्ये महाराष्ट्र केरळ, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगढ आणि गुजरातमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. तसंच दिल्ली, तामीळनाडू, हरयाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)